शनिवार, २४ जानेवारी, २०२६

2354: 'डिजिटल युगातलं एक 'अस्सल' आमंत्रण'

काही अनुभव आपल्याला थेट भूतकाळात घेऊन जातात आणि वर्तमानावरचा विश्वास अधिक दृढ करतात. आज सुकन्याच्या एका अनपेक्षित भेटीने असंच काहीसं घडलं.

माझ्या लहानपणी 'हळदी-कुंकू' म्हणजे एक सोहळा असायचा. आईच्या पदरामागे फिरताना, लहान वयातच मी एक हट्ट धरला होता आईप्रमाणेच मी सुद्धा माझ्या मैत्रिणींना 'वाण' देणार! आईने ते माझं वेड कौतुकानं स्वीकारलं आणि तिथूनच संस्कारांची ही लय माझ्या मनात रुजली. तेव्हा कोणालाही औपचारिक बोलवावं लागत नसे; श्रावण शुक्रवार असो वा दसरा, गल्लीतल्या  घरांचे उंबरठे आपुलकीने ओलांडले जायचे. पुढे काळ बदलला, व्हॉट्सॲप आणि व्हर्च्युअल आमंत्रणांचा जमाना आला, सगळं काही 'एका क्लिक'वर आलं.

आज सुकन्या जी स्वतः एक सुप्रसिद्ध युट्युबर आहे माझ्या घरी संक्रांतीचं आमंत्रण द्यायला आली. खरं तर तिच्यासाठी एका लिंकद्वारे लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं. त्यात कदाचित जास्त 'लाईक्स' आणि 'व्ह्यूज' मिळाले असते. पण तिने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा मोह बाजूला सारून, स्वतः नटून-थटून प्रत्यक्ष घरी येऊन आमंत्रण देणं निवडलं.

तिच्या या एका कृतीने मला पुन्हा एकदा माझ्या आईच्या काळातल्या त्या अस्सल ओलाव्याची आठवण करून दिली. सुकन्यासारखी आजची 'स्मार्ट' पिढी जेव्हा हे जुने पदर अशा रीतीने जपते, तेव्हा त्या आमंत्रणाला एक वेगळाच 'मुलामा' चढतो.

नुकतीच ओळख  झाली असतांना देखील, तिने दिलेला हा 'विशेष' मान मनाला  स्पर्श करून गेला. तंत्रज्ञानाच्या या युगातही प्रत्यक्ष भेटीची 'ऊब' अजूनही तितकीच महत्त्वाची आहे, हेच सुकन्याने आज सिद्ध केलं.

खूप खूप धन्यवाद सुकन्या, या सुंदर आठवणींसाठी आणि आदरासाठी!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...