कुठलीही तुलना अजिबात नाही, पण जे चित्र सतत माझ्या डोळ्यासमोर उभे राहते आहे, त्याने मला आज लिहायला भाग पाडले. मी पण कोणे एके काळी लहान होते, माझी मुलंही त्या वयात होती. पण दोन्ही वेळी एक शिस्त होती. बाहेर गेलो, कुणाच्या घरी गेलो की कशालाही हात लावायचा नाहीच. प्रश्नच नव्हता. त्या घरातील व्यक्तीने किंवा मुलाने स्वतःहून काही दिल्याशिवाय वस्तू उचलणे किंवा उचकाउचकी करणे वर्ज्य होते.
आणि दुसरे म्हणजे, जेव्हा आपल्या घरी कोणी बाहेरचे (आई-बाबांचे मित्र-मैत्रिणी) येत असत, तेव्हा आधीच कल्पना दिलेली असल्यामुळे, पोटं भरलेली असल्यामुळे, किंवा आईने काही काम सांगितल्यामुळे, मी आणि त्यानंतर माझी मुलं त्यांच्या खोलीतच खेळत बसायची.
आणि आता, अबब! काय दृश्य अनपेक्षित रित्या बदलले आहे, बापरे! मला जरा घाबरायलाच झाले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
त्यांच्या घरी गेलं तरी नुसता धुडगूस! मोठ्याने बोलणार, आईला बोलू देणार नाही, प्रत्येक ठिकाणी, नको त्या ठिकाणी उचकवाचक करणार, विचित्र वागणार, ऐकणार तर नाहीच नाही. हे जरा वेगळे वाटले. बरं, हे त्यांच्या घरात धडपडत आहेत तोपर्यंत ठीक आहे.
पण तीच मुलं बाहेर कोणाच्याही घरी गेली की पुन्हा तेच करतात, जसे काही सगळीच घरे त्यांचीच आहेत! एकतर सासरकडची माणसं आल्यासारखी पहिल्यांदा सगळ्या खोल्यांमधे डोकावणार, प्रत्येक वस्तूला, ती कामाची असो वा नसो, हात लावणार; कोणतीही माहिती नसताना, ती त्यांच्या उपयोगाची नसतानाही वस्तू उलटंपालटं करून बघणार. बाप रे!
काय हे, आणि का हे? असं सगळं का बदललं? उगाच एखादं अपवाद सोडलं तर सगळ्याच लहान मुलांमध्ये सातत्याने अस्वस्थता का आहे? एका जागी स्थिर बसणे (घरी असताना, बाहेरचे लोक आलेले असताना, किंवा आपण बाहेर गेलो असताना) हे क्रमप्राप्त नाही का?
मैदानात खेळा, बिनधास्त उड्या मारा, पळा, चढा-उतरा, मस्ती करा, कारण ते ठिकाणाचं तसं असते. घर आणि बाहेर ह्यात फरक आहे हो! एक काहीतरी ठरवा. तुम्ही इतक्या लहान वयात इतके शहाणे झाला आहात का? मग तेच प्रत्येक ठिकाणी दृश्य दिसू दे, अभ्यास, पाठांतर, लिखाण, हस्ताक्षर, जेवण, झोप, खेळ, इतरांशी वागणं, ई. मधे. वाटेल तेव्हाच फक्त शहाणपण दाखवणे म्हणजे जरा मला वेगळे वाटायला लागले आहे.
अर्थात माझे हे फक्त निरीक्षण आहे, जे सातत्याने माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले म्हणून मी अवाक् झाले. माझा काहीही संबंध नाही त्या मुलांशी किंवा पिढीशी, पण धक्का बसला हे नक्की. उगाचच मोठं व्हायची घाई झाली आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला तर चमत्काराची वाट आहे!