आम्ही पुण्याला जेथे स्थायिक आहोत तेथे जवळपास एक पुरातन श्री. शंकरांचे देवस्थान आहे. अशी आख्यायिका आहे कि आदरणीय जिजामातांनी ते स्थापन केलं आहे त्यांच्या परम स्पर्शाने, विचाराने आणि कृतीने. त्या देवळाची एक प्रथा आहे. दररोज सकाळ संध्याकाळ आरती. आता तुम्ही म्हणालं हे काय बोलणं झालं? हि कुठली मोठी नवीन प्रथा? देऊळ म्हटलं कि आरती आलीच, नवीन काय आहे त्यात. तर नवीन असं आहे कि वर्षानु वर्षे सकाळ संध्याकाळी न चुकता, घड्याळाचा काटा एक इंच इकडे ना तिकडे होता बरोबर ८ वाजता ती आरती होते, खणखणीत भल्यामोठ्या श्रवणीय आवाजात, ध्वनी यंत्रणा वापरून. त्यामुळे नकळत कानावर शब्द पडतातच, ऐकलं जातंच आणि त्यामुळे भक्तिमय लहरी आपोआप निर्माण होतात, त्यात आपलं सानिध्य म्हणजे अजून काय हवं नाही का मंडळी. मग विचार-आचार आणि एकंदरीत राहणीमानावर छाप पडतेच त्याची. सलग १०-१५ वर्ष आरती ऐकल्यावर मला सहज लक्षात आलं कि ८ वाजताच का? ज्या विश्वस्थ मंडळांनी हि वेळ ठरवली असेल त्यांचे काय विचार असतील ह्या पाठीमागे? तर मला असं जाणवलं कि २०२२ किंवा ह्या पिढीची सरासरी सकाळी उठायची वेळ हि ८ च्या आसपास, अपवाद वगळता, आणि संध्याकाळी घरी येऊन, हातपाय धुवून देवापाशी किंवा घराचा दिवा लावण्याची वेळ हि कदाचित रात्री ८ वाजता. त्यामुळे सकाळ ची आणि रात्रीची सुरवात मंत्रमुग्ध वातावरणात सहज साध्य होते घर बसल्या, न कष्ट करता आणि तालासुरात, अजून काय पाहिजे. हि वेळ जर सकाळी ८ आधीची असती तर बऱ्याच जणांना त्याचा त्रास झाला असता, संध्याकाळी किंवा रात्री ८ च्या आधी आरतीची वेळ ठरवली असती तर असंख्य जणांची ती कानावर पडायची राहून गेली असती म्हणून हि साधलेली भन्नाट वेळ. ज्यांनी कोणी हि वेळ ठरवली त्याला माझा साष्टांग नमस्कार आणि ह्या देवळाने सुरु ठेवलेला हा उपक्रम असाच पिढ्यानुपिढ्या चालू ठेवावा हि विनंती आणि श्री चरणी प्रार्थना.
सोमवारी त्या संध्याकाळच्या आरतीच्या वेळी ११ वेळा श्री शंकरांचा जप असतो, मंत्रपुष्पांजली आणि बरेच काही. सगळ्या म्हणजे सगळ्या आजूबाजूच्या सोसायटी मधल्या लहान - थोर - वृद्ध - सर्वांनाच आता पाठ झाल्या असतील सगळ्या आरत्या आणि क्रम. एकतर ते साक्षात श्री शंकराचं नाव, त्यात खणखणीत आवाजात, आणि ठरलेल्या वेळेचं सातत्य आणखी काय हवं. अमराठी व्यक्ती, अशिक्षित जर कोणी असले तर त्यांना देखील तोंडपाठ झाल्या असतील आता. अशी ती ताकद आहे स्वरात, शब्दात, आवाजात आणि वेळ पाळण्यात. अहाहा. माझ्या दृष्टीने "वेळ पाळण्याचं महत्व" ह्याच ढळढळीत, अस्खलित आणि उत्कृष्ट उदाहरण आहे हे. आणि ते भाग्य मला लाभलं, लाभतंय आणि लाभणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा