सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

चार डोळे

मी सातवीत होते, आमच्या शाळेत वार्षिक संमेलन सुरु होत आणि घाईत पळत असतांना माझा पाय घसरला भल्यामोठ्या जिन्यातून आणि मी सरळ वर पासून शेवटच्या पायरीवर आदळले. खूप लागलं, डोळा कसाबसा वाचला आणि तेव्हापासून मला दोन नवीन डोळे प्राप्त झाले, दोनाचे चार झाले. तेव्हा पासून तो चार डोळ्यांचा प्रवास खूप काही शिकवून गेला. त्या वेळी डोळे तपासायला जायचे, मग नवीन चष्मा भेट मिळायचा आणि मग तो मिरवायचा हा नियमित उपक्रम होता, पण तो फारच आगळा वेगळा असा होता. का कुणास ठाऊक पण नवीन चष्मा करून आणला आणि तो परिधान केला कि त्या दिवशी किंबहुना दुसऱ्या दिवशी देखील नदीत चालल्यासारखं किंवा तळ्यात पडल्यासारखं च वाटायचं. बाप रे. कशामुळे कोणास ठाऊक. पण ते दोन दिवस इतके मज्जेशीर जायचे ना, वा, पर्वणीच जणू. असं मी का म्हणतेय? सांगते हो. मला निश्चित माहिती नाही पण आज खूप वर्षांनी मला हे प्रकर्षाने जाणवलं. आज देखील मी नवीन चष्मा करून घेतला, तो परिधान केला पण माझी पाऊलं अगदी सरळ पडली हो जमिनीवर, काही वर ना खाली, ना तळ्यात ना मळ्यात. आश्चर्यच आहे नाही? असं काय बदललं असेल? मी तीच, चष्मा तोच, जमीन पण तीच आणि पाऊलं देखील, मग तो अनुभव का बदलला?

असो, बरच आहे, आता जर नदीत पडल्यासारखं जाणवलं असतं तर ते परवडण्यासारखं नव्हतंच. आणि हो, ते जुने दिवस "झोपाळ्यावाचून झुलायचे" असेच होते ना, म्हणून असेल कदाचित. पण एकाच जगण्यात दोनाचे चार होणे, वैविध्य प्रकारचे असंख्य कंदील घालता येणे, नदी ते जमीन ह्या चालण्याची मजा चाखता येणे हे बहुतांशी तंत्रज्ञानामुळे साध्य झाले असावे. अशीच तंत्रज्ञानाची उत्तरोत्तर प्रगती होवो हि सदिच्छा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...