सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

२१

एकेवीस हा तर आपल्या गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असा आकडा. अर्थात सगळेच आकडे उत्तमच असतात, जसं बघू तसं आहेच, पण आज २१ बद्दलच लिहायचं ठरवलं म्हणून ती सुरवात केली हो. ह्या वर्षा च्या सुरवातीलाच अंदाज बांधला होता कि बाप्पाच्या कृपाशीर्वादाने हे देखील वर्ष भन्नाट जाणारच, आणि तस्सेच झाले. कसे? सांगते ऐका.

आमच्या पहिल्या मालकीच्या घराला नवीन साज चढला आणि लवकरच ते आमच्या आगमनाची वाट बघत आहे. राहतं घर विकण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्याचं धाडस करता आलं लेकाचे शिक्षण अडथळ्याशिवाय व्हावं म्हणून.

आज तागायत १९९५ पासून शिकवण्याचा सुरु झालेला प्रवास हा फक्त आधीपासून स्थापन झालेल्या संस्थेतच सुरु होता. स्वप्नवत वाटणारी संधी चालून आली आणि सत्यात उतरवता आले असे कधीही न बघितलेले स्वप्न एक अख्ख नवीन तांत्रिक शिक्षण संस्था चालू करण्याचं. सप्टेंबर ते डिसेंबर ह्या अवघ्या काही महिन्यात प्रचंड पाठबळामुळे, उत्कृष्ट अश्या सह पाठ्यांमुळे आणि मुळातच संस्थेचं / विद्यापीठाचं नावच इतकं मोठं आहे कि त्यामुळे मला शक्य झालं. ह्या चार महिन्यांच्या प्रवासात किती म्हणजे कित्ती वैविध्य व्यक्तिमत्व बघता, वाचता आणि समजावून घेता आले. सुवर्ण नव्हे प्लॅटिनम संधी होती माझ्या साठी. एक साधी लेक्चरर ते डेप्युटी डायरेक्टर ह्या पदापर्यंत मजल गाठता आली.

४ महिने सलग पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत पंचतारांकित वसतिगृहात राहायला मिळालं, चारीठाव आयतं आणि वैविध्य खायला मिळालं, प्रसिद्ध लढाऊ वैमानिक ज्याने आपल्या देशाची तब्बल ३७ वर्ष सेवा केली अश्या व्यक्तिमत्वाशी फक्त ओळखच नाही झाली तर एक जगावेगळं नावीन्याने नटलेलं भाऊ-बहिणीचं नातं निर्माण झालं, माझ्या अगदी अत्यंत प्रिय अश्या नागपूर शहरात पुन्हा एकदा वास्तव्य करता आलं आणि सगळ्या जुन्या मित्र मैत्रिणीची पुन्हा भेट झाली, शेजारी, त्या गल्ल्या, ती शाळा, ते विद्यालय आणि बाकी बऱ्याच आठवणीना उजाळा मिळाला, सोन्याचा अजून एक मुलामा चढवता आला.

जनसंपर्क आणि त्याचा इतक्या वर्षाचा साठा इतका भला मोठा आहे हे माहित होतंच, पण अजूनही नवीन नाती चटकिनी भरभक्कम अशी उभी राहतील असं वाटलंच नव्हतं, पण तसं झालं आणि ते आश्चर्य रित्या संपूर्ण अनभिन्य व्यक्तींशी जोडलं गेलं देखील. एक फारच आगळीवेगळी मैत्रीण लाभली, तिच्या हातचे चविष्ट पदार्थ न मागता चाखायला मिळाले, तब्बल ३ दिवस सलग, कविता + गप्पा चा छोटासा फड रंगला आणि अनेक वर्षांनंतर कचेरीच्या आवारात प्रथमच तुलसी विवाह साजरा झाला.   

माझ्या दोन्ही मुलांची १२ सारखी मौल्यवान पायरी पार झाली आणि ते पुढील दिशेने पदक्रमण करते झाले, दुचाकी अत्यंत शिताफीने चालवायला शिकले, छोटे छोटे पैशाचे व्यवहार स्वतंत्रपणे करायला शिकले. अहाहा, तेच पण नव्याने पुन्हा उमगलेले असे तरुण दोस्त माझे.  

माझ्या मोठ्या दिरांच अनेक वर्षांचं स्वतःच्या भव्य दिव्य घराचं स्वप्न साकारलं ह्या २१ मधे आणि आम्ही सगळे त्या मौल्यवान क्षणांचे साक्षीदार झालो.

माझ्या लाडक्या मोठ्या पुतण्याची फार नावाजलेल्या महाविद्यालयात ऍडमिशन झाली आणि तो फार उत्कृष्टपणे तेथे रुळाला देखील. अगदी बाळ म्हणूनच सातत्याने लक्षात राहिलेला, किंबहुना तसाच बघितलेला आज स्वतंत्रपणे एकटा राहून सगळं सांभाळतो आहे हे बघून उर भरून आल्याशिवाय राहील नाहीच.

थोड्या प्रमाणात पण २ वर्षांपासून थांबून राहिलेले प्रवास सुरु झाले आणि आम्हा सगळ्यांना त्याचा आनंद उपभोगता आला.

माझे दोन अत्यंत हुशार आणि जगावेगळे विद्यार्थी / सहपाठी PhD झाले ते देखील ह्याच २०२१ ला.

अनेक नवीन मंडळी माझ्या कपाटात स्थानापन्न झाली अगदी कपाट दुथडी भरून वाहत आहे. लायकीपेक्षा कैकपटीने "त्याने" कित्ती जास्त देऊ केलं आहे हे बघून डोळे तर दिपलेच, पण फारच वेगळ्या पातळीचं समाधान लाभलं. पाय घट्ट पुन्हा एकदा जमिनीवर स्थिर झाल्याची / असल्याची  जाणीव झाली.

अनेक प्रकारे छोटेखानी वाढदिवस साजरे झाले माझ्या ह्यांचे / मुलांच्या वडिलांचे, कारण त्यांनी ह्या वर्षी त्यांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्यामुळे जगभर विखुरलेल्या ह्यांच्या मित्रांशी - मैत्रिणीशी ऐकता / बघता आलं.

आई गेल्यामुळे जगाकडे बघण्याचा नवीन नजरीया उमगला आणि त्यामुळे भरपूर ताकदिनिशी लढायला नव्याने शिकता आलं, कुठल्याही  छत्राशिवाय. अत्यंत कठीण होत ते, एक दिवस देखील डोळे डबडबल्याशिवाय सरला नाहीच, पण ती आसवे शिताफीने लपवणे पण नव्याने शिकवलं ते ह्याच २१ ने.   जगापुढे दिवस भर स्मितहास्य कायम टिकवून ठेवायचं, भरपूर काम करायचं आणि दिवस मावळला कि न कळत येणाऱ्या तिच्या आठवणीत तासंतास डोळे टिपायचे, हे देखील जमलं, जमवावं लागलं.

२१ च्या पहिल्या दिवशी मी २० ते २१ प्रगितिशील वर्ष असेल असं लिहिलं होत आणि ते फारच उत्कृष्ट रित्या साकारलं गेलं आणि मलाच संपूर्ण एका वर्षाचा आढावा इथेच मांडता आला आज हे समाधान हि जगावेगळं आहेच. https://drpreetimulay.blogspot.com/2021/01/blog-post.html

बेरीज वजाबाकी नेहेमी प्रमाणे चालूच होती ह्या ३६५ दिवसात पण त्यामुळे शिकता आलेले गुणाकार आणि भागाकार ह्या आधी कधीच अनुभवला नव्हता. सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे पुढील येणारे नववर्ष इतक्या जोशात, आनंदात आणि स्वस्थ असे सुरु होऊ दे माझ्या साठी, माझ्या कुटुंबियांसाठी, माझ्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांसाठी आणि सर्वांसाठी च कि सगळ्या जगवासियांना प्रत्येक दिवस आणि त्यातला प्रत्येक क्षण उपभोगता आला पाहिजे, हीच ईशचरणी प्रार्थना, अगदी मनापासून. 

२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...