मला नायगारा सारख्या अभूतपूर्व विशालकाय धबधब्याचं ४-५ वेळा दर्शन घडलं, प्रत्यक्ष. अहाहा, काय सुंदर, जगावेगळा देखावा होता तो. माझ्या कडे शब्दच नाहीत वर्णन करण्याकरता.
तो धबधबा जवळून बघण्यासाठी किंवा त्याच्या खालच्या भागात चक्कर मारण्यासाठी सोय आहे आणि बहुतांशी एक प्रकारचा प्लास्टिक सारख्या पातळ वस्तूपासून तय्यार केलेला एक झगा देतात परिधान करायला. आणि तो घालायला पण फारच मज्जा येते, जोकर दिसतो सगळे. एक छोटीशी टोपी आणि सरळ डोक्यातून घालण्याचा सोप्पा पोशाख. धबधबा चा मनसोक्त आनंद उपभोगला कि तो झगा तिथे शिस्तीत ठेवलेल्या डब्ब्यात टाकून यायचा असतो. म्हणजे तो पुन्हा प्रक्रिया करून रिसायकल करता येतो.
मी २००५ पासून पुण्यात आज पर्यंत बघते आहे, कि असंख्य जण दुचाकीवर भलताच रेनकोट घालून चालवतात गाडी. पुण्याचा सध्याचा पाऊस मंडळी, आणि हा अनोखा रेनकोट, त्यात दुचाकी, अहाहा, काय मस्त कॉम्बिनेशन आहे, देवा. नीट, माझ्या चार डोळ्यांनी पाहिल्यावर समजले कि तो रेनकोट नाही आहे, तो त्या नायगारा धबधब्यापाशी जाण्यास जो अतिशय पातळ, एकदा वापरण्या जोगा दिलेला पोशाख / झगा आहे. मी निशब्द झाले, काय आहेत ना हि सगळी मंडळी. खरंच, विचाराची कमाल आहे, पैसे वाचवणं, वस्तू पुन्हा पुन्हा वापरणं कोणी ह्यांच्या कडून शिकावं.
मला कसं समजलं कि तो तोच झगा आहे? त्या झग्या मागे त्या प्रवासी कंपनीचा लोगो एक विशिष्ठ पद्धतीने छापलेला असतो. दुरून बघितला कि सहज ओळखू येतोच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा