रविवार, १६ मे, २०२१

मेतकुट

मेतकुट -
माझ्या लहानपणीची गोष्ट आहे, मला फोडणीचा भात अक्का मेतकुट भात फारच आवडायचा. इतका कि कधी कधी मी जिद्द करायचे कि मला फोडणीचा भातच हवा, आत्ताच्या आत्ता. तर आई म्हणायची, बरंच समजावून सांगायची कि कालचा भात संपला, पुन्हा कधीतरी करू वगैरे. अर्थात मोठी झाले नंतर पण आवड संपली नाही आणि बरेचदा आईला ताज्या भाताचा हि मेतकुट घालून फोडणीचा भात करावा लागलाय बरेचदा. असो. अजूनही मी लहानच आहे कारण आजही सकाळी मी ताज्या भाताला फोडणी घालून मनसोक्त खाल्ला फोडणीचा भात. मेतकुट हे प्रकरण माझ्या साठी फारच आवडीचं आणि अर्थातच पौष्टीक असल्यामुळे बऱ्याचदा वापरलं जातच.

मेतकुट -
हे प्रेम भातावरच थांबलं नाही बरं का मंडळी. काय सांगू आमच्या घरी दडपे पोहे हे हि नियमित होणारा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे जो कि मेतकूटाशिवाय मी कल्पनाही नाही करून शकत. अर्थातच बऱ्याच पद्धतीने करतात दडपे पोहे, पण मी भरपूर मेतकुट वापरूनच करते आणि आज पर्यंत ज्यांना ज्यांना खिलवले आहेत हे पोहे त्यांना फारच आवडलेत. तर लवकरच या सगळे दडपे पोहे खायला.

मेतकुट-
माझी आई एक वेगळ्याच प्रकारची कोशिंबीर करायची, वाफवलेले बटाटे, फोडणी, दही थोडंसच आणि अर्थातच मेतकुट. अहाहा, हे लिहितांना सुद्धा मला माझी आई, आमचं स्वयंपाक घर, टेबलावर ठेवलेली ती कोशिंबीर सगळं म्हणजे सगळं जसंच्या तस्सं डोळ्यासमोर उभं ठाकलंय आत्ता. तिच्या हातची चव मला कधीही जमली नाहीच. पण अप्रतिम लागतं हे नक्की.

मेतकुट-
आमच्या कडे खास करून पातळ पोह्याचा दिवाळीत होणारा आणि अर्थातच इतर दिवशीही होणार चिवडा मेतकुट घातल्याशिवाय कधीच पूर्ण झाला नाही. मी अजूनही घालतेच, अर्थात हाताला सवयच लागली आहे. मला कधीच सवय नव्हती आईला विचारायची कि का घालायचं मेतकुट? नाही घातलं तर काय होतंय ? वगैरे. त्यामुळे मी बघत बघत जे शिकले आणि आत्मसात केलं ते लक्षात राहील आणि वापरते पण आहे.

मेतकूट-
मऊ मेतकूट तूप भात तर जगातला सर्वात सोप्पा, प्रिय, उपयुक्त आणि रुचकर पदार्थ असणार. म्हणजे अर्थात असं माझं म्हणणं आहे.

मेतकुट -
साधारणतः जानेवारी २०२० ची गोष्ट असेल, मला असंच दडपे पोहे खाण्याची इच्छा झाली पण मेतकुट संपले होते. माझ्या सद्य स्थितीतल्या पायानी मी जवळपासच्या - दुकानात गेले, ते सगळे मारवाड्यांची दुकाने आहेत. पण मला असं वाटलं कि इतकी वर्ष पुण्यात धंदा करत असल्यामुळे त्यांना ठाऊक असेल मेतकुट म्हणजे काय ते, पण अहो आश्चर्य सुतराम माहिती नव्हती त्यांना, इतकं वाकडं तोंड केलं, आणि म्हटले "ये क्या होता है?". झालं माझ्या शुद्ध हिंदीत समजावण्या पेक्षा मी काढता पाय घेतला....

मेतकुट-
माझ्या अनुभवाप्रमाणे मेतकुटाचं आयुष्य थोडंच असतं, म्हणजे फारच थोडे दिवस ते टिकत. पाकिटावर पण तारीख फार जवळची असते. कदाचित त्यांना माझी आवड माहित असेल, आणि खात्री असेल हि मी हे लवकरच संपवणार, म्हणूनही असेल कदाचित. असो. तर एकदा काय झालं, मी अमेरिकेत घेऊन गेले होते मेतकुट पण ते संपलं खूप लवकर. आता काय करायचं. तेव्हा गुगल बाबा इतका प्रसिद्ध नव्हता, आईला विचारून विचारून मग शेवटी घरीच केलं एकदाचं. फार बारीक झालं नाही विकत मिळत तसं पण समाधान इतक जबरदस्त होत कि जे शब्दात मांडणं मला शक्य नाही.

तर अशी हि मेतकुटाची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...