बुधवार, १ डिसेंबर, २०२१

अलार्म अक्का गजर

 "अलार्म काका सोसायटी सोडून गेले का..." हि जाहिरात आठवते का मंडळी. माझ्या घरी पण माझे बाबा माझे अलार्म होते. सांगायची गरजच पडायची नाही वेळेच्या आत यायचे उठवायला स्वतः ची झोप मोड करून, सतत अनेक वर्ष.

"कोंबडा आरवणे" हा एक अलार्म चा जगप्रसिद्ध प्रकार होता जुन्या काळी, कारण त्यावेळी आधुनिक घड्याळं अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे बऱ्याच वेळी अनेकांची फजिती देखील झालेली बघितली / अनुभवली आहे मी. आमच्या एका काकांना शेजारच्यांनी पाळलेला कोंबडा आरवला कि उठायची आणि मग फिरायला जायची सवय होती. एक दिवशी नेहेमीच्या सवयी प्रमाणे आरवला कोंबडा, काका उठले, फिरायला गेले पण त्यांना काही तरी वेगळंच वाटतं होत सतत. पण अहो विश्वास त्या कोंबड्यावर. त्या दिवशी तो कोंबडा पहाटे च्या ऐवजी मध्य रात्री आरवला होता आणि अंधारातच काका फिरून आले देखील.

काही जणांना वर्षानुवर्षांची एका ठराविक वेळेला उठायची इतकी सवय झाली असते कि त्यांच शारीरिक + मानसिक घड्याळच त्यांना आपोआप उठवत दररोज. त्यामुळे इतर कुठल्या गजराची गरजच पडत नाही.

घरच्या कामाचे, शेजारच्या घरातील स्वयंपाकाचे, रस्त्याच्या / शाळेच्या / देवळाच्या आजूबाजूला घर असेल तर त्याचे, असे अनेकविध आवाज म्हणजे बऱ्याच जणांचा गजर असतो.

गजर लावून बंद करून पुन्हा लोणणारे अनेक व्यक्तिमत्व देखील असतात, मी त्यातलीच एक बरं का.

अभ्यासासाठी, व्यायामासाठी, इतर कामांसाठी ठरवून गजर लावला जातो. तो वाजला रे वाजला कि ताबडतोब उठता यावं आणि अभ्यासाला जोमाने बसता यावं म्हणून माझी एक अत्यंत प्रिय मैत्रीण तिच्या मैत्रिणीच्या घरी जायची अभ्यासाला. ज्या खोलीत झोपायच्या त्या खोलीत आणि दूरच्या दुसऱ्या खोलीत देखील त्याच वेळेचा गजर लावायचा दररोज. म्हणजे उठून दूर चालत गेलं कि झोप मोड होईल हि अपेक्षा. अर्थात तसं कधीच झालं नाही, झोप आपल्या जागी, गजर त्याच्या आणि माझ्या मैत्रिणी जैसे थे.

माझे बाबा नेहेमी म्हणायचे "झाडा सारखं व्हावं, देत राहावं...". अलार्म पण कुठेही कमी नाही हं मंडळी, चावी दिली, वेळ ठरवली कि त्या वेळी होत्याच नव्हतं होवो तो वाजणारच, उठवणाराच, त्याच काम तो करणारच, कधीच त्याला वाटत नसेल का थोडं लोळावं, आळस करावा, १० मिनिटांनी वाजाव, नाही वाजलं तर? पण कदापी नाही हो, नेहेमी त्याच ठोक्यावर शिस्तीत वाजणार म्हणजे वाजणारच. तो त्याच काम करून मोकळा होतो, अपेक्षा ठेवत नाही, मी उठवलं हा अभिमान तर नाहीच, मी नाही उठवलं तर ह्यांचं काय होईल असा विचार देखील त्याला कधीच शिवत नाही. त्यामुळे "अलार्म सारखं व्हावं आणि ठोका कधीच चुकवू नये".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...