मी साधारणतः ८ वी पासून सतत माझ्या रोजच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर नेहेमी एक टायपिंग इन्स्टिटयूट बघत असे. त्या इन्स्टिटयूट च नावाचं इतकं आकर्षक होत कि ज्याचं नाव ते. मी खूप वर्ष वाट बघितली आणि सरते शेवटी दहावीचा शेवटचा पेपर झाला रे झाला कि गेले, त्या इन्स्टिटयूट च्या प्रमुख सरांशी बोलले आणि प्रवेश घेतला सुद्धा. ते प्रमुख इतके मोठे होते त्या वेळीच, हुद्याने, अनुभवाने, वयाने, प्रसिद्धीने ई. पण तरी देखील मी त्यांना सरळ सांगितलं कि मी संगणक इंजिनिअर होण्याचं ठरवलं आहे, त्यामुळे मला माझं लक्ष मॉनिटर कडे असायला हवं. त्या करता मी टायपिंग शिकणार आहे. त्यांना पण ते उत्तर अपेक्षित नव्हतचं, त्यामुळे आमची दोघांची गट्टी जमली ताबडतोब.
त्या नंतर मी पॉलीटेकनिक केलं, मग इंजिनिअरिंग केलं आणि त्या वेळी गुगल बाबा नव्हता, युट्युब नव्हतं, फक्त वाचनालय असायचं आणि संदर्भ ग्रंथ असायचे. त्यामुळे शिक्षकाने शिकवलेले प्रत्येक तपशीलवार लिहून ठेवणे आवश्यक असायचे. शिक्षक सांगते वेळी त्या गतीने जमेल तस्से टिपायचे कॉलेज च्या रफ वहीत आणि मग घरी येऊन नीट लिहायचं पुन्हा = फेअर करायचं. त्याला नोट्स असं म्हटलं जायचं. इंजिनिअरिंग झाल्यावर मग ती स्पीड विस्मृतीत गेली कायमची. पण काल अचानक मला एक साडे तीन तासाचे वेबिनार ऐकायचे होते आणि त्याचा रिपोर्ट / तपशील वरिष्ठांना द्यायचा होता. त्यामुळे कान देऊन ऐकण्याशिवाय टिपणं पण तितकच महत्वाच होत. बाप रे. वेबिनारच्या सुरवातीला अवघड वाटलं मला. मग मी विचार केला, पुन्हा एकदा तो वेबिनार चा व्हिडीओ ऐकू आरामात, पण स्क्रीन टाइम इतका वाढला आहे कि नको वाटलं. मग ती झपाझप लिहिणारी प्रिती आठवली आणि झाले सुरु. बास मग काय, संपूर्ण रिपोर्ट कधी तय्यार झाला ते समजलंच नाही. शिस्तीत त्याला रिपोर्टचा साज चढवला, संक्षिप्त ठळक मुद्दे दिले शेवटी आणि दिला पाठवून. अहाहा.
मी अनेकदा ऐकलं आहे, वाचलं आहे कि एकदा शिकलेल्या चांगल्या गोष्टी विस्मृतीत जात नाहीत. इतक्या वर्षांनी पुन्हा त्याच कॉलेज च्या बेंच वर विद्यार्थी बनून बसल्याचा आनंद घेता आला मला ह्या दिलेल्या कामामुळे. सगळे मित्र, मैत्रिणी, मॅडम, फळा आणि गमतीजमती आठवल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा