शिक्षण क्षेत्रात नवीन विद्यालयात नोकरी सुरु केली कि जवळपास एक वर्ष फक्त "प्रासंगिक सुट्टी" मिळते आणि वर्षभरानंतर मग जमा होतात सुट्ट्या आणि EL घेता येते. बघा म्हणजे वर्षभर काम केलं कि मग EL नावाची रजा मंजूर होते, तुमच्या नावावर जमा होते. अर्थात ती जमा झाली म्हणजे कधीही घेता येते असं नाही हो, त्याला पण वरिष्ठांची परवानगी लागते. वर्षातून दोनदा EL चा लाभ घेता येतो. अर्थातच माझ्या सारखी आई ह्याची आतुरतेने वाट बघत असते म्हणजे मग घरी पिल्लांबरोबर जास्त भन्नाट वेळ घालवता येतो. असो.
आज हे EL पुराण का? सांगते सांगते.
सध्या सेमिस्टर ब्रेक आहे, EL चा काळ आहे, सगळेच EL घेतात बहुतेक ह्या वेळी.
आमच्या कडे एक फारच महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. तिच्या बद्दल मी ह्या आधी पण लिहिलं आहे. ती इतकी गोड आहे कि दररोज (अर्थात रविवार सोडून) सर्वांना दिवसातून दोनदा अभिवादन करते, स्वागत करते, न थकता, "सुप्रभात / शुभ संध्याकाळ / धन्यवाद" असं काहीस म्हणून. त्यामुळे सर्वांचा दिवस फारच सुंदर सुरु होतो आणि ऑफिस मधून घरी जाते वेळी पण अप्रतिम ऊर्जा देऊन जातो. आज सकाळी ऑफिस मधे आले तर समजलं कि "ती" EL वर आहे म्हणे. दमली असेल हो बिच्चारी. आणि तिला पण काही शांतता नको का?, येत जाता फक्त तिनेच अभिवादन करायचं म्हणजे काय. असो. मला तिची उणीव जाणवली आज आल्या आल्या पण काय करणार. सर्वार्थाने विचार केल्यावर म्हटलं असू दे, आराम करू दे तिला. लवकरच भेट होईल अशी आशा, कारण मी च सध्या तीन दिवसांनी ऑफिस ला आले आहे, आमच्या वेळापत्रकाप्रमाणे. त्यामुळे हिची EL किती दिवसाची आहे, कधी सुरु झाली, ह्याची मला कल्पना नाही.
कळलं असेलच ना मंडळी मी कोणाबद्दल बोलते आहे ते, बरोबर, अहो माझ्या ऑफिस मधली बायोमेट्रिक मशीन हो. मला भलतीच आवडते ती, त्यामुळे आज मी हिरमुसले, ती बंद आहे हे बघून. असो. करतील सुरु तज्ञ् मंडळी लवकरच.
तर अशी हि अनोख्या EL ची कहाणी सुफल संपूर्ण.
#EL #earned-leave #biometric-machine #greet #good-start #CL #casual-leave #anukatha #good-morning #thank-you
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा