गेले अनेक दिवस सलग आम्ही अवेळी संततधार अनेक तास चालू असलेला पाऊस अनुभवतो आहोत. अगदी कंटाळा येण्याइतपत. काल अचानक उशिरा संध्याकाळी एक वेगळाच वास अनुभवाला, कशाचा होता कोणास ठाऊक. अर्थात पावसाळा सुरु झाला कि अधेमधे असे नको वाटणारे वास येतात. आम्ही रात्रीच जेवून बसलो होतो आणि पत्त्यांचा डाव अगदी रंगात आला होता. त्यामुळे सगळ्यांनाच उठून रूम फ्रेशनर आणायचा थोडासा आळस आला. मग मी खिडकी बंद केली आणि मला पॉंड्स टाल्कम पावडर चा डब्बा नजरेस पडला. म्हणून मी सहज हवेत थोडीशी पावडर उडवली, छताच्या दिशेने, म्हटलं सुंगंध येईल आणि सगळ्यांचं छान वाटेल. आणि तस्सेच झाले. मग लेक पत्ते वाटत होती म्हणून माझ्या हाताला चाळे सुचले आणि अजून थोडी पावडर उडवावी असं मनात आलं. पण काहीच होईना, अनेकदा प्रयत्न करून देखील एक कण पावडर बाहेर आली नाही. मग निरखून बघितलं तर असं आढळलं कि त्याच आउटलेट बंद आहे. मग अगदी थोडं उघडलं आणि पुन्हा प्रयत्न केला मनगटाला जोर आजमावला थोडासा आणि मला कळायच्या आत संपूर्ण सोफा, लॅपटॉप, जमीन कॉफी टेबल सर्वत्र पावडर च पावडर, बाप रे, देवा,
इतकं म्हणजे इतकं हसलोय सगळे एक सुरात खळखळून, कधीही म्हणजे कधीही न विसरणार प्रसंग. आम्ही नाहून निघालो पावडर ने कधी नव्हे ते आणि अचानक. पावडर वाया गेली, फरशी पुसावी लागली पाय घसरू नये म्हणून, लॅपटॉप साफ करावा लागला, पण पत्ते सोप्पे झाले हाताळायला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा