पाच एक वर्षांची असतील माझी पिल्लं तेव्हा आम्ही बंगलोर ला गेलो होतो माझ्या दिरांकडे. त्यांच्या सोसाटीत भरपूर चाफ्याची झाडं होती, भरपूर फुलांनी बहरलेली. इतकी बहरलेली आणि शिवाय छोट्या उंचीची चाफ्याची झाडं मी पहिल्यांदाच अनुभवत होते. पहिल्यांदा इतकी झाडं एक साथ पाहिल्यामुळे काही क्षण तर मी त्यांचा फक्त सुगंधच अनुभवत होते. मग तेच मी माझ्या दोघांना पण सांगितले आणि त्यांना पण तो सुवास भावाला. त्याच प्रमुख कारण म्हणजे मी ताबडतोब खाली पडलेली आणि थोडीशी ताजी राहिलेली फुल घेतली आणि त्याच्या पटापट असन्ख अंगठ्या केल्या. माझ्या दोन्ही पिल्लांच्या पिटुकल्या गोऱ्या गोमट्या बोटांमधे त्या इतक्या सुरेख दिसत होत्या म्हणून सांगते कि अगदी तो प्रसंग माझ्या डोळ्यादेखत आता उभा आहे असं च वाटतंय / जाणवतंय. ती कदाचित त्याची पहिलीच ओळख त्यांच्या स्वतःच्या अंगठ्याची. लहान असल्यामुळे त्यांना आम्ही घालत नव्हतो प्रत्यक्ष अंगठी बोटात. आणि ह्या त्यांच्या अंगठ्या त्यांना इतक्या आवडल्या कि ज्याचं नाव ते. मग त्यांनी पण करण्याचा सफल / असफल प्रयन्त केला आणि आम्हाला ह्या सगळ्यात खूप मज्जा आली. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा आम्ही चाफ्याची फुलं बघतो तेव्हा तेव्हा अंगठ्या करतोच. आता माझी मुलं एकदम परफेक्ट पद्धतीने त्या तय्यार करतात. आणि हो त्यांना एक गोष्ट फार भावली आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं देखील "मम्मा तू खालची फुलं का उचलली अंगठी करायला?". खालची चांगली फुलं च कशी उपयोगात आणायची आणि झाडावरची शोभा का कमी नाही करायची हे मी त्यांना पटेल असं सांगितलं होत तेव्हा.
कळतंय मला, प्रश्न पडले ना? कि आज हे अंगठी पुराणच का? सांगते हो, ऐका.
आज ऑफिस मधून संध्याकाळी बाहेर पडले तर काय उच्च कोटींचा आनंद / परमानंद झाला मला. अहो चक्क चाफ्याचं असंच छोटेखानी झाड फुलांनी बहरलेलं दृष्टीपथात पडलं ना माझ्या. मग मी थांबते कि काय, ताबडतोब अंगठी तय्यार केली आणि घातली पण. व्वा म्हणजे व्वा च. संध्याकाळी लेकाला फोन केला तेव्हा ताबडतोब म्हणतो कसा आज काही खास केलेलं दिसतंय किंवा खाल्लेलं. म्हटलं हो, मोठ्या आवाजात अक्षरश: ओरडत सांगितलं अंगठी बद्दल तर म्हणतो कसा "तू इम्पॉसिबल आहेस मम्मा". माझ्या अख्खा खोलीत त्या अंगठ्यांचा मंद सुगंध दरवळतोय अजूनही. निसर्गाची कमाल.
इतक्या प्रकारची फुलं आपण बघतो वापरतो, वाहतो, अर्पण करतो पण मला सांगा किती फुलांपासून भन्नाट सुगंध मिळतो, दरवळतो, टिकतो आणि आपण अंगठ्या करतो. फक्त चाफा. माझ्या वडिलांच्या घरचं चाफ्याचं झाड तर इतकं उंच होत कि दररोज गगनाशी संवाद साधत होत. अहाहा. त्या झाडाचा आणि त्यामुळे फुलांचा रुबाबचं अनोखा. नावाला फुल असण्यापेक्षा चाफ्यासारखे दरवळा आणि सर्वत्र आठवणीतल्या आनंदाचे क्षण निर्माण करा.
#Plumeria #Chafa #Chapha #FlowerWithFragnance #NaturalLongLastingFragrance #FingerRing #Art #fun #FunWithKids #FunWithFlower #RingWithFlower
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा