आमच्या घरा शेजारी च अग्रज नावाचे फारच बहुउपयोगी दुकान आहे. त्यात महाराष्ट्रीयन आणि बाकी खाण्याचे पदार्थ, कोरडे पदार्थ, काही ताजे पदार्थ आणि साहित्य मिळतं, हवं ते. खजिनाच आहे तो एक वैविध्य पदार्थांचा आणि विविधतेचा.
त्यांची माझी फारच छान मैत्री आणि ओळख आहे, कारणं अनेक आहेत, आम्ही दोघी नागपुरच्या, त्यांचा मुलगा पण LIT चा विध्यार्थी, त्यांचा स्वभाव फार फ्रेंडली आणि दोघी बडबड्या, मग काय. काहीही मागवायचं झालं कि एक निरोप पाठवायचा, बास, हजर ताबडतोब, काही वेळातच. फोन करावा लागत नाहीच. परवा अशीच यादी पाठवली, त्यांनी ती वाचली आणि अचानक त्यांचा फोन आला, मला जरा आश्चर्यच वाटलं. म्हटलं असो, बघुया. त्या यादित बाकी गोष्टींबरोबर फिंगर अशी नोंद होती. फोनवर त्या विचारतात हे फिंगर काय? काय पाठवायचं नक्की? मग त्यांना मी वर्णन केल्यावर त्याला बॉबी म्हणतात असं त्यांनी सांगितलं. मला ऐकिवात होता हा शब्द पण माझ्या साठी प्रचलित नाही. कदाचित लहानपणी प्रत्येक बोटावर एक एक घालून खाल्यामुळे मला ते लहानपणीचे दिवस आणि त्या अप्रतिम दिवसाचे फिंगर्स एवढंच माहित आहे. मस्त हशा पिकला आमच्या दोघींमधे.
माझी ह्या फिंगरची ओळख शाळेच्या बाहेर टोपलीत मावशी घेऊन बसायच्या ते बघून झाली. आणि मग मैत्रिणीकडे किंवा घराबाहेरच आधी खाल्याचं आठवतंय. मग मुलांसाठी घरी आणून तळून देत असे कधी कधी. आणि अर्थातच माझीच मुलं ती, त्यांना पण मी शिकवलं होत मुळात हे फिंगर कसे खायचे ते. लहानपणी त्यांना फारच मज्जा वाटत असे. त्यामुळे कदाचित मला बॉबी हे नामकरण झालेलं माहित नव्हतं.
मग काय त्यांनी (अग्रजच्या नेमाडे वहिनींनी ) मला दोन पर्याय दिले, कच्ची बॉबी पाठवू का तय्यार? म्हटलं तय्यार पाठवा. पाठवलं त्यांनी सगळं ताबडतोब. दोन दिवसांपासून तोच आमटी भात जास्त चविष्ट लागातोय. मज्जा येते आहे.
आज सहज वेद ला म्हटलं कि जरा घटक पदार्थ बघ रे काय असतात ह्या बॉबीत? मला जरा उत्सुकता होती कि बॉबी कशा पासून तय्यार करतात हे जाणून घ्यायची. तो वाचून सांगत होता तेव्हा आम्ही सगळे उडालोच. तिथे लिहिलं होत, घटक पदार्थ: कच्चे बॉबी आणि तेल म्हणे. बापरे, पोट दुखे पर्यंत हसलो. ज्याच्या कोणाच्या सुपीक डोक्यातून हि कल्पना आली आहे त्याला माझा साष्टांग नमस्कार.
तर असा हा बॉबी अक्का फिंगर चा एवढ्यातच घडलेला छोटेखानी किस्सा.
#bobby #finger #snacks #fried #ingredients #agraj #food-store #awesome-memories #great-time
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा