रविवार, ३ मे, २०२६

२४४७: माझ्या मोगऱ्याची आठवण


माझ्या मोगऱ्याची फारच आठवण येते आहे. का कुणास ठाऊक? कदाचित उन्हाळा हा त्याच्या बहराचा ऋतू आहे म्हणून, किंवा तो सुगंध मला फारच प्रिय आहे म्हणून.

अगदी लहानपणी आम्ही ज्या बंगल्यात राहत होतो, तिथे चौफेर मोठी बाग होती. काय नव्हतं त्या अंगणात? विविध फुलं, फळं, भाज्या, वेल, तुळशीची रोपं… खूप वैविध्य.

आम्हाला सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहायला जावं लागलं, बदली झाली आणि quarter तय्यार नव्हतं, डागडुजी सुरु होती म्हणून. तिथली बाग तर अजूनच मोठी. अहाहा!

डागडुजी झाल्यावर राहायला आलो quarter मधे तेव्हा पुन्हा नव्या रंगांची फुलं, झाडं, कधीही न अनुभवलेली झाडे, पाने, वेली ई. दिसू लागली. पुढे स्वतःच्या घरी गेलो तेव्हा चाफा, लाल पेरू, कलिंगड, वालाच्या शेंगा, आणि अनेक प्रकारची फुलं… खूप काही होतं. जेवढं जमलं तेवढं मनापासून सगळं जपलं. तेव्हा वेळ होता, आवड होती, समाधान मिळायचं. थोडंफार जबाबदारीपासून मुक्त असं जगता येत होतं, म्हणून अशा गोष्टींना वाव मिळायचा.

दोनाचे चार झाले आणि चित्र बदललं. तरीही मी मोगरा, गोडलिंब आणि गवती चहा अशी काही झाडं जपली होती.

मोगरा बहराला आला की मी त्याच्यासोबत वेळ घालवायचे. तो सुगंध मला सोडवतच नसे. असं वाटायचं तिथेच बसून राहावं. कारण तो बहर काही दिवसांचाच असायचा. तो सुगंध मी जणू साठवून ठेवायचे. नेहमी वाटायचं, निसर्गाला कसं कळत असेल की हीच ती वेळ फुलायची, बहरायची, इतरांना आनंद द्यायची? आणि तो सुगंध दूरवर पसरायचा. कधीच त्या मोगऱ्याने मोजून मापून सुगंध दिला नाही.  कदाचित म्हणूनच त्याला जपण्याचा प्रयत्न व्हायचा. जमेल तसं पाणी, थोडी माती, थोडी काळजी.

झाडांमध्ये जीव असतो. त्यांना जपावं लागतं, वेळ द्यावा लागतो. नाहीतर ती हवी तशी फुलत नाहीत. आणि ते त्यांच्या बाबतीत अन्यायच आहे.

आता मात्र हे सगळं करावंसं वाटत नाही. आणि त्यामुळेच कदाचित यावर्षी माझ्या दारात मोगरा फुललाच नाही. प्रचंड आठवण येते आहे त्याची. त्या बहराची. त्या सुगंधाची. त्या प्रसन्नतेची.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...