महाराष्ट्रात आमच्या पिढी पर्यंत प्रचलित बघण्याचा कार्यक्रम म्हणजे निश्चित कांदेपोहेच. का? खरंच माहित नाही. पण मोठी झाले ते हा वाक्प्रचार ऐकूनच. पण मला आजही कुतूहल हे आहे कि उपमा / शिरा / सांजा किंवा इतर भरपूर पदार्थ आहेत, मग पोहेच का? पोह्यात पण दडपे पोहे, तिखट-मीठाचे पोहे, मेतकूट पोहे, दूध पोहे आणि बरेच प्रकार.
शोधता शोधता इतक्या वर्षांनी आज लिहिण्याचा आणि विचार करण्याचा जेव्हा योग आलाच तेव्हा असं लक्षात आलं (हे सर्वश्रुत आहे खरं) पोहे सोडले तर बाकी सगळ्या पदार्थात पाणी घालावं लागतं, भाजावं लागतं त्यामुळे ते पदार्थ बिघडण्याची शक्यता असते. शिवाय पोहे हा प्रकार बहुतांशी सगळ्यांनाच भावतो कारण तो प्रसन्न दिसतो, रंगीबेरंगी असतो, पौष्टिक, पोटभरीचा देखील आणि चटपटीत. खास काही तय्यारी शिवाय पटकीनी होणारा असा. वाटाणे, मिरच्या, कोथिंबिरीचा हिरवा, गाजर आणि तिखटाचं लालसर, हळदीचा पिवळा आणि थोडेसे कांदे करपू दिले तर त्याचा कथ्था, मोहोरीचा काळसर आणि जिऱ्याचा तपकिरी ई. वैविध्य रंगानी नटलेले. तिखट, आंबट, गोड, खारट चव असेलेले मऊ पहिल्या वाफेचे आणि अधेमधे चवीला बहार येण्यासाठी आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी शेंगदाणे / काजू, बारीक शेव कुरकुरीत आस्वाद देणारी आणि ओल्या नारळाने पांढरा रंग चढवून पौष्टिकता बहाल करणारा असा हा एकमेव पदार्थ, अगदी आयुष्यासारखाच. पोहे करणं सोप्प दिसत असलं तरी देखील सगळं साग्रसंगीत व्यवस्थित प्रमाणात घातलं गेलं पाहिजे नाहीतर हवी तसे चविष्ट होणार नाहीत. हे दर्शवण्यासाठी म्हणून कदाचित दोन कुटूंबियांची ओळख होतांना पोहे साक्षीदार असतात, माझ्या मते आणि त्यापुढील वाटचाल पण मग तशीच चविष्ट चवदार होते, टिकते, राहते आणि बहरते देखील. बहरते ह्या करता कारण संपूर्ण कुटूंबीय, सदस्य, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारपाजार आणि इतर सगळे एकत्र तुमच्या आयुष्याचे, त्यातल्या प्रत्येक क्षणांचे साथीदार असतात आणि राहावे तरच पोह्याला चव येणार ना? हे प्रत्येक घटक महत्वाचेच.
https://www.lyricsmarathi.in/2021/08/kande-pohe-ayushya-he-chulivarlya.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा