माझ्या जीवनाचा अविभाज्य घटक आणि तो हि अनोखा असा चविष्ट, अहाहा, हे लिहितांना देखील तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. अर्थात दोन्ही गोड आणि तिखट प्रकार ह्या सांज्याचे मला फारच प्रिय. त्यात "चेरी ऑन केक" माझ्या आईच्या हातचं अप्रतिम चवीचं सगळं मग काय विचारता, ती सढळ हाताने भरपूर करणार आणि मी अतीव आनंदाने ते सगळे फस्त करणार नेहेमीच. हा सिलसिला अनेक वर्ष सलग चालू राहिला.
तर इतक्या प्रेम असलेल्या सांज्याचे काही किस्से मी आज येथे घेऊन आली आहे. मी जेव्हा एम टेक करत होते तेव्हा एका वसतिगृहात राहत होते. तेथे फक्त सणासुदीला च सांजा केला जात असे, तिखट सांजा. आणि प्रत्येक डोकी फक्त आणि फक्त एकचं वाटी, अधिक पैसे देऊ केले तरी नाही म्हणजे नाही. देवा. काहीच पर्याय नसायचा तेव्हा. नियम, कठोर नियम.
मग मी माझा अर्थात आमच्या दोघांचा भातुकली तत्सम संसार मांडला तेव्हा पासून मग काय विचारता "आज मै उपर आसमा नीचे..." असं काहीसं झालं आणि मीच होते, माझंच राज्य, तेव्हा पासून जे सुरवात झाली ते आजपर्यंत अविरत सुरूच आहे, वैविध्य प्रकारचे सांजे, गोड सांज्याच्या पोळ्या ई. आणि ते माझ्या लेकीला इतकं मनापासून सगळं आवडतं कि आता ती फर्मान काढते तिच्या अभ्यासाच्या रुटीन मधून तिला वेळ असेल तसा तीच करते आता गोड सांजा उत्कृष्ट आणि चविष्ट असा. अहाहा.
माझ्याच सारखी आमची एक दूरची नातेवाईक पण आहे, ती होम-सायन्स पोस्ट ग्रॅड्युएट आहे. त्यामुळे तिच्या कडे जेव्हा इडली चा बेत असतो तेव्हा नक्कीच गोड सांजा सगळ्यांना कमपलसरी खावाच लागतो. ते तीच विशिष्ट गणित आहे. तांदूळ डाळी सोबत गहू पोटात जाणं अत्यावश्यक आहेच. अहाहा. मी तिला एकदा फोन करून सांगणार आहे, कि तुझा इडलीचा बेत असेल तेव्हा मला कळवं म्हणून म्हणजे मला वेगळ्या चवीचा, वेगळ्या हातचा माझ्या अतिशय आवडीचा सांजा एन्जॉय करता येईल.
तर असा हा माझा आणखी एक सखा सांजा, दलिया हे त्याच आणखीन एक नाव. दोन्ही, म्हणजे ज्वारी / बाजरी आणि गव्हा च्या सांज्याशी माझं अनोखं नातं आहेच आणि ते सदोदित टिकून राहणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा