बुधवार, २३ मार्च, २०२२

कितीदा नव्याने ...

एक तर मला आर्या आंबेकर चा आवाज, स्वर आणि तिची तय्यारी प्रचंडच आवडते, ती नागपूरची असल्यामुळे त्याहून खास. तिच्या आवाजातलं एक गाणं आहे जे हृदयाला थेट भिडणारं असं आहे ज्याचे बोल आहेत "कितीदा नव्याने तुला आठवावे ...". कवीमनाचा थांग तर कधीच कुणालाच लागला नाही आज तागायत आणि अर्थात बरेचदा दिलेल्या /सांगितलेल्या गोष्टींवर, गरजेनुसार देखील बोल लिहिले जातात, पेरले जातात, व्यक्त केलं जातं. असो.

हे गाणं असंख्य वेळा ऐकल्यावर आणि मी स्वतः एक माहेरवाशीण असल्यामुळे मला हे शब्द सुचले "कितीदा नव्याने तुला पांघरावे...". कुठलीही माहेरवाशीण हे समजूच शकते कि माहेरी परत आल्यावर आईच्या कुशीतली ती उब, मागे सोडून / ठेवून आलेलं आपलं पांघरूण, आईचं पांघरूण, आईने हाताने शिवलेली गोधडी, आपली गादी ज्यावर अनेक वर्ष लोणण्याचा अनुभव घेतला असतो, टॉवेल ऐवजी आईच्या साडीचा तुकडा केस बांधायला वापरलेला नहाणं झाल्यावर आणि अशी हि यादी भली मोठी आहे.

आई झाल्यावर बाळाला कुशीत घेणं, वाढत्या वयानुसार बाळाला जवळ घेणं, आणि तो संपूर्ण अनुभव, कितीदा देखील पांघरला तरी दर वेळी फारच वेगळा स्वानुभव, अनुभव देऊन जातो आणि आठवणी तर विचारू नकाच.

जुन्या मित्र मैत्रिणीची भेट झाल्यावर मारलेली ती मिठी, अहाहा च.
ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, आकू आहे त्याच्या सोबत परत परत घालवलेले क्षण, अगदी शब्दांपलीकडले असे.

माझी एक मैत्रीण अगदी माझ्यासारखी प्रचंड वेडी. तिने अगदी लहानपणी तिच्या अंगणात लाल पेरूचं झाड लावलं आहे. त्या झाडाचं संगोपन तिने अगदी मनापासून केलं, पेरूंची वाट बघितली आणि यथेच्छ फळं चाखली अनेक वर्ष सलग. लग्न झाल्यावर ह्या सगळ्यात एक दुरावा आला म्हणून कि काय आता ती जेव्हा जेव्हा माहेरी जाते तेव्हा तेव्हा त्या झाडाला चक्क मिठी मारते, आता ह्याला काय म्हणायचं?. आणि मला नक्की खात्री आहे ते झाड देखील हिच्या येण्याची, मिठीची वाट बघत असणारच. त्या झाडाचं सगळं लक्ष किंबहुना अगदी कान टवकारून तो ऐकत असेल घरच्यांचं बोलणं कि हि घरी कधी येणार आहे ते. म्हणून म्हणते "कितीदा नव्याने तुला पांघरावे...."

आणि अर्थात "शब्देविण संवादु...", "बोलविण भाषा...." ज्यांना आणि जेथे समजते, वापरली जाते, ते देखील  नातं अगदी अस्संच आहे, "कितीदा नव्याने तुला पांघरावे...." अगदी असं. प्रत्येक वेळी एक जगावेगळा अनुभव, स्वानुभव आणि आठवणी देखील.

हा फक्त एक नवीन शब्द सुचला मला आणि हि अनुकथा मांडली गेली देखील. सातत्याने माझ्या आजूबाजूला घडणारे, घडलेले अनुभव आठवून, गोळा करून बघते जमलं तर संपूर्ण नवीन गाणं तर नाही पण काही ओळी नव्याने मांडता आल्या तर... जसं हे ओरिजिनल गाणं आपण इतक्यावर्ष अक्षरशः पांघरून अनुभवलं तसे अजून काही वेगळं घडेल. 

https://www.lyricsmarathi.in/2020/04/kitida-navyane-lyrics-ti-saddhya-kay.html

https://www.youtube.com/watch?v=6C0Ofw8y5r4

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...