सात एक वर्षांपासून एक जण मला अगदी बिलगून राहू लागला आहे. काही केल्या जाण्याचे नाव घेतंच नाही आहे, म्हणजे मग त्याला मित्रच म्हणावं लागेल ना? तर हा माझा नवीन सखा आधी समजलाच नाही कि आला कोठून आणि का? मग हळू हळू खोदून काढल्यावर समजलं कि ह्या ठिकाणांहून आलायं आणि तो प्रथमदर्शनी नकोसा असा होता आणि आहे. त्यामुळे त्याला हुसकावून कसे लावायचे ह्या करता सगळा खटाटोप सुरु होता. तज्ज्ञ भलत्याच दिशेला गेले होते आणि इतक्यातच त्यांना बरोबर दिशा मिळाली आहे. माझी पाय दुखी हि खरं तर पाठीच्या कण्या मुळे आहे, तिथे काही तरी गडबड आहे म्हणे. इतकी वर्ष सातत्याने शारीरिक आणि मानसिक यातना सहन केल्यावर प्रकर्षाने काही जणांसमोर नतमस्तक होता आलं. आधी त्यांच्याबद्दल आदर, सन्मान आणि कौतुक होतंच पण आता ते कित्येक पटीने वाढलंय.
भली मोठी वाहने जी मंडळी चालवतात मग ती पुरुष मंडळी असतो नाहीतर माझ्या भगिनी, सातत्याने इतके तास रस्त्यावर ते ओझं वाहून न्यायचं, वेळेत पोचायचं आणि धावायचं, तेच रस्ते, कधी कधी नीरस पण वाटतं असणार. बहुतेक त्यांची पाठ किंवा पाठीचा कणा हा लोखंडाचा असेल, निश्चितच. मला जर थोडक्या अंतरावर इतका त्रास होतो, तर ह्या सगळ्या ट्रक चालकांना, टँकर च्या ड्राइवर ना कायचं होत असेल? ह्याची कल्पना पण करवत नाही. हे वाचल्यावर काही म्हणतील कि त्यांना सवय होते. मला नाही वाटतं ते इतकं सोप्प आहे. मी इथे फक्त दूरचा जड वाहनाचा प्रवास ह्या बद्दल नाही बोलत आहे. कदाचित अनेकांना नीट आणि पुरेशी झोप मिळत नसेल, कुठेही खावं लागत असेल, अनेकदा ते देखील मिळत नसेल आणि ह्या सर्वांचा त्या पाठीच्या कण्यांवर नक्कीच परिणाम होत असणार. आणि हे एक किंवा दोन दिवस नाही तर सातत्याने सुरु. मी कणभर ह्यातून गेले तर मला इतकं जाणवलं, ह्याचं काय होत असेल. आणि सरते शेवटी मोबदला म्हणजे पैशात आणि शाबासकीच्या स्वरूपात मिळत असेल का?
आता जेव्हा तज्ज्ञ सांगतात कि प्रवास करणं टाळा, तेव्हा दोन-तीन गोष्टी प्रामुख्याने समोर येतात त्या म्हणजे, हे सगळे जड वाहनांचे ड्रायव्हर्स, दुसरे म्हणजे माझे फिरण्याचे प्रेम अर्थात माझ्या वर्कशॉप्स करताच फक्त, आणि पिटुकले उदर्निवाहाचे, वेळ सत्कर्मी लावण्याचे साधन म्हणून सुद्धा. "तो" मला निश्चितच हार मानू देणार नाही मुळी. तो मला लोखंडाचा कणा नाही तर लोखंडाचे गुणधर्म असलेला कणा नक्कीच दिलेला आहे, आणि तो दाखवेल दिशा त्याची शक्ती काही टिकवून ठेवायची ते. कारण जेव्हा मी त्या वर्कशॉप्स ना सुरवात करते तेव्हा सगळं दुखणं भुर्रकन पळून जातं, नंतर मुक्कामी येतं ते ठीक, पण तो माझा श्वास आहे, ते मी खूप एन्जॉय करते त्यामुळे मी फक्त सध्या वर्कशॉप्सला च बाहेर पडते, बाकी नाही. गैरसमज नसावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा