मी शाळा कॉलेज मधे असतांना साध्या सुगम संगीताच्या, भक्तिसंगीताच्या क्लास ला जायचे. खूप सुंदर शिकवायच्या त्या मॅडम. मला शास्त्रीय संगीतात रुची नव्हती म्हणण्यापेक्षा बैठक निर्माण करण्याची ताकद नव्हती, त्यामुळे "दुधाची तहान ताकावर", माझी आवड आणि आईची इच्छा म्हणून मनापासून शिकत होते. त्यावेळी मुभा होती, वेळ होता, ऊर्जा तर प्रचंड त्यामुळे खूप गाणी शिकता आली विविध प्रकारची. त्यातलेच हे एक. खूप छान बसवून घेतलं होत हे गाणं माझ्याकडून त्यावेळी आणि आवाज पण चढायचा. किंबहुना आवाजाला धार लागावी म्हणूनच असेल कदाचित हे एक ठेहेराव असलेलं गाणं निवडलं गेलं होत खास, हे आत्ता प्रकर्षाने जाणवतंय.
कदाचित हे सगळ्यांसोबतच होत असेल पण मला थोडंफार समजायला लागल्यापासून ते आजपर्यंत एकच ठाऊक आहे मला कि घर म्हणजे आई बाबा, सर्वस्व म्हणजे आई बाबा, श्वास म्हणजे फक्त ते दोघे, त्यांनीच व्यापलं होतं माझं सगळंच. फार उशीरा कदाचित पुस्तकातून, शिक्षकांकडून उमगलं कि सजीव आणि निर्जीव असे दोन भाग असतात. माझ्या मते घर निर्जीव कधीच नव्हतं माझं, ती वस्तू कधीच नव्हती कारण त्यात मला खूप खूप आधी पासून माझ्या आई वडिलांचे कष्ट, प्रेम, माया, ओलावा ई. हेच भासत, दिसत आणि जाणवत होतं सतत. पुढील शिक्षणासाठी जे मी बाहेर पडले ते कायमचीच. त्यामुळे "ते" घर खूप खूप दूर राहिले हे मात्र निश्चित, का? काय चुकलं माझं? असं का होतं? नको व्हायला हो... हे लिहितांना देखील हृदयाला असंख्य छिद्र पडतांना जाणवतंय मला. ते घर दृष्टीआड झाल्यावर मिळाल्या त्या फक्त भिंती, वस्तू, कोरडे पाषाण बास. त्या घराकरता, त्या माझ्या आईवडिलांकरीता माझ्या हातून मात्र काहीही घडलं नाहीच. मी फक्त घेत राहिले आणि ते देत राहिले सतत. आता खूपच उशीरा ह्या सगळ्यांची जाणीव होते आहे, पण आता वेळ निघून गेली, हातातून वाळू निसटून जावी तशी. हे ओझं घेऊन जगणं अशक्य आहे पण इलाज नाहीच. आणि तसं घर मला उभं करता आलं नाही हि खंत तर आहेच. ह्या सगळ्यातून खूप अनुभवायला मिळालं हे निश्चित.
जीवलगा ह्या करता कि अगदी पहिल्या दिवशीपासून आईबाबा माझे कधी मित्र, शिक्षक, वाटाड्या, गुरु, समवयस्क, भाऊ / बहीण, विद्यालय, शब्दकोश, समुपदेशक ... म्हणूनच राहिले, अलगदपणे न अंतर बाळगता, हे समजलंच नाही.
"सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे", त्या घरात होतं ते सुख, त्या अंगणातल्या फुलांना होता तोच सुगंध आणि आताच्या घरात तर पाचोळा जमा देखील होत नाही, वाजण्याचा प्रश्नच नाही.
"घेशील केव्हा मज हृदयाशी"? हा विनंती वजा प्रश्न आणि "त्याच्या" कडून उत्तराची वाट बघत पुढील मार्गक्रमणा करणार मी, हे निश्चित.
आदरणीय शांताताई शेळकेंचे प्रत्येक शब्द आणि त्यांची गुंफण मला फार भावली, म्हणून त्या बद्दल लिहिलं आणि त्या आधी पुन्हा एकदा वाचलं, तुमच्या करता येथे देते आहे, जरूर वाचा अजून एक अनुभव ह्या गाण्या संदर्भातला. https://www.aathavanitli-gani.com/Song/Jivalaga_Rahile_Re_Dur
शब्द + अर्थ = शब्दार्थ, स्वर + अर्थ = स्वरार्थ, भाव + अर्थ = भावार्थ, पण सध्या "ते" घर दृष्टीआड झाल्याचं प्रकर्षांने जाणवल्यामुळे जो अश्रूंचा वाहता प्रवाह आहे त्याला काय म्हणायचं? अश्रू + अर्थ = ?.
अश्रूच अर्थपूर्ण आहेत, असतात आणि म्हणून त्याला वेगळा अर्थ देऊन नवीन शब्द घडवायला नकोच, ह्या बाबतीत तरी, नाही का?
विज्ञान जाऊ दे पण अश्रू इतके खारट का असतात ते उमगलं मला, आज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा