तर त्याचं काय झालं, आज सकाळी नेहमीप्रमाणे चालायला गेले होते. इथेच अगदी अंगणात म्हणायला हरकत नाही अशी मोठी open gym आहे. भरपूर मोकळी जागा असल्यामुळे चालणं, व्यायाम करणं सहज शक्य होतं. समोर भला मोठा डोंगर, मोठमोठी झाडं, मिनी जंगलच म्हणा ना. वर डोंगरमाथ्यावर छोटंसं देऊळसुद्धा आहे.
तर अचानक कोणीतरी माझं जबरदस्त स्वागत केलं.
तो मातीचा सुगंध...
अहाहा, काही विचारूच नका.
क्षणभर इकडे तिकडे बघितलं. पावसाचं कुठेच चिन्ह नव्हतं. मग हा दरवळ आला कुठून?
चालणं सुरू होतं आणि चार डोळ्यांनी शोधमोहीमही.
मग लक्षात आलं, आमच्याच इथे बांधकाम सुरू आहे. काल उशिरा बहुतेक मोठमोठे वाळूचे ढीग आले असावेत. काही जण ती वाळू भरून नेत होते. नदीकाठची, थोडी मातीमिश्रित वाळू.
बस्स...
त्या सुगंधामुळे नकळत माझ्या चालण्याचा वेगच वाढला.
इतक्यात जिमच्या वरच्या मजल्यावरून अजून एक सुगंध खाली उतरला. कोणीतरी भात शिजवत होतं. आणि तो तांदळाचा दर्जा काय सांगू? त्या शेतकऱ्याला मनापासून सलाम, ज्याने इतका सुगंधी तांदूळ पिकवला.
थोडं चालून, हे सगळे सुगंध अनुभवत परत घरी आले. किल्लीने दरवाजा उघडायच्या आतच अजून एक दरवळ स्वागताला उभाच होता. संपूर्ण घर सुगंधाने भरून गेलं होतं. वरच्या मजल्यावरच्यांनी कपडे धुण्याची मशीन लावली असावी. आणि साबण वापरताना हात अजिबात राखला नव्हता हे स्पष्ट जाणवत होतं असंख्य फुलांचा सुगंध दरवळत होता.
तो अनुभवतच गवती चहा घालून चहाचं आधण ठेवलं.
अहाहा...
मग काय विचारता, जैसे चार चाँद लग गये.
आणि मग अचानक जाणवलं, आपल्या दिवसात किती प्रकारचे सुगंध सतत येत असतात. फोडण्या, साबण, चहा, माती, भात, फुलं...
सगळं रोजचंच.
पण आज ते नव्याने अनुभवलं.
तुमच्या दिवसातही असेच दरवळते क्षण येवोत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा