कारलं कडू असतं? छे छे, अजिबातच नाही ह्याचा प्रत्यय मला ह्या आधी पण आला आहे अनेकदा आणि आज तर निश्चितच झालं कि कारलं अतिशय चविष्ट असतं, कडवटपणा फिरकतं पण नाही आजूबाजूला, इतकं भन्नाट आणि उत्तम. पौष्टिक असून थोडसं दुर्लक्षित असं, पण आजपासून तर माझं कारल्यावरचं प्रेम जास्तच वृद्धिंगत झालं आहे. इतकी जेवले आज मी, कि पूर्णपणे तृप्त झाले, कारल्याच्या विश्वात रमले जणू.
तर त्याचं अस्स झालं कि मी थोडसं काहीबाही माझ्या सख्यांसाठी करून आणलं होतं, आणि तो डब्बा माझी मैत्रीण घरी घेऊन गेली. तिला अगदी खात्रीपूर्वक पक्के माहित होते कि मला काय हवं आहे ह्या डब्ब्यात भरून. बघा ना आता साधारण १० एक वर्ष एकत्र काम केल्यामुळे असेल कदाचित पण माझ्यापेक्षा जास्त मला ओळखणारे आहेत आजूबाजूला. हे बघूनच ओतप्रोत व्हायला होतं, एक वेगळी ऊर्जा सतत देऊन जातंच. तर आज सकाळ इतकी सुंदर सुरु झाली एका खास सुप्रभात ह्या मेसेज ने आणि त्यानंतर पाऊसच पडला जसा. अजून एक घरचा अप्रतिम चवीचा डब्बा मिळाला, आणि मग हा कारल्याच्या भाजीचा. शिवाय माझे डब्बे होतेच. सोन्याहून पिवळे, स्वर्गाहून सुंदर, ह्या जगापलीकडले असे झाले मला, अनुभवायला मिळाले.
एक छोटासा प्रसंग आठवला मला हे लिहितांना. एक डान्स शो आहे टीव्ही वर फार प्रसिद्ध असा. त्यात एक सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक परिक्षक म्हणून काम बघतात. ते माझ्या दृष्टीने ह्या जगावेगळे आहेत. कारण त्यांचं वागणं, बोलणं, आणि अर्थातच त्याची ख्याती. त्यांचं एक खास वाक्य आहे, ते नृत्य सादर झाल्यावर आणि त्यांना मनापासुन आवडल्यावर असं म्हणतात "अगर मैने आपके साथ स्टेज पर आ के डान्स नाही किया तो फिर क्या किया?". आधीच एवढ्या मोठ्या पदावर असलेला, प्रसिद्धीच्या यशशिखरावर यशश्वी रित्या राज्य केलेल्या सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक परिक्षकाकडून हे ऐकणं हि सर्वांसाठीच पर्वणी असते. ह्या परीक्षकानुसार दरवेळी आणि पदोपदी प्रत्येकाकडून खूप काही शिकण्यासारखं आहेच. आणि त्याच मुळे ते नवनवीन स्टेप्स शिकत असतात, नवीन मुलामुलींना प्रोत्साहन देत राहतात सातत्याने.
ह्या नृत्यदिग्दर्शक परिक्षकाच्या वाक्यावरून मला हे सुचतंय सध्या कि "ह्या प्रेमळ माऊलीच्या हातची कारल्याची भाजी नाही खाल्ली तर आयुष्यात काय खाल्लं? काहीच नाही". त्यामुळे नक्की चाखा, मी खात्री देते नेहेमीच ह्या काकुंच्याच हातची चाखत राहाल. ज्याने कारलं कधीच चाखलं नाही त्याला तर निश्चित हे उत्कृष्ट चविष्ठ आणि गोड च लागणार ह्यात शंकाच नाही, नेहेमी खावं असेच वाटणार. अन्नपूर्णा प्रसन्न असलेल्या काकूंच्या हातच्या कारल्याचा विजय असो. मनापासून हीच प्रार्थना कि असाच डब्बा नेहेमी मिळत राहो आणि माझ्या जिभेचे चोचले पुरले जावोत ह्या अतिशय वेगळ्या चवीच्या भाजीने कारण त्यात एक प्रेमाचा वेगळा ओलावा आणि मसाला घातला आहे, जो दुर्मिळ आहे, फक्त ह्या काकूंकडे उपलब्ध आहे. शेतकरी तर सर्वोपयोगी कारलं तय्यार करतोच, पण ह्या काकूंच्या हातच्या चवीमुळे त्याला वेगळा साज चढतो, चवीचा, जी कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी मिळणारच नाही. कारलं आणि कडू, छे छे?
बाकी इतर अनेक कारणं आहेतच पण ह्या कारल्याच्या भाजीमुळे मला श्रुती आणि तिच्या सासूबाई ह्या एकाच घरातल्या दोन डॉक्टर मैत्रिणी लाभल्या आणि जवळपास १० वर्ष आम्ही क्वचित भेटता देखील सानिध्यात आहोत. कमाल आहे कि नाही? "अश्या डॉक्टर मैत्रिणी असती आणि स्मृती देऊनी जाती".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा