रविवार, १७ मे, २०२६

२४६८: अधिक मास


काल सहज एका प्रख्यात गुरुजींचं स्टेटस बघण्याचा योग आला. त्यांनी अत्यंत सुंदर अशी सूचना केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या अधिक मासात दररोज संपूर्ण महिना श्री दासबोध ग्रंथाचे वाचन, मनन आणि चिंतन करावे. ते इतकं भावलं मनाला की मग लगेच शोधमोहीम सुरू झाली. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही. माझ्याकडे दासबोध ग्रंथ आहेच. पण आदरपूर्वक सांगते, अतिशय मोठा आणि गहन ग्रंथ आहे तो. काही पाने वाचल्यानंतर प्रकर्षाने जाणवलं की हे सहजगत्या एका महिन्यात पूर्ण करणं थोडंसं अवघड आहे.

मग शोध सुरू झाला सारांशाचा. असं काही सापडतं का जे थोडक्यात दासबोध समजावून सांगेल? असं खूप काही आढळलं, पण बहुतांश पुस्तक रूपात. आता काही तासांत ते पुस्तक घरी पोहोचणं कठीणच होतं.

मग अचानक एक संदर्भ आठवला.

एक संशोधन पत्रिका लिहिताना मी हा विचार वाचला होता. भगवद्गीता संस्कृतमध्ये, विशाल स्वरूपात आहे. ती सर्वसामान्यांपर्यंत सहज पोहोचावी म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण ती देखील मोठी आणि चिंतनशीलच. मग पुढे समर्थ रामदास स्वामी आले. त्यांनी त्या विचारांना अजून व्यवहार्य, अजून साध्या मराठीत जीवनाशी जोडून मांडलं. पण मनाचा अभ्यास करणारे संत असल्यामुळे त्यांना हेही लक्षात आलं असावं की दासबोध देखील मोठा आहे आणि माणसाकडे वेळ कमी होत चाललाय. मग अजून सोपं केलं गेलं.

गुणगुणता येईल असं.
सहज लक्षात राहील असं.
मनात उतरेल असं.

आणि जन्माला आले मनाचे श्लोक.

मग ठरवलं, दासबोध पूर्ण वाचणं एका महिन्यात शक्य नसेल कदाचित, पण त्याचा सार तरी अनुभवता येईल. आणि कितीतरी वर्षांनी पुन्हा एकदा मनाचे श्लोक म्हणायला सुरुवात झाली. त्यासोबत शालेय जीवन पण अलगद समोर आलं. शिक्षक, मित्र-मैत्रिणी, बाकं, वर्ग, पटांगण, स्टेज, गोंधळ, माकडचाळे… सगळंच.

फरक एवढाच की त्या वेळी श्लोक पाठ केले जात होते, आणि आता अनुभवांच्या शिदोरीसह अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे.

मनापासून केलेलं पोहोचतंच, ह्यात शंका नाही.

म्हणून मग ठरवलं —
दासबोध असो,
त्याचा सारांश असो,
किंवा फक्त मनाचे श्लोक असोत…

मनापासून वाचायचं.
थोडं थांबायचं.
मनन करायचं.
चिंतन करायचं.

फायदा किती झाला, काय मिळालं, किती बदललं ह्याचा हिशोब न ठेवता.

कारण काही गोष्टी मोजण्यासाठी नसतातच. त्या फक्त अनुभवण्यासाठी असतात.

कदाचित अशाच प्रयत्नांतून एक वेगळं विश्व तयार होत असावं.
अधिक शांत.
अधिक स्थिर.
आणि अधिक मासासारखंच…
अधिक सुंदर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६८: अधिक मास

काल सहज एका प्रख्यात गुरुजींचं स्टेटस बघण्याचा योग आला. त्यांनी अत्यंत सुंदर अशी सूचना केली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार आजपासून सुरू होणाऱ...