माझ्या आईकडे हा एक फार आवडीचा न्याहारीचा पदार्थ होता. कारणं अनेक आहेत, एक म्हणजे फारच कमी वेळा ब्रेड घरी येत असे, त्या मुळे हा नेहमीचा पदार्थ नव्हता आणि विविध भाज्या घालून केलेला रंगीबेरंगी, पट्टाकिनी होणारा असा, चटपटीत देखील, आणि पोटभरीचा. बाप रे, वर्णन करू तेवढं थोडच आहे ह्या पदार्थाचं.
हो आज सकाळी माझ्या कडे हेच होत आणि करता करता मला एक किस्सा आठवला, म्हटलं चला लिहुयात, पट्टाकिनी.
माझा एक मामे भाऊ होता. त्यांचं कुटुंब अकोल्याजवळ एका छोट्या ठिकाणी राहत असे, कारण तो तेथील बँकेत पदाधिकारी होता. त्याला तीन मुलं. त्याच्या सर्वात लहान मुलाला काहीतरी उपचार करण्याकरता त्यांना मोठ्या शहरात यावं लागत असे. आम्ही नागपुरात राहत असल्यामुळे मग ते नागपूरला येणं प्रिफर करायचे. पाच-सहा महिन्यातून एकदा यावं लागत असे, ज्या प्रमाणे डॉक्टर सांगतील तसे. मग काय त्यांना आमच्याकडे येणं म्हणजे उपचार+सहल होती. मोठी सुमो नावाची गाडी भाड्याने घेऊन निघायचे आणि आई बाबा तिघे मुलं ड्राइवर आणि बाकी बँकेतील गाडीत मावतील / जागा असेल तेवढी अजून काही मित्रमंडळी. माझ्या त्या भावाला हा ब्रेडचा चिवडा आणि त्यातल्या त्यात माझ्याच हातचा फा$$$$$रच आवडायचा. इतका कि तो एकदा बशीत / मोठ्या वाटीत / डिश / बोल ... मधे दिलेला संपला कि चमच्याने वाटी वाजवायला सुरु करायचा. आणि जोवर मी त्याला पुन्हा दुसरा राऊंड वाढत नाही तोवर वाजवतच राहायचा. साधा चिवडा तो, पण काय त्याला आवडायचा म्हणून सांगते. खाता खाता इतक्यांदा म्हणायचं "कित्ती झका$$$स करतेस ग तू".
आज देखील टचकींनी पाणीच आलं डोळ्यात ह्या सगळ्या प्रसंगाची आठवण होऊन.
न मागता मिळाली दाद किती वर्ष लक्षात राहते नाही. सहीच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा