रविवार, १३ जून, २०२१

पंचपाळ

 हा एक दुर्मिळ वाटणारा शब्द आज कित्येक वर्षांनी कानी पडला. पंचपाळ हे देवघरात आणि पंक्ती वाढते वेळी कामात येणार भांडं. त्यात पाच खाणे असायचे. देवघरात हळद, कुंकू, अक्षदा, गुलाल / बुक्का, अंगारा अश्या किंवा तत्सम वस्तू त्यात असायच्या. घरी अनेक प्रसंगावेळी पंक्ती वाढतांना दोन प्रकारचे पंचपाळे वापरले जायचे एक चटण्या कोशिंबिरीकरता आणि दुसरे भाज्यां करता. कधी पाच ऐवजी तीन खाणे पण असायची ह्या भांड्यात. माझ्या सारख्या उत्साही लहान वयाच्या वाढप्याला चटणी कोशिंबीर मीठ . चे पाळे मिळायचे नेहमीच, गरम भाजी वाले नाही. असो. तर आता हे पंचपाळे फक्त थाळी उपाहारगृहातच आढळते सहसा. घरी नेहेमी होणाऱ्या पंक्ती जरा दुर्मिळच झाल्यात.

तर आज हा शब्द माझ्या कानावर पडण्यास कारण माझ्याकडे काम करणाऱ्या मावशी. त्यांच्या घराची वास्तुशांत आहे पुढील आठवड्यात आणि त्यांनी परत-भेट (return-gift) म्हणून प्रत्येक सवाष्णी साठी पंचपाळ आणलंय. म्हणून हा छोटासा लिहिण्याचा प्रयन्त.

ह्याच पंचपाळ्यातला एक खास पदार्थ म्हणजे वाटली-डाळ. नेहेमीच नेवेद्याच्या ताटात असणारा आणि अगदी अल्प प्रमाणात वाढला जाणारा पदार्थ. माझी स्वारी सर्व पंक्तीमध्ये अग्रज, छोट्या हातांनी मदत करायला आणि यथेच्य खायला सुद्धा, नखरे माहीतच नव्हते. तर पंक्तीच्या नियमानुसार मिठाच्या बाजूला ह्या वाटल्या डाळीला स्थान असायचे. पण मला तर ती प्रचंड आवडायची. तर भर पंक्तीत मी एकदा वाढणारीला म्हटलं होत देखील, "कमी आहे का डाळ?, नाही ना?, मग जास्त वाढ कि जरा....." त्या दिवशी पासून ओळखीच्या ठिकाणी मला जरा जास्तच डाळ वाढली जायची.

खूप खूप आठवणी ताज्या झाल्या आज आणि त्या वाढणाऱ्या ताईची आज मी जाहीर माफी मागते मी असा म्हणायला नको होत.

काय भन्नाट भांड आहे हे. खरंच आणि ह्या भांड्यातून वाढणं ही एक छोटी कलाच आहे, मज्जा होती बालपण म्हणजे आणि माझ्या आई-बाबानी सर्व ठिकाणी नेल्यामुळे ह्या आठवणी जमा झाल्या. त्या काळी मेहूण बोलवायची पद्धत होती आणि माझ्या बाबाना जेव्हा यजमान म्हणायचे कि "बर झालं तुम्ही मेहूण म्हणून आलात, खूप छान वाटलं...." तेव्हा माझे बाबा म्हणायचे "मेहूण नाही हो मी-हुन आलोय ...". अनेकविध आठवणीच राहिल्यात आता, पण त्या खूप गोड अश्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...