मला समजायला लागल्यापासून घरातल्या प्रत्येक हळदी-कुंकवाला, सणावाराला मी आईच्या सोबतीने असायचेच. या कार्यक्रमांमध्ये मी इतकी रमायचे की अगदी लहान वयात मी एक नवी प्रथाच सुरू केली होती आईसोबत मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना 'वाण' देणारच! आईला मी हे विचारलं नाही, तर ठामपणे सांगितलं आणि तिनेही ते स्वीकारलं. आईने दरवर्षी निवडलेलं वाण खरोखरच वाखाणण्याजोगं असायचं, माझ्यासाठी ते एक सुंदर सरप्राईजच असायचं.
श्रावण शुक्रवारी तर कोणाला बोलवावं लागत नसे. सगळे बैठे बंगले, त्यामुळे एकमेकांकडे जाणं हे ठरलेलंच असायचं. तेव्हा औपचारिक आमंत्रण, रुसवे-फुगवे यांचा लवलेशही नसे. दसऱ्यालाही आमचं घर पाहुण्यांनी काठोकाठ भरलेलं असायचं. पुढे माझी मुलं लहान असताना वाढदिवसाच्या आमंत्रण पत्रिका शाळांमधून किंवा घरोघरी जाऊन वाटण्यात जो उत्साह असायचा, तो काही वेगळाच होता.
मग 'व्हॉट्सॲप'चा जमाना आला आणि आमंत्रणं आभासी (Virtual) झाली. फोन किंवा ग्रुपवरून बोलावणं सोपं झालं. पण आजही लग्न किंवा मुंजीचं आमंत्रण आपण प्रत्यक्ष घरी जाऊन देतो, कारण त्यातून जो ओलावा मिळतो, त्यामुळे ती व्यक्ती आवर्जून उपस्थित राहतेच. त्या प्रसंगाला एक वेगळाच 'मुलामा' चढतो, असं मला वाटतं.
आज एक असाच सुखद अनुभव आला. एक सुप्रसिद्ध युट्युबर सुकन्या स्वतः माझ्या घरी संक्रांतीच्या हळदी-कुंकवाचं आमंत्रण द्यायला आली. खरं तर तिच्या अत्याधुनिक शैलीनुसार तिने युट्युबची एक लिंक पाठवून एका क्षणात आमंत्रण दिलं असतं, तर तिला कदाचित जास्त 'लाईक्स' मिळाले असते. पण तिने तसं न करता, स्वतः व्यवस्थित तयार होऊन, प्रत्येकाकडे जाऊन आमंत्रण देणं पसंत केलं. या तिच्या कृतीमुळे आपुलकीचं नातं अधिक दृढ झालं.
फारच अनपेक्षित आणि कायम लक्षात राहण्यासारखं हे आमंत्रण होतं. अगदी जवळची ओळख नसतानाही घरी येऊन मला जे विशेषत्व बहाल केलं / मिळवून दिलं, त्यासाठी सुकन्याचे मनःपूर्वक आभार! या एका भेटीने मला माझ्या लहानपणाची पुन्हा एकदा सैर घडवून आणली, त्याबद्दल शतशः धन्यवाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा