शनिवार, ५ जून, २०२१

माझे विद्यापीठ ....

आज बरेच वर्षांनी एक मनापासून प्रिय अशी गोष्ट मला करता आली. आमच्या कचेरीत एक राखणदार काम करतो. तो बंगाली आहे मूळचा, अनेक वर्ष पुण्यात राहतो पण तेवढी मराठी अजून येत नाही. त्याला एक फॉर्म भरायचा होता जो कि मराठीच होता. मला आवडलं ते काम आणि मी त्याला मदत केली ते प्रश्न समजावून सांगायला.

मी शाळेत जाणारी छोटीशी मुलगी जेव्हा होते तेव्हा माझे वडील आवर्जून मला बँकेत घेऊन जायचे. उन्हाळ्याची सुट्टी आणि काही मोठी सुट्टी आली कि वडिलांबरोबर बँकेत जाण ठरलेलच असायचं. त्यावेळी बँकेचे डेस्क हे फारच उंच असायचे कारण तेव्हा प्रचंड मोठे रजिस्टर्स असायचे सगळे व्यवहार लिहून ठेवायला, त्यामुळे. मला छोटी असल्यामुळे काहीच दिसायचं नाही, तर बाबा मला त्या डेस्क वर बसवायचे. अजूनही आठवत मला. पण ते म्हणायचे कि तुला सगळं माहित असायलाच हवं. शिक हळू हळू, बघून. अजून एक प्रकर्षाने करायची गोष्ट म्हणजे किंवा माझ्या बाबाचा अलिखित नियमच होता, बँकेत गेलं कि जे गाव खेड्यातले लोक येतात बँकेत व्यवहार करण्यास आणि त्यांना स्लिप भरून हवी असते त्या सगळ्यांना व्यवस्थित ती भरून द्यायचीच. आणि मला हि ते अगदी मनापासून करायला आवडायचं, का कुणास ठाऊक. मला काही मिळायचं वगैरे नाही हे सगळं केल्यावर बाबांकडून पण मी सातत्याने करायचे आणि ते हि मला कंटाळता सगळीकडे घेऊन जायचेच.

आज त्या राखणदाराचा फॉर्म भरतांना माझे डोळे पाण्यानी डबडबले... सगळं सगळ जसच्या तस्स आठवलं, अक्षरशः डोळ्यासमोर चित्र उभं राहील, बँकेची इमारत, त्यातलं फर्निचर, ते सगळे पारंपरिक पोशाखातली माणसं, त्यांच्या डोळ्यातली चमक मी फॉर्म भरून दिल्यावर दिसणारी, आणि बरंच काही.

काय सुरेख आठवणी आहेत माझ्या लहानपणीच्या.

मागे एकदा लिहिल्याप्रमाणे माझे वडील म्हणजे संपूर्ण विद्यापीठच होते माझ्या साठी. आता फक्त आठवणी राहिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...