रविवार, १६ मे, २०२१

तबक

 माझ्या लहानपणीची गोष्ट. किंबहुना मी वेगवेगळ्या तबकांना बघत, अनुभवतच मोठी झाले असं हि म्हणायला हरकत नाही. तर त्याच असं झालं कि मी मूळ नागपूरकर. माझ्या लहानपणी आमच्या घरी, नातेवाईकांकडे, काही मैत्रिणींकडे, आजूबाजूच्या घरांमधे तबक हे टि-पॉय वर मांडून ठेवलेलंच असायचं. त्यात मुख्यत्वे सोफ, सुपारी (पांढरी, चिकन, लाल, कातरलेली), लवंग, विलायची, कथ्था, चुना, अडकित्ता, पान . असायचं. घरी येणारे सगळेच बहुतेक ह्या पैकी काही तरी ग्रहण करायचेच. माझी छोटीशी पण अनेक वर्ष चुकता सांभाळली भूमिका फार महत्वाची होती, ती म्हणजे नियमितपणे चुन्यात अगदी थोडं पाणी घालायचं म्हणजे तो कोरडा नको पडायला, आणि पान लावतांना सांड लवंड झालेली साफ करायची. उहाळ्यात पान कोरडी होऊ नयेत म्हणून त्यांना सुबक छोट्या किंचित ओल्या कपड्यात गुंडाळून ठेवायचं. अहाहा असं वाटायचं कि मी कित्ती मोठं काम केलंय, देवा.

मी कित्ती प्रकारची तबके बघितली आहेत माझ्या उभ्या आयुष्यात, स्टील ची, प्लास्टिक ची, रंगीबेरंगी, छोटी, मोठ्या आकाराची, गोल, चौकोन अहाहा... "काय वर्णू तव गुण..."

पावसाळ्यात सोफ सरदलेली असायची, म्हणून आई त्याला भाजायची, संपूर्ण घरात वेगळाच सुगंध / घमघमाट सुटायचा. त्यात हि विविधता होती, कधी फक्त भाजायची, काही अगदी थोडं मीठ घालायची तर कधी हळद. तसाच ओवा देखील... उन्हाळ्यात गुलकंदाला स्थान मिळायचं या तबकात. क्वचितच "चमन बहार" नावाचा मसाला दिसायचा तबकात. अनेक पौस्टिक पदार्थ एकत्र करून / भाजून आणि त्यानंतर कुटून (खलबत्यात) बारीक मसाला सुपारी तय्यार करायची आई. त्यामुळे पान लावतांना असंख्य प्रकारे ते चाखता यायचे.

त्या काळी मला कित्ती प्रकारे विडा लावता यायचा, एक पान ते पाच पाने मिळून, सहज खाण्यासाठी ते महालक्ष्मीच्या नेवेद्या करता. सुबक दिसायचे ते विडे. ह्या सगळ्यांचा राजा / मुकुट / शिखर म्हणजे तांबूल (माझ्या दृष्टीने). कारण मी छोटी असल्यामुळे मला प्रसाद म्हणूनच मिळायचा तांबूल, जास्त नाही. पण काय अप्रतिम जगावेगळी चव असायची त्याची. अजूनही पाणी सुटलं माझ्या तोंडाला.

प्रत्येक वेळी भाजी बरोबरच आठवड्याला पान यायचीच घरी, कधी कलकत्ता-पान, मोठी गडद हिरव्या रंगाची पान पण बघायला आणि चाखायला मिळायची. पानाची देठ व्यवस्थित खुडायची, शेवटचं टोक छोटंस काढायचं, प्रमाणात चुना काथ लावायचा, त्यात हवं तो माल-मसाला घालायचा आणि मग सुबक आकारात दुमडून द्यायचे किंवा त्याचा आस्वाद घ्यायचा... अशी एक फार आनंदाने करायची / सहज नियमित होणारी प्रक्रिया / गोष्ट होती त्या काळी. "अजी सोनीयाचे दिनू ..."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...