गुरुवार, ११ एप्रिल, २०२४

आंब्याची पाने आणि गर्भधारणा


प्रत्येक शुभ प्रसंगाच्या वेळी भारतात दारावर आंब्याचे तोरण लावायची पद्धत आणि रीत आहे. ह्या शिवाय आंब्याच्या डहाळ्या पण देवघरावर, दारावर, गुढीसोबत लावतात, आणि आंब्याची पाने कलशाचा महत्वाचा भाग असतो. पूजा झाली, तो दिवस सरळ कि दुसऱ्या दिवशी "पुनरा गमना यच" असं म्हणून अक्षता वाहायच्या आणि मग ती आंब्यांची पाने निर्माल्य होतात. आताशा विहिरी नाहीत घरोघरी, नदीत टाकायचे नाही, प्रत्येकाच्या घरी कचरा गिरवयाची सोय नसते त्यामुळे कित्येकदा ते पायाशी, कचऱ्यात टाकले जातात. त्या दिवशीपुरतं महत्व त्याच, बास. 


अगदी तसेच आहे माझ्या पाहण्यात, अनेक कुटुंबात, अर्थात अपवाद असतात प्रत्येक वेळी पण फारच थोडके, हाताच्या बोटावर मोजण्या इतके पण नाही. गर्भधारणेच्या काळात जे काही ७-८ महिने असतात त्या पुरते होणाऱ्या आईचे लाड, किंवा काळजी म्हणता येईल, जसे बाळ झाले तसे बाळालाच फक्त महत्व.  

धार लावणे


माझ्या लहानपणी बैठी घरे होती सर्वत्र. फ्लॅट हि संकल्पना फार नंतर आली, माझ्या मते जेव्हा मी नोकरी करायला सुरवात केली आणि तेही फारच थोड्या प्रमाणात. आत्ता सारखे मुळीच नाही. त्यामुळे धार लावणारा अगदी घराच्या गेट पाशी येत होता तेव्हा. कुठल्याही घरी वापरात असलेल्या हत्याराला धार लावण्यासाठी तो सायकल वर मागे एक छोटेसे यंत्र घेऊन येत असे. ते पायडल मारून चालू करत असे. खूप म्हणजे खूप मज्जा यायची ते बघायला. त्या वेळी विळी च वापरली जायची भाजी, फळे चिरायला. चाकूचा वापर फारच कमी प्रमाणात होत असे. आज सारखे सर्रास चाकू वापरले जायचे नाही त्या वेळी. तेव्हा भारतीय पद्धतीने सगळे होत असे, आत्ता भारत बाहेर काय चालते त्याची नक्कल जास्त होते. चाकूची धार कमी झाली कि एक दोनदा प्रयन्त करायचा कपाच्या खालच्या भागाला घासून तात्पुरती धार लावण्याचा, नाहीतर त्याला मोडीत काढून नवीन घेऊन यायचा. बास. संपला विषय. तर अशी हि माझी धार ह्या विषयाची थोडक्यात ओळख. 


गेले काही दिवस माझ्या चार डोळ्यांनी एक अजिब पण आत्यंतिक नैसर्गिक पद्धतीने धार लावणे बघितले. अर्थात ह्या आधी पण मी ते टिपले होते पण ह्या काही दिवसांपासून ते जास्त प्रकर्षाने जाणवले आणि अजून काही आधीचे मला आठवले. आमच्या कडे दोन मिठू होते, एक करंट जातीचा आणि एक नेहेमीच. दोघेही पिल्लू होते. त्यांना उडता येत नव्हतं, आमच्या मागच्या अंगणात ते येऊन बसले होते. मांजर किंवा इतर प्राणी त्रास देतील म्हणून मग आम्ही ते सुरक्षेच्या दृष्टीने पाळले. ती दोघे काही दिवस गेले कि मान खाली घालून खूप वेळ काही करत बसलेली दिसायची. निरखून बघितले तर चोच घासत बसलेली असायची, ह्या आणि त्या बाजूनी देखील. नंतर लक्षात आले कि ते त्यांच्या चोचीला धार लावत होते. अगदी तस्सेच सध्या आमच्या घराच्या मागे भले मोठे झाड आहे, त्यावर बसलेले कावळे झाडाच्या फांदीवर / बुंध्यावर असलेल्या सुरकुत्यांचा आधार घेतात धार लावण्यासाठी. मस्त चोच घासत बसलेले असतात. काय दृश्य आहे ते? एक म्हणजे मी माझ्या बालपणात झारर्किनी जाऊन पोचले क्षणात, आणि ते विहंगन दृश्य बघून धन्य झाले. कित्ती बुद्धिवान ते पिटुकले पक्षी. कधी काय कसं करायचं हे निसर्गाचं शिकवतो त्यांना. क्या बात है. अप्रतिमच. 


