मंगळवार, ५ एप्रिल, २०२२

वसतिगृह

माझे काही ठळक विचार आहेत वसतिगृहाबद्दल आणि ते बदलणं कदापि शक्य नाही. माझे हे असे विचार का झाले? हे मला ठाऊक नाही. आणि अगदी आधीपासून आहेत हे रुजलेले जेव्हा मी स्वतः घरी राहात होते, वसतिगृहात गेले नव्हते तेव्हापासून. पाण्यात पडल्यावर आपोआप शिकतात सगळे जणं, वसतिगृह हेच एक ठिकाण नाही आयुष्यात सगळं शिकायला आणि पंखात बळ यायला, माझ्या दृष्टीने. ज्याला शिकायचं आहे तो कुठेही शिकू शकतो, घरी राहून देखील. नाण्याची दुसरी बाजू म्हणजे वसतिगृहात मोकळीक मिळते, शिस्त लागते ई. पण घरी आई-वडिल-मुलं ह्यांच्यात मैत्रीचं नातं असल्यावर मोकळीक मिळायला काहीच हरकत नाही आणि मिळतेच. शेवटी मोकळीक हा फार मोठा आवाका असलेला शब्द आहे.

माझे पिल्लं अगदी जेव्हा एक वर्षाचे देखील नव्हते तेव्हा माझी अवस्था थोडी वेगळी होती. दिवस रात्र एकच असल्यासारखं वाटायचं मला जणू. असो. होतंच असं आणि ते अगदी बोटावर मोजण्याइतक्याच दिवसांसाठी असतं, तात्पुरतं त्यामुळे ठीक आहे. दोघांना सांभाळतांना मावशी आणि माझी आई आजूबाजूला असतांना मला सगळे देव आठवायचे प्रत्येक क्षणी. त्या वेळी आमच्या सोसायटीत एक मॅडम नेहेमी यायच्या आणि त्यांच्या सोबत एक पिल्लू असायची. त्या मॅडम इतक्या मस्त तय्यार होऊन यायच्या ना कि बघून प्रसन्नच वाटावं. छानच वाटायचं. खूपदा यायच्या. त्यांच्या घरी म्हणे जुळी मुलं होती, आणि त्यांच्या सोबत येणारी कदाचित तिसरी मुलगी. आश्चर्यच होत ते. त्यामुळे त्यांच्याकडे बघून आणि मी सदानकदा अवतारातच हो. मुलं माझ्यासाठी प्राध्यान, घर, आई, ई. त्यानंतर मी, त्यामुळे तुलना नाही पण साहजिकच लोकांना ते जाणवलं आणि सरते शेवटी त्यांनी मला बोलून दाखवलं कि बघ जरा तिच्या कडे आणि शिक काहीतरी. असो. थोडीशी चौकशी केल्यावर समजलं कि त्या मॅडम ना फक्त एकच मुलगी होती. त्यांचं दुसरं लग्न होतं ते आणि पहिलीची जुळी होती. ह्या मॅडम नी दुसरं लग्न करते वेळी ठेवलेली बऱ्याच अटींपैकी एक म्हणजे दोन्ही जुळ्या मुल्लांना वस्तीगृहातच ठेवायचं. त्यावेळी त्या दोघांचं वय वर्ष फक्त ५ च्या आसपास होतं. दुसरी अट दोन्ही मुलांना दोन वेगळ्या वसतिगृहात ठेवायचं एकत्र नाहीच. हे सगळं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच हादरली, प्रचंड वाईट वाटलं कि त्या दोन पिटुकल्यांसाठी मी काहीही करू शकत नव्हते, काहीच नाही, सगळं माहित असून देखील.

इतक्या नाजूक वयापासून वसतिगृहात राहणं मला नाही पटलं. किंवा कुठल्याही वयात नाहीच, बहुतांशी आणि हि घटना तर १९ वर्षांपूर्वीची आहे, तेव्हा तर सुविधा काहीच नसणार
वसतिगृहात. घर ते शेवटी घर. आई वडिल कुठे आणि फक्त व्यवसाय म्हणून करणारे वसतिगृहाचे मालक कुठे. अर्थात अपवाद आहेत प्रत्येक ठिकाणी, पण तरी देखील.

धन्य ती आई जिने पिल्लांना घराबाहेर ठेवलं, त्याहून धन्य ते लोकं जे अजाणतेपणे मला बोलले / तुलना केली. गेले ते दिवस माझे आणि त्या लेकरांचे पण. आता मस्त मोठे आणि जाणते झाले असतील, त्यांच्या त्यांच्या घरी राहत असतील कदाचित. 

माझ्यासोबत घडलेला हा छोटासा एक प्रसंग जो वसतिगृहाशी निगडित आहे म्हणून येथे मांडला.  मी जेव्हा PG करण्यासाठी वसतिगृहात गेले आणि आता माझा लेक गेलाय, इतकी काही भरमसाठ सोयींनीयुक्त असं काही ते ठिकाण नाही, नव्हतं माझ्या बाबतीत. पण पर्याय नाही त्यामुळे आई म्हणून लेकाला मोटिव्हेट करणे हे माझं काम आणि निश्चितच काही चांगल्या आठवणी देखील उभ्या राहतील कोणास ठाऊक.

असो, अश्या घटना घडती आणिक स्मृती ठेवुनी जाती.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...