मी एक दृश्य माझ्या चार डोळ्यांनी एकदा पाहिलं आणि मला विश्वास बसलाच नाही. पुन्हा एकदा ते दृष्टीस पडलं तरी देखील म्हटलं हे काय आहे नक्की, पण परवा पुन्हा एकदा पाहिलं तेव्हा खात्री झाली आणि माझ्या दृष्टीने ते फारच स्मार्ट होतं. तर त्याचं असं झालं कि माझ्या घरापासून ते ऑफिस पर्यंत अधेमधे अनेकविध दुकाने आहेत. त्यात काही टायर पंक्चर ची दुकाने आहेत, छोटेखानी. त्या प्रत्येक दुकानात मी पाहिलं कि दररोज सकाळ संध्याकाळ झाडू मारतात. रस्त्यावरचं दुकान त्यामुळे धूळ पण खूप येत असावी, आणि टायर गाड्यांसोबत पण माती येत असावी दुकानात. मग दोनदा झाडणे आवश्यक आहेच. सध्याच्या नवीन नॉर्मल दिवसातली हि दुकाने आणि दुकानदार / दुकानात काम करणारे. इतके म्हणजे इतके हुशार आहेत ना कि हवा भरायच्या भल्यामोठ्या पाईप चा सदुपयोग ते करतांना दिसतात. इतक्या शिताफीने करतात कि ज्याचं नाव ते. अहाहा च. विजेवर चालणार तो पाईप घेऊन धूळ उडवून लावतात दुकानाबाहेर, बास, साधं आणि सोप्प. काही क्षणात साफ काम आणि न वाकता हो मंडळी, काय म्हणजे काय म्हणायचं ह्याला. जबरदस्तच. एकाच प्रकारची धूळ किंवा माती असते त्यामुळे हा असा अनोखा झाडू वापरणं सहज शक्य आहे. घरी हि अशी उडवा-उडवी जमणार नाही कारण एक तर भरपूर वस्तू असतात, खाणं असतं आणि विविध प्रकारचा कचरा पण असतो. त्यामुळे नेहेमीच आपला झाडूच योग्य. पण हे असे नवनवीन प्रयोग करायला हरकत नाहीत,
दसऱ्याच्या दरम्यान अनेक मेसेजेस येतात कि मनातली जळमटं दूर करा, मोबाईल मधे साचवून ठेवलेला कचरा साफ करा, घराची तर आपण साफ-सफाई करतोच दरवर्षी ई. त्यावरून मला असं वाटतंय कि फक्त दसऱ्याच्याच वेळी का हो फक्त? एक तर नेहेमीच स्वच्छ राहा (मनाने हो) नाहीतर दर काही थोड्या दिवसांनी असा ह्या पंक्चर वाल्यासारखा स्मार्ट झाडू वापरून व्हॅक्युम क्लीन कराच म्हणजे अगदी फुलपाखरा सारखं जगता येईल स्वतःला आणि त्यामुळे आपल्या आजूबाजूच्यांना देखील. नाही का? आता ह्या पंक्चर वाल्याने त्याला हवा तस्सा स्मार्ट झाडू शोधून काढला आणि वापरतो, तुम्हाला कसा, कधी, किती झाडू लागतो ते बघा आणि वापराचं मंडळी. "झोपाळ्यावाचून झुलायचे...."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा