एवढ्यातच संपूर्ण जगात "मातृदिन" साजरा झाला. जगरहाटीप्रमाणे एका रविवारी हा दिवस खास ठरला. या दिवसाच्या निमित्ताने माझ्या शेजारी राहणाऱ्या एका काकूंशी झालेले माझे हितगुज मी येथे मांडत आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक मुलाने, मुलीने, भाची-भाच्याने किंवा सुनेने आपल्या आईला किंवा आईसमान व्यक्तीला या दिवशी वर्षातून किमान एकदा तरी नक्की भेटले पाहिजे, फोन केला पाहिजे आणि वेळ घालवला पाहिजे. जमल्यास एखादी भेटवस्तूही दिली पाहिजे; कारण आईने बाळाला जन्म दिला, अनंत यातना सहन केल्या आणि त्याला वाढवले. त्यामुळे आईचे धन्यवाद मानलेच पाहिजेत, असे त्यांचे परखड मत होते. मी देखील त्यांना शुभेच्छा द्यायला गेले होते, म्हणून मग मी त्यांचे सर्व विचार शांतपणे ऐकून घेतले आणि त्यानंतर माझे विचार मांडले.
माझ्या मते, ग. दि. माडगुळकरांच्या या ओळींमध्ये सांगितल्याप्रमाणे: "बाळा होऊ कशी उतराई, तुझ्यामुळे मी झाले आई"
"आई" हे श्रेष्ठ स्थान आपल्याला त्या बाळामुळेच मिळाले आहे ना? मग सर्वात प्रथम धन्यवाद त्या बाळाला द्यायला हवेत असे मला वाटते. ते बाळ जन्माला आले नसते, तर जगातली ही सर्वोच्च "आई" पदवी आपल्याला कधीच मिळाली नसती. त्यामुळे माझ्या दृष्टीने नाण्याची ही दुसरी बाजू देखील तितकीच, किंबहुना कणभर जास्त महत्त्वाची आहे.
म्हणूनच मी या दिवशी माझ्या लेकरांना धन्यवाद देते आणि त्यांची माफी देखील मागते. कारण जेव्हा ते माझ्या पोटी आले, तेव्हा मी सुद्धा "पहिलेच आई" (पेहेलटकरीण) झाले होते. त्यामुळे माझ्याकडून काही चुका होणे अगदी स्वाभाविक होते. माझे हे मनोगत त्या माझ्यापेक्षा वयाने आणि मानाने श्रेष्ठ असणाऱ्या काकूंनी ऐकले आणि त्यांना ते मनापासून पटले. त्या म्हणाल्या, "अगं, मी या विषयाची ही दुसरी बाजू कधीच बघितली नव्हती. बरं झालं तू सांगितलंस, आता मी देखील हा विचार अंगीकारणार आहे."
खरे तर, मी स्वतः आई होण्यापूर्वीपासूनच "शिक्षक दिन" किंवा "गुरुपौर्णिमा" या दिवशी नित्यनियमाने माझ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आले आहे. कारण ते नसते तर मी "शिक्षिका" झालेच नसते. सातत्याने मला माझ्या विद्यार्थ्यांकडून जे शिकायला मिळते, ते माझ्यासाठी अमूल्य आहे. कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही, असे विविध स्तरांवरचे ज्ञान मला त्यांच्यामुळे मिळते. माझे विद्यार्थी मला विचारांनी सदैव तरुण ठेवतात, हे माझ्यासाठी खूप मोठे बक्षीस आहे.
प्रत्येकासमोर मनापासून आणि मनातल्या मनात नतमस्तक व्हावे. नाण्याची दुसरी बाजू असते हे नेहमी लक्षात ठेवा. ती पाहिल्यास जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहण्याचा जो परमानंद मिळतो, तो जगावेगळा असतो. मला हे अनेक वर्षांपासून नकळत जमले आहे. तुम्ही सुद्धा हे करत असालच, पण नसेल तर एकदा प्रयोग म्हणून करून बघा, त्याची गोडी नक्की लागेल.
एकदा खाली दिलेल्या ओळी पुन्हा मनापासून वाचा, तुम्हालाही माझे विचार नक्की पटतील:
बाळा होऊ कशी उतराई तुझ्यामुळे मी झाले आई
A very interesting and logical perspective. Never thought on these lines before..does make one ponder.
उत्तर द्याहटवाBut just to avoid conflict, can mother/child relationahip be considered an eternal symbiotic relationship
Thanks again for the immediate reply. Appreciate it. Of course the relationship is symbiotic. Why doubts?
हटवा