आमच्या घरासमोर एक भलीमोठी सोसायटी आहे आणि तेथे हाऊस किपींग च्या चमू मधे काम करणारी एक मावशी आहे. ती दररोज वायू वेगाने माझ्या घरासमोरून जाते - येते, अगदी ठराविक वेळेला. तिची शिस्त अगदी वाखाणण्यासारखी आहे, साधेच पण फार व्यवस्थित कपडे, साईड पर्स, मोबाईल ई. एकंदरीत फारच शिस्तीत. मला अगदी सकाळी दिसली कि गुड मॉर्निंग म्हणणार, संध्याकाळी दिसली कि चुकून मी गुड मॉर्निंग म्हणेन सवयीनुसार म्हणजे तिला बघितलं कि असं म्हणायचं, पण ती नाही, गुड इव्हनिंग दीदी. हसत खेळत मजेत सतत.
लॉक डाउन च्या दरम्यान सकाळी मला फिरायला जात येत होत आमच्या गल्लीत फक्त, तेव्हा एक दिवस मी तीच घर बघितलं. बाप रे, माझ्या अंगावर काटे आले. भयानक, फक्त चार मोडके पत्रे, त्यात भलं मोठं कुटुंब, आजूबाजूला हू म्हणून गवत, रस्त्यावर दिवे नाहीत त्यांच्या घराच्या आजूबाजूला पण हिच्या कडे बघून कदापि कळणार नाही, छे. तिचे साधे पण भावेल असे राहणीमान, स्मितहास्य, नो कंप्लेंट्स आणि उत्साह बघून कोणीही म्हणणार नाही ती इतक्या भयानक जागी राहते, आणि फक्त हाऊस कीपिंग च काम करते. फारच शिकण्यासारखं आहे, कधीच म्हणजे कधीच तिची कामाला जाण्याची वेळ चुकलेली मी बघितली नाहीच. संध्याकाळी परत येतांना नेहेमी हातात भाजी, अंडी नाहीतर काही तरी असतंच. परवा सहज लक्ष गेलं माझं कारण ते लक्ष जाण्यासारखंच होत, जवळपास ५ गड्ड्या मेथी होती तिच्या हातात, म्हटलं काय? एवढी मेथी का? "बहुत लोग है ना दीदी तो इतनी सब्जी तो चाहिए". देवा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा