"पहिली वेळ" हि एक प्रसिद्ध इंग्लिश म्हण आहे. प्रत्येक काम कधी ना कधी आपण पहिल्यांदा करत असतोच. "ना भूतो ना भविष्यती" माहिती असून सुद्धा हे असं काम मला पहिल्यांदा करावं लागेल ह्याची कल्पना पण स्वप्नात देखील केली नव्हती मी. ह्या वर्षी पहिल्यांदा मला माझ्या आईला वर्हच्युअली शुभेच्छा द्याव्या लागणार आणि त्याचं उत्तर देखील मिळणार नाही मला, दोन टिक्स आणि ब्लू टिक्स मिळणार नाहीत पाहायला ज्याची मी आतुरतेने वाट बघिन. अजून तंत्रज्ञानाने तेवढी प्रगती केली नाही आणि कदापि करणार नाहीच. तिच्या पर्यंत पोचतील माझ्या शुभेच्छा हे नक्की. पण नको व्हायला हवं होतं असं.
मला अजूनही आठवतो तो दिवस, माझी अगदी नोकरीची सुरवात होती आणि मी आईसाठी तिचा दिवस म्हणून साडी विकत आणली होती. मी आणि माझी सख्खी मैत्रीण गेलो होतो आणायला. दोघीनींही एकसारख्या साड्या आणल्या होत्या रंग फक्त भिन्न होते. माझ्या आईला "आईचा दिवस" वगैरे संकल्पना तेवढी माहित नव्हती. मग माझा हात धरून बसून सगळं समजावून घेतलं कि हा दिवस खास का आहे, का सेलीब्रेट करायचा ई. तिला एका ठराविक ठिकाणचा मसाला डोसा फारच मनापासून आवडायचा. तसं तिचं सोवळं ओवळं फार कडक, बाहेर कदापि खात नसे पण उपवाद होता तो माझा आनंद ह्या दिवशी एकत्र सेलेब्रेट करण्याचा, केवळ मला आवडतो म्हणून. मग काय आम्ही दोघी पडायचो बाहेर दादा बाबांसाठी स्वयंपाक करून ठेवून. आधी मस्त डोसा खायचा, भरपूर खरेदी करायची आणि मग पोटभर दिनशा आईस क्रीम खाऊन सायकल रिक्षात रमत-गमत घरी यायचो पोटभर गप्पा मारत. हा उपक्रम बरेच वर्ष चालला. मग फक्त फोन वर शुभेच्छा देणं व्हायचं किंवा कार्ड पाठवायचे आणि भरपूर गप्पा मारायच्या. ह्या वर्षी पासून ते पण शक्य नाही. पण असो. माझी आई नेहेमी सांगायची आणि आम्ही एका कॅडबरी च्या जाहिरातीबद्दल चर्चा करायचो कि तुमच्या आयुष्यात जितक्या जणी आई-समान असतील त्यांना आवर्जून फोन करा, भेटायला जा, त्यांच्या सोबत वेळ घालावा नक्की, जमल्यास / वाटल्यास एखादि छोटेखानी भेटवस्तू घेऊन जा ह्या दिवशी कारण तो त्यांचा हक्कच नाही तर त्यात एक ओलावा आहे तो जपा. आणि म्हणूनच हा दिवस रविवारी येतो मंडळी. त्यामुळे उठा आणि लागा कामाला आजच, ठरवा उद्या काय काय करायचं ते. मी तर आवर्जून माझ्या प्रत्येक आई झालेल्या मैत्रिणीला तिच्या स्वभावाला साजेश्या शुभेच्छा आजपासूनच पाठवते कारण कोणीच सुटायला नको. खूप जणी आहेत मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक, ऑफीस च्या सख्या ई. ह्या वर्षी पासून "दुधाची तहान ताकावरच" भागवावी लागणार आणि माझ्या अत्याधुनिक विचाराच्या आईची आठवण करत करत मी हे नक्की करणार ह्यात वादच नाही. "आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही, उरतही नाही".
Happy Mother's Day Aai, enjoy to your fullest wherever you are and in whichever form. Miss you not only on your day but every moment. Come back ga. I need you with me forever.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा