सध्या "वर्क फ्रॉम होम" चालू असल्यामुळे मागे लिहिल्याप्रमाणे "रिकाम्या जागा भरा", ह्या नियमावली प्रमाणे, मिटींग्स च्या आणि क्लास च्या अधे मधे वेळ मिळाला कि घर काम थोड्या प्रमाणात करायचं, बाकी ऑफिसची वेळ संपल्यानंतर.
साधारण पाच वाजता मी चहा करते सगळ्यांसाठी आणि चहा ठेवला कि पटापट ओट्यावरची आणि ड्राय बाल्कनीतली वाळलेली भांडी आणून जागेवर लावायची, हे पण चालतंच सोबत, चहा कडे लक्ष देत देत. तेव्हा माझी ड्राय बाल्कनीतली एक चक्कर कमी करण्यासाठी मी माझ्या हाताचा, बोटांचा पुरेपूर वापर करून घेते रोज. एकात एक अनेक भांडी ठेवायची आणि तो स्टॅक उचलला हातात कि बोटात कपांचे कान वापरून लटकवायचे आणि मग अशी माझी भांड्यांसकट वरात घरात. ते ४ किंवा ५ कप / मग बोटात लटकवले रे लटकवले कि मला असं वाटत कि मी चहावाला झाले आहे, तात्पुरती हो. चहावाले जे चहा वाटायला जातात ते देखील असंच काही करतात ना. अर्थात हि फार जुनी पद्धत झाली, आता तर काय सगळंच प्लास्टिक नाही तर पेपरमय झालंय.
खैर, असो, मला लै भारी मज्जा येते आहे, रोज संध्याकाळी चहावाला होण्यात वेगळाच आनंद मिळतो आहे, म्हटलं लिहावं, म्हणून हा पंक्ती प्रपंच.
आणि हो, टेम्परवारी=टेम्पररी हा माझ्या घरी काम करणाऱ्या मावशीचा आवडीचा शब्द बरं का, हाफिस = ऑफिस, असे अनेक आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा