सोमवार, १० मे, २०२१

पंखे...

 भारतात माझ्या मते वर्षभर पंखे वापरले जातात. पंख्यांचं अनन्य साधारण महत्व आहेच आपल्या विश्वात, कारण रात्री शांत झोप लागण्या करता जेवढा पंख्याचा वारा आवश्यक आहे तेवढाच सकाळी उठायला आळस वाढवायला पण जबाबदार आहे. सारखा रात्र भर पंखा त्याच कार्य चालू ठेवतो, शरीराला जडत्व येत आणि मग थोडासा आळस वाटतो कधी कधी उठतांना. माझं पंख्याशी संभाषण होत बरेचदा, कारण कधी कधी छान झोप लागली असते आणि थोडासा पंख्याचा वेग कमी करावा कोणीतरी असं प्रकर्षाने वाटत, उठायचा कंटाळा आलेला असतो. आता संभाषण करण्या पेक्षा एक रिमोट लावून घेणार आहे पंख्याला म्हणजे सोय होईल माझी.

अगदी लहानपणापासून वैविध्य पंखे वापरले, अनुभवले, पहिले आणि चित्रात रेखाटले सुद्धा. माझ्या लहानपणी दिवे जाणे हि अति सामान्य गोष्ट होती, आणि नागपुरात गर्मी भयंकर त्यामुळे माझे आई बाबा अगदी हाताला रग लागेस्तोवर वर्तमान पत्राने वारा घालायचे मला, पंखा करायचे, म्हणजे मला शांत झोप लागेल. आणि त्याकाळी "विद्युत ऊर्जा रूपांतर परिवर्तक अक्का इन्व्हर्टर" हा प्रकार नव्हताच. त्यामुळे वर्तमानपत्र हाच पंखा.

त्यानंतर अनुभवलेले असंख्य पंखे ते असे:

  • भल्या मोठ्या डेसर्ट कूलर मधला आवाज करणारा पंखा, (त्याला दर वर्षी लावणं, पुसणं आणि ऋतू संपला कि पुन्हा सांभाळून ठेवणे हे भलं मोठं काम असायचं)
  • उभा पंखा जो हवा तिथे नेता यायचा, भिंतीवर लावलेला पंखा,
  • लग्न मंडपातले पाण्याचे फवारे उडवणारे पंखे, (लहान होतो, लग्न मंडपात जायचं म्हणजे बर्फाचे पाणी प्यायचे, आणि ह्या पंख्या समोर उभं राहायचं)
  • वातानुकूलित यंत्रातले दिसणारे पंखे, (ब्लेड फिरतांना दिसतात फक्त)
  • जपानी रंगबिरंगी हातात ठेवता येणारे,
  • स्वतः च्या डोक्यावर लावता येणारे छोटेखानी पंखे, (बँकॉक ला खूप पाहायला मिळाले)
  • बॅटरी वर चालणारे चेहेऱ्यासमोर धरता येणारे पंखे,
  • आजकाल नवीन निघालेले एका व्यक्तीला गार करणारे पोर्टेबल वातानुकूलित यंत्र आणि त्याचे दिसणारे पंखे,
  • टेबल वर ठेवण्याचे पंखे,
  • तीन / चार / पाच पात्याचे छतावरचे पंखे नेहेमीचे, (आजकाल त्यावर अप्रतिम नक्षी काम केलं असतं, विविध चित्र रेखाटलेली असतात, दिवे / झुंबर लावलेले)
  • आधुनिक न्हाणीघर आणि स्वयंपाक घरातले एग्झास्ट फॅन / "निष्कास पंखा",
  • बॅडमिंटन हॉल मधे छताला बसवलेले पंखे,
  • पाते नसलेले पंखे .


स्वयंपाक घरात छोटेखानी पंखा हे माझं कोणे ऐके काळी स्वप्न होत ते प्रत्यक्षात उतरलं माझ्या घरात आणि त्याचं अनन्य साधारण महत्व कळत उन्हाळ्यात पोळ्या करतांना, देवा.

तर असे हे विविध अंगी, रंगी, आकार प्रकारचे, देशी विदेशी बनावटीचे, अगदी जुने ते आधुनिक, . पंखे आणि संपूर्ण ठिकाण माझ्या डोळ्यासमोरून झर्र्कन आली आणि हे सगळं लिहिता आलं, भूतकाळात फिरून येता आलं आज.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...