माझ्या शालेय जीवनापासुन मला जे पुसटसं आठवत त्याप्रमाणे मी होमिओपॅथी औषध घेते जेव्हा लागेल तेव्हा. मला फार आदर आहे होमिओपॅथी बद्दल आणि ती प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर समुदाया बद्दल देखील. त्याची अनेक कारणे आहेत, जसे कि १. मला अनेकदा उपयोग झाला आहे, २. हि प्याथी शारीरिक आणि मानसिक स्तरावर काम करते, ३. स्वभाव जाणून मग औषध दिली जातात, म्हणजे प्रत्येक प्रकृतीनुसार औषध, पर्सोनालायझेशन जणू, ४. घ्यायला सोप्पी औषध आणि परिणाम अप्रतिम. असो, ही काही कारण झाली, अशी अनेक आहेत.
माझ्या काही डॉक्टरांनी मला अनेकदा विचारलेला हा प्रश्न आहे, उदाहरणार्थ तुमच्या स्वभावा नुसार तुम्हाला गरम प्यायला आवडतं का थंड?, किंवा गरम शेकलं कि बरं वाटत का गार? ई.
आणि माझं ठरलेलं उत्तर असायचं कि "गरम", कारण गार पासून मी कोसो दूर आहे. आणि मग त्यानुसार मला औषध दिली जायची आणि त्याचा परिणाम पण होत असे.
आमच्या "ह्यांचं" नेमकं उलटं, त्यांना सगळंच थंडगार पाहिजे असायचं आणि त्याने बरं पण वाटायचं. उदाहरणार्थ आईस-पॅक, तो जेल चा, जो थंडगार होण्यासाठी सतत फ्रिझर मधे वास्तव्याला असतो, तोच. आणि मला कधीच म्हणजे कधीच तो आवडला नाहीच, किंबहुना ती कल्पना पण आवडली नाही, कधीही प्रयोग करून बघावासा वाटलं नाहीच. असो.
काल सकाळी घाईघाईत अंघोळीच्या आधी म्हटलं नेहेमीच्या सवयीप्रमाणे बाथरूम वर हात फिरवावा, मलाच स्वच्छ वाटत, अजून काही नाही आणि गम्मत झाली. माझ्या बाबांची प्रकर्षाने पुन्हा एकदा आठवण झाली मला त्यावेळी. मी त्यांना सांगितल्या सांगितल्या आधी बाथरूम मधे जाऊन त्यांनी निरीक्षण केलं असत आणि म्हटले असते "बघू या, बाथरूम मधे किती खड्डे पडले ते, किती दुखापत झाली ती?" ई. आपटले ना मी. मग काय बसले आहे गुढघा धरून कधी नव्हे ते कालपासून. गेले फिसिओथेरपी च्या माझ्या हक्काच्या मैत्रिणीकडे. तिने बघितल्या वर सांगितलं कि आईस-पॅक लावणे, सूज कमी झाली कि बरं वाटेल ई. तेव्हाच डोळ्यासमोर तारे चमकले माझ्या, म्हटलं आली की पंचाईत आता. तरी मी दोनदा विचारलं बरं का डॉक्टर ना, गरम पॅड नाही का चालणार? उत्तर "नाही" असं मिळालं. घरी आल्यावर आईस-पॅक लावण्याशिवाय पर्याय नव्हता कारण वेदना होत होत्या. तुम्हाला सांगते माझंच मला महद आश्चर्य वाटतंय काल संध्याकाळ पासून ते आता पर्यंत मी सतत तो आईस-पॅक लावून बसते आहे, आणि मला आता बराच फरक जाणवतो आहे. मग सहज एक विचार मनाला शिवून गेला, एवढा बदल घडतो माणसाच्या मुळ स्वभावात? ते हि माझ्यासारखीच्या? पण झालायं हे हि सत्यच आहे. मला इतका आवडतोय तो आईस-पॅक आता, कि ज्याचं नाव ते. आणि फक्त दुखऱ्या भागावर नाही तर संपूर्ण पायावर लावून प्रयोग करणं सुरु केलंय मी. कोण जाणो,माझ्या जुन्या पायाच्या दुखण्याचा हा रामबाण इलाज असेल कदाचित.
#nature #homeopathy #ice-pack #knee-injury #physiotherapy
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा