सोमवार, २ मे, २०२२

अपना टाइम आयेगा

बाकीच्या दिवशी नाही, शाळेच्या दिवशी नाही पण शनिवारी आणि शाळेला सुट्टी असायची त्या वेळी हे प्रकर्षाने घडायचंच. माझी दोन्ही लेकरं त्यांच्या खोलीच्या खिडकीत बसून डोळ्याला दिसेल तिथपर्यंत बघत मला टाटा करत बसून राहायची. हिरमुसली व्हायची आणि फक्त एकच जप असायचा, नक्को जाऊस ना मम्मा तू ऑफिसला. त्यांचे केविलवाणे डोळे, चेहेरे खूप काही सांगून जायचे, पण माझ्या डोक्यात कधीच काहीच प्रकाश का पडला नाही ह्याचं मला राहून राहून आज आश्चर्य वाटतंय. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आज मी घरी होते, सुट्टी होती माझी. दिवसभर जवळपास घरून काम केलं, खूप उशिरा एकटी जेवले, आणि मग माझ्या लेकीला विचारलं कि ती कधी तिच्या कॉलेज मधून निघणार आहे ते. तिने पण ताबडतोब उत्तर पाठवलं आणि १५ मिनिटात निघते असं म्हणाली. मग मी तिला आवडतील असे काही उन्हातून आल्यावर अपेक्षित असे काही करून ठेवायचं ठरवलं, केलं आणि तरी देखील ती आली नाही. मी घड्याळ बघत येरझाऱ्या घालत होते. मग कंटाळून त्याच खिडकीत बसले आणि नकळत सगळं आठवलं, डोळ्यासमोर उभं ठाकलं एखाद्या चित्रपटासारखं. जागा तीच, घर तेच, वाट बघणं पण तेच पण आता भूमिका बदलल्या आहेत. असं असेल का लहानपणी चुकून एखादा विचार मुलांच्या मनात शिवाला गेला असेल का, माझ्या आई बाबांनी पण माझी फार वाट बघितली, त्यांच्या मनात नसेलच आलं पण असेल तर ... माहित नाही पण त्याच प्रत्यंतर मला आलं आज, मी ते अनुभवलं आणि नकोसं झालं मला. पुन्हा एकदा तो च अनुत्तरित प्रश्न उभा ठाकला, का केलं मी असं? आई झाल्यावर चुपचाप मुलांसोबत घरी का नाही राहिले मी? का केली नोकरी? माझ्या रक्तात तर नव्हतं नोकरी करणं, मग आलं कुठून? आणि का? जेव्हा त्यांना माझीच गरज होती तेव्हाच मी नव्हते त्यांच्यापाशी प्रत्यक्ष.  "अपना टाइम आयेगा" हे एका अर्थाने कित्ती खरं आहे हे पटलं आज मला पुन्हा एकदा. ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी मुलं कॉलेज ला जायला लागल्यानंतर नोकरी सुरु केली अश्या समस्त मत्रिणींना माझा नमस्कार. हि सल माझ्या मनात कायमची राहणार हे मात्र खरं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२४६४: तळ गाठणे

आमच्या सोसायटीत चार बोरवेल आहेत. त्यापैकी दोन चालत नाहीत, एक चालू आहे, आणि चौथ्याबद्दल मला फारशी माहिती नाही. त्या बोरवेल खोदताना मोठमोठ्या ...