चला तर मग आपण देखील आपल्या बुद्धीला अशीच धार देत राहू, वैविध्य प्रकारे, आणि सातत्याने. म्हणजे ह्या दुनियेत तक धरून राहायला मदत होईल. मग ती धार वाचनाने, मनन-चिंतन करून, ध्यान आणि योग करून, शारीरिक + मानसिक स्वास्थ्य सांभाळून लावू. 

बुधवार, १० एप्रिल, २०२४

केसा येवढी


माझी एक सख्खी मैत्रीण मला तिच्या नवीन सखी बद्दल सांगत होती. अगदी आदराने बरं का मंडळी. अगदी कोणताही किंतु परंतु न ठेवता, न बाळगता किंवा कुठलीही तुलना ना करता. 


तर तिच्या हाती लग्नाच्या जवळपास ३ दशकानंतर एक नवीन गोष्ट विराजमान झाली. अर्थात सर्वांनीच त्या बद्दल विचारले. मला सांगतांना म्हणाली कि हि एक बांगडी माझ्या आज्जे सासूबाईंची आहे. माझ्या वाट्याला आली. आदरपूर्वक ती फार साधी दिसले सर्वांना, अगदी गोल होती म्हणून बांगडी आणि तिची जाडी एक केसा एवढीच होती. फार फार कमी वजनाची, किंबहुना मोरपीस जास्त वजनाचे असेल अशी. 


ह्या माझ्या मैत्रिणीला आम्ही सर्वांनीच फार फार जवळून बघितले आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती आहे. आणि त्या काळी बहुतांशी सर्वत्रच एकसारखे वातावरण होते. स्त्री घर सांभाळायची आणि पुरुष बाहेर कामाला जायचे. स्त्रीला मान सन्मान होता. त्या पै न पै गोळा करून अंगभर सोने, दागिने ई. परिधान करत होत्या. त्या वेळी भरपूर सुरक्षा होती, स्त्रिया घरीच असायच्या आणि बरकत होती, जरी कमाई सगळ्यांचीच नगण्य होती. पण माझ्या मैत्रिणीच्या माहेरी तिच्या आजीच्या पाटल्या, बांगड्या, इतर दागिने, चांदीची ताटे, वाट्या आणि इतर खूप काही होते. सगळीकडे जर परिस्थिती सारखीच होती मग इतकी तफावत का? हा मला पडलेला प्रश्न. म्हणजे एकीकडची आजी त्याच वयाची ६-८ वजनदार बांगड्या मिरवते आणि दुसरीकडे जेमतेम सोन असलेली फक्त एक बांगडी? माझ्या मते हा फरक ताळतंत्र सांभाळण्याचा आहे, दूरदृष्टीचा आहे, भन्नाट नियोजनाचा आहे आणि अर्थातच आवड. त्या स्त्रीला ह्या सगळ्यांची पुढील पिढ्यांकरताची गरज, किंवा साठवणूक ह्याची असलेली जाण, तिच्या विचारांना मिळालेला सन्मान, आदरपूर्वक वागणूक आणि शांतता, दृश्य समृद्धी आणि असेच बरेच कंगोरे. कुटुंबातल्या स्त्रीला सन्मान दिला, मुभा आणि मोकळीक दिली कि जमीन आस्मानचा फरक पडतो. हे इथे दागिने किंवा पैसे ह्या बद्दल बोलणं नाहीच, पण एक भरभराट पण अत्यंत महत्वाची असते आणि मग ती पिढ्यानपिढ्या आशिर्वादात्मक रित्या सुरु राहते. अविचारी माणसे असली कि काहीच साध्य होत नाही हे ह्या साध्या एका उदाहरणावरून सिद्ध होते. त्यामुळे मस्त राहा, सन्मान द्या आणि घ्या, तदनंतर भरभराटीचा विजय हा नक्कीच होणार. 

वाढत्या अंगाचे


मी माझे स्नातकोत्तर शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहत होते. एका मुक्त विद्यापीठात नोकरी पण करत होते. त्या वेळी माझ्या मनगटावर एक साधे दिसणारे पण योग्य वेळ दाखवणारे घड्याळ होते. तेवढ्यातच माझे लग्न ठरले आणि माझे ते जुन्या पद्धतीचे योग्य वेळ दाखवणारे घड्याळ बदलले गेले. आम्ही दोघे नवीन घड्याळ खरेदी करण्यासाठी एका नामवंत दुकानात गेलो. बरीचशी घड्याळे बघितल्यावर एक पसंद केले. तिथल्या नेहेमीच्या पद्धती प्रमाणे मी घड्याळ घालून बघते तर काय बरेच मोठे होते ते, म्हणजे जवळपास ४ कड्या काढाव्या लागल्या व्यवस्थित मनगटावर विराजमान होण्यासाठी. तेव्हा ते दुकानातले काका म्हणतात कसे, "ह्या कड्या सांभाळून ठेवा. पुढे कामात येतील. लग्न झाल्यावर वजन वाढते.... ई. ". का कुणास ठाऊक पण घड्याळ्याचे पट्टे वाढत्या अंगाचे तय्यार करतात. अर्थात मी माझ्या वेळेचा हा किस्सा सांगते आहे जेव्हा दहावीत परीक्षेत वेळ कळवा म्हणून आधी आईचे घड्याळ मिळायचे घालायला, जुने. मग काही वर्षांनी आपले नवीन, अशी पद्धत होती, अलिखित नियम देखील होता. 


परवा मला एक साधे घड्याळ बक्षीस म्हणून मिळाले. प्रेमाने दिले आहे मला. खूप दिवस झाले म्हटलं आज घालावे, म्हणून उघडले तर काय, ते देखील ह्या जमान्यात वाढत्या अंगाचेच निघाले. आता मला त्याच्या कड्या काढून आणाव्या लागतील नाहीतर ते गळून पडेल, समजणार पण नाही. 


अजूनही मनगटाने त्याचा आकार सांभाळा आहे तब्बल २५ वर्षांनी ह्याची कमाल वाटली. मज्जा आली. काही घड्याळ्यांचे डिझाईन वेगळे केले आहे ज्यात कड्या तश्याच राहतात आणि हूकने मागे पुढे करून कोणत्याही मनगटाची शोभा वाढवता येते. प्रगती आहेच. काही सांगता येत नाही काही वर्षांनी आपोआप जुळवून घेणारे पट्टे देखील निघतील. पण माझी पहिली ह्या पट्ट्याची आठवण तरी देखील ताजी तवानी राहिलाच ह्याची खात्री आहे.  

पांगुळगाडा ते ...


हे बरेचदा ऐकलं होतं किंबहुना मराठी पुस्तकात देखील होतं कि "एक चक्र इथेच पूर्ण केलं जातं", आपोआप. अर्थात तुम्ही बघाल तसे असते सगळ्याच बाबतीत. "लहानपण देगा देवा" असं सगळेच मनातल्या मनात म्हणत असतात, इच्छित असतात. अगदी दूर कशाला जायचे, परवाच माझी लेक शाळकरी मुलांना यथेच्छ खेळतांना बघून म्हणाली कशी, "शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत त्यामुळे बघ ना कशी मनसोक्त खेळात आहेत खाली. शाळा म्हटलं कि मोजकाच अभ्यास आणि बाकी वेळा मित्र, बास. कित्ती मस्त आयुष्य आहे नाही? मी म्हटलं अगं आपण सगळेच जगलो ना ते आधी, मग? काही का असेना पण सर्वांना ते मुक्त बागडणं फारच आवडतं. अर्थात त्या लहानपणी मोठा व्हायची प्रचंड घाई झालेली असते ती वेगळी गोष्ट. असो. 


तर लहानपणी धडपडत पाय फुटले कि पांगुळगाडा अत्यानंदाने वापरला जातो. मग तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला असो नाही तर अत्याधुनिक असा, तो त्रिकोणी सारख्या आकाराचा असो नाही तर गोल, पण तो चांगलाच वापरात येतो. एक मस्त आधार मिळतो, आकाश ठेंगणं वाटायला लागतं, अगदी जग पादाक्रांत केल्याचा आभास होतो आणि एक मोकळीक मिळाल्याची जाणीव देखील. इथून तिथे आणि तिथून इथे, सर्वत्र विहार सुरु. मोठ्यांना लहानांनी उच्छाद मांडल्या सारखं वाटतं पण वाढतं वय देखील लक्षात येतं, प्रगती दिसते आणि मज्जा येते. पांगुळ गाडा ह्या करता कि आधार असला तरी पांगल्यासारखं होऊ शकतं, म्हणजे चालता चालता तोल जाणे, मध्ये काही आलं तर सांभाळता न येणे आणि ह्या सगळ्यातुनच शिकणे, अर्थात त्या पायात बळ मिळवणे सरावाने, पुढची पायरी गाठणे ई. 


हे असं गोंडस लहानपण झर्रर्रकिनी कधी निघून जातं समजतच नाही. मग काय शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, नोकरी, चार हात ई. करता करता काही जणांच्या हाती अजून एक मोठ्या आकाराचा पांगुळगाडा विराजमान होतो. वॉकर असे त्याचे गोंडस नाव. प्रत्येक पाऊल टाकते वेळी त्याचा आधार वाटतो. त्याला दिवा लावण्याची सोय असते, चाके दिली असतात, आणि प्रत्येकाच्या उंचीनुसार बदल करता येतात. त्या आजी आजोबांना देखील मोकळीक, स्वातंत्र जे गेले अनेक वर्ष अनुभवलं होतं आणि जे अश्याच काहीश्या रंगीबेरंगी पिटुकल्या पांगुळगाड्यामुळे शक्य झालं होतं / सुरु झालं होतं ते. पाय मोकळे होतात ते वेगळंच. आणि काय हरकत आहे?. आयुष्यभर, जागोजागी, पदोपदी आपण मनुष्य प्राणी असल्यामुळे कुणाचा ना कुणाचा आधार घेतला आहेच. स्वरूप वेगवेगळे असेल कदाचित पण आधाराशिवाय अश्यकच मार्गक्रमण करणं. बघा म्हणजे इथेच एक चक्र पूर्ण होतेच हे कित्ती सत्य आहे. 


सगळेच पिल्लं लहानपणी असा गाडा घेतातच असे नाही,काही चपळ असतात आणि इथे तिथे धरून पट्टदिशी चालू लागतात. अगदी तसेच प्रत्येक आजी आजोबा नाही वापरात गाडा, पण कोणी काठी, तर कोणी मित्राचा खांदा, तर कोणी काही वापरतोच, सजगता म्हणून. ते देखील उपभोगता आलं पाहिजे उंच मानेने. 


काय विचारपूर्वक "त्याने" सगळं घडवलं आहे, बऱ्याचश्या गोष्टी आपल्या सुपूर्त केल्या आहेत आणि काही ठिकाणी स्वतःच्या हाती सत्ता ठेवली आहे आपल्याला पांगळा करून. सगळंच मानवाच्या हाती देऊन टाकलं तर काय होईल ह्याची कल्पना देखील करवत नाहीच. 


कधी लागलाच तर आधार घेऊन किंवा देऊन एक एक पाऊल पुढे टाकूया. एक मेका साह्य करू अवघे धरू सुपंथ. 

बुधवार, ३ एप्रिल, २०२४

तेथे कर माझे जुळती


मी अक्षरशः नतमस्तक झाले एक बातमी ऐकून. एक बातमी म्हणण्यापेक्षा एक जबरदस्त आणि विचारपूर्वक कृती ऐकून. अनेक वर्षांपासून / दशकापासून माझी एक मैत्रीण आहे. त्या काळात सोशल मीडिया फार वेगळ्या प्रकारे सुरु होते आणि प्रत्यक्ष भेटीत अनुभवता येत होते. प्रत्यक्ष घरी जाणे कधीही, यथेच्छ पोटभर जेवणे / खाणे, भरपूर गप्पा फक्त मैत्रिणीशी नाही तर अख्ख्या कुटुंबाशी आणि कुठलीही घाई नाहीच, बोलायचं पण पोटभर आणि ऐकायचं त्याहून मस्त मजेत. खूप म्हणजे खूप भटकायचं, उगाच, अभ्यासासाठी आणि कामासाठी सुद्धा. काम म्हणजे अख्ख्या कुटुंबाचे. ह्या अश्या साध्या, सरळ वातावरणात वाढलेले आम्ही सर्व. त्यात एक खास मैत्रीण, तिचे खास सदैव हसत मुखाने स्वागत करणारे कुटुंब, सर्वजण अतिशय हुषार, चार बहिणी, काका काकू आणि आमच्यासारखे सारखे पडीक व्यक्तिमत्व. त्यातील दोन नंबरची ताई प्रत्येक वेळी सुवर्णपदक विजेती, आणि गेले ३ दशकं नावाजलेली सर्वोत्कृष्ट नेत्रतज्ज्ञ म्हणून असंख्य रुग्णांना प्रचंड प्रेरणा देत आहे, बरे करत आहे, तेजोमय दृष्टी बहाल करते आहे. अशी हि आमच्या सर्वांची आदर्श ताई अगदी बारीकसारीक आणि पराकोटीचा, म्हणजे सामान्यांच्या कधी लक्षात येणार नाहीच असा, इतक्या उंचीचा विचार करून काकांना म्हणजे तिच्या वडिलांना रामल्लाचे दर्शन करण्यास घेऊन गेली. अगदी व्ही आय पी असे असाधारण दर्शन, थेट गाभाऱ्यात, म्हणजे लल्ला आणि काकांमध्ये कोणीच नाही असे अद्वितीय. संपूर्ण शिस्तीत आखलेला प्रवास, अप्रतिम सोय आणि परमानंद, संपूर्ण दोन दिवस असा आलेख. परमोच्च बिंदू ह्या सगळ्या प्रयत्नांचा किंवा विचारांचा असा कि ताई काकूंची पैठणी नेसून गेली होती दर्शनाला काकांसोबत, म्हणजे दोघांनी जोडीने दर्शन घेतल्यासारखे होते, काकू नाहीत ह्याची जाणीव होणार नाही आणि त्यांना पण दर्शनाचा लाभ. परमेश्वराचे कित्ती कोटयावधी आशीर्वाद आहेत ताईसोबत बघा, असा विचार तिला करता आला. मी तर हे सगळे वर्णन ऐकून निःशब्दच झाले. माझ्या शब्द संग्रहात ह्या सगळ्या कार्यासाठी, उत्कृष्ट कृतीसाठी, विचारपूर्वक देवदर्शन घडवून आणल्यासाठी कुठलीही उपमा नाही, कि प्रशंसा / स्तुती करण्यासाठी शब्दसुमने नाहीतच. उगाच नाही आपल्या मराठीत कर्तृत्त्वान मुलीला बाईमाणूस असे संबोधले जाते, कारण ती ह्या आणि त्या घराचे सगळेच सांभाळते. प्रत्येकीलाच असे भाग्यात नसते हो. त्यामुळे मी माझ्या ह्या आदर्श अश्या ताई समोर नतमस्तक होते. "काय वर्णू ताव गूण, अल्पमती नारायण". ती आधीच माझी आणि असंख्य लोकांची ताई आणि आदर्श तर आहेच, पण आता तिच्या बद्दलचा आदर अनेक पटीने वाढला. तिच्या हातून असेच कार्य सातत्याने होत राहो हि सदिच्छा आणि प्रार्थना. 


असं म्हणतात ना कि प्रत्येकाकडे तो परमेश्वर स्वतः पोचू शकत नाही म्ह्णून त्याने आई घडवली. अगदी तस्सेच प्रत्येकाला परमेश्वराचे / संतांचे दर्शन "ह्याची देही ह्याची डोळा" होणे अशक्य म्हणूनच अशी ताई त्याने निर्माण केली, घडवली आणि तिला असे जगावेगळे विचार प्रदान केले. माझ्या साठी, आणि इतर अनेकांसाठी तिचे दर्शन घेतले म्हणजे पावले हो. आमची प्रत्यक्ष भेट कधी होते माहित नाही पण साध्या माझा तिला दुरूनच साष्टांग नमस्कार. अहो भाग्य त्या काका काकूंचे ज्यांनी अश्या अद्वितीय मुलीला जन्म दिला. 

सोमवार, १ एप्रिल, २०२४

आगळा वेगळा फोन

 आज मला एक आगळा वेगळा फोन आला असं म्हणायला हरकत नाही, किंवा संवाद साधला गेला, अदृश्य स्वरूपाचा. अहो काय सांगू, प्रत्यक्ष "तो" होता त्या बाजूला आणि म्हणतो कसा, अगं जसा तुम्हाला उन्हाळा, तास तुमच्याच घरात आम्हाला देखील नाही का? फोटो, मूर्ती ह्या स्वरूपात पुजता तुम्ही म्हणजे आमचं अस्तित्व आहे. म्हणजेच ती उन्हाची झळ आम्हाला देखील आहे ना. मग त्या करता तू काय करते आहेस? एखादी तरी गोष्ट सांग केलेली? "त्यानेच" मला आधी पासून एक वेगळी अनोखी सदाबहार आणि आयुष्यभर पुरून उरणारी अशी गिफ्ट दिली आहे ती म्हणजे नावीन्यतेने विचार करणे. मग त्या गिफ्ट चा ह्या देवघराची पण कधी काळीं उपयोग करावा, नाही का? चल तर मग. त्यात अजून एक म्हणजे मला माझे देव, आणि देवघर ज्या दिवशी मी नामस्मरण करत करत स्वच्छ करते, हार घालते त्या दिवशी दृष्ट लागण्यासारखे दिसतात. आज मी भरपूर ताजी ताजी, रंगबिरंगी फुले आणली होती, अर्थात हार करून वाहण्यासाठी, पण मग देवघर स्वच्छ करून, फोटोची, मूर्तींची जागा अदलाबदल करून, शेजारी वेगळे बसवून, प्रत्येकाला मोकळे पणाने ठेवत मी फक्त फुलं वाहिली. प्रत्येकाला एक नक्कीच आणि मस्त रंगसंगती साधत, काही मूर्तींना अनेक अशी फुले वाहिली. आज ते देवघर इतकं अप्रतिम दिसतंय म्हणून सांगते कि ज्याचं नाव ते. त्यांना पण फार आवडलाय हा पिटुकला बदल. फक्त फ्रेम वर मांडलेली फुले, सगळं कसं हलकं फुलकं उन्हाळी पद्धतीचं. फ्रेमभर हार म्हणजे कदाचित जास्त गरमी, म्हणून त्यानेच सुचविलेला हा बदल हो. क्या बात है? तो सगळं यथाशक्ती, यथायोग्य आणि व्यवस्थित करून घेतोच आपल्याकडून, पैसे देतो, बुद्धी बहाल करतो, शक्ती प्रदान करतो आणि कृती करवून घेतो. आधीच मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडालेली त्यात आज हि भर पडली, एक म्हणजे फोन ची आणि दुसरी हि कृती. "चेरी ऑन केक" म्हणजे मी स्वयंपाक घरातील बाळबोध अगदी छोटेखानी पंखा देखील सुरु ठेवला आहे, तेवढाच गार वारा बरा वाटतो हो सभोवताली. "असे फोन, प्रसंग येति आणिक स्मृती ठेवुनी जाती". 


आणि फक्त मलाच नाही, घरातील सर्वांनाच एक उत्कृष्ट दृश्य दिसते असे सजलेले देवघर असले कि, त्या एकंदरीत घराला प्रफुल्लित वाटतं. 


असेच फोन करत राहा रे. आणि सेवा घडू दे नित्य. 

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...