मी अनेक आधुनिक गुरुंकडून ऐकलं आहे, बऱ्याच साहित्यात वाचलं देखील आहे आणि ह्या सगळ्या दिग्गज व्यक्तींनी मांडलेले / पेरलेले शब्द मनाला फारच भावले आणि पटले. नकळत अचानक ते मग मी आजमावले आणि काय आश्चर्य माझ्या बाबतीत ते सपशेल खोटे ठरले, खूप टोचलं ते मनाला. पण असो.
माझी एक सख्खी खास मैत्रीण, अनेक जणींपैकी हि एक. खास ह्या करता कारण अनेक वर्ष आम्ही दोघी एकत्र आलो-गेलो आमच्या ऑफिस ला, अगदी दररोज. त्या वेळी / काळी "गाडी पूल करणं" हि संज्ञा माहित नव्हती पण आम्ही ती पुरेपूर जगलो. आमच्या अगदी छोट्या गाड्या होत्या पण भन्नाट मज्जा केली त्यावर. एवढंच नाही तर ती त्या वेळी वसतिगृहात राहत होती, त्यामुळे तिच्या कडे जाणं, ऑफिस व्यतिरिक्त बाहेर भटकायला जाणं, पार्टी, खरेदी आणि बरेच काही. आम्ही दोघीनीं लांबचा प्रवास देखील केला आहे एकत्र. ऑफिस व्यतिरिक्त छोटीछोटी कामं देखील झालीत सोबत. एकंदरीत काय आमची जोडगोडी मस्तच होती. ती थोडीशी वयाने मोठी होती पण कधीही ते आमच्या मैत्रीच्या आड आलं नाहीच. तिचं लग्न माझ्या आधी ठरलं, झालं, लेकं झाली आणि त्यानंतर सोशल मेडिया, स्मार्ट फोन हे प्रकार अस्तित्वात नसल्यामुळे जो संपर्क सुटला तो २०१०-११ ला पुन्हा प्रस्थापित झाला एकाच्या माहिती मुळे अचानक. मग मी तिला मेसेज केला आणि उत्तर मिळालं ३-४ महिन्यांनी, का? माहित नाही. मग पुन्हा काही मेसेज, फोन ई. झाले पण तेवढंच. एकाच शहरात राहून देखील, इतकी मला आठवण येऊन देखील आमची गळाभेट काही दृष्टीपथात नाहीच. मला परवा एका गाण्याच्या काही ओळी कानावर पडल्या, रेडिओ वर सुरु होत्या, कि "मीरेसारखं आळवलं तर कृष्णासारखा देव देखील संवाद साधतो, प्रगट होतो". कदाचित मीच आठवण काढण्यात कमी पडते आहे.
आणि हे फक्त ह्या मैत्रिणींसोबतच नाही तर बाकी अनेक जणांसोबत होतंय माझं आजकाल. मला अजून मनाच्या खास कोपऱ्यातून साद द्यायला हवी, हेच खरं.
आधुनिक गुरु म्हणतात कि मनापासून आळवलं तर त्या भावना / ती ओढ त्या व्यक्ती पर्यंत पोचते, किंबहुना एखादी खूप नाजूक, सुंदर, तरल, शब्दांपलिकडली आणि उत्कट भावना जर पोचवायची असेल तर ती देखील पोचते म्हणे. कुठल्याही प्रेमळ पद्धतीने प्रोत्साहन / प्रेरणा द्यायची असेल आपल्या आप्तस्वकियांना ते देखील पोचते, इतकी त्या विचारांमधे ताकद आहे, तश्या लहरी / कंपने / व्हायब्रेशन्स तय्यार होतात.
पण सध्या माझी ओढ माझ्या मैत्रिणी पर्यंत पोचत नाही आहे ह्याचाच अर्थ असा कि मला त्यावर अजून काम करायला हवं नक्कीच, किंवा अजून इतक्या वर्षांच्या दुराव्या नंतर वेळ आली नसेल भेटायची, काही तरी नक्की कारण आहे, ह्यात शंकाच नाही.
अजून एक शक्यता अशी आहे कि माझ्या तांत्रिक क्षेत्रात एक पाठवणारा सेंडर असतो आणि दुसरा घेणारा रिसिव्हर. असं इथे लागू आहे का?, दोघींना?, दोन्ही व्यक्तींना तितकीच समान ओढ वाटावी लागते तेव्हा प्रत्यक्ष भेट होते का? एकाने सातत्य टिकवायचं, भूतकाळातल्या आठवणीत रमायचं म्हणजे त्या पुढील व्यक्तीला देखील ती ओढ जाणवायला लागेल आणि मग टाळी दोन्ही हातानी वाजेल ज्यामुळे भेट निश्चित घडून येईल. अहाहा च. "श्रद्धा आणि सबुरी", साधी मैत्रिणीशी भेट इतकी पिटुकली गोष्ट असली तरी वेळेआधी होणे नाहीच, हा धडा मिळाला मला. किंवा ह्या घटनेला सध्या इतकं महत्व नसेल, मी बाकी गोष्टींवर लक्ष देणं आवश्यक असेल कदाचित. असो. जसे ज्यांच्या बद्दल विचार येतील ते मी येऊ देते आणि शांतपणे आनंदाने वाट बघते. त्या व्यक्तीचा विचार मनात येणं हि एका वेगळ्या ढंगातली भेटच, नाही का?
किंवा असं हि असेल कि मी काही तरी छान मिळवल्यावर, किंवा थोडी अजून शांत / मोकळी झाल्यावर भेट होईल / ठरली असेल. उदाहरणार्थ थोडसं वजन माझं कमी झालं कि, किंवा असंख्य जबाबदाऱ्यातून किंचित हात रिकामा झाला कि, नाहीतर काय होईल कि इतक्या वर्षांनी भेट शांत पणे होणार नाही, वजनाबद्दल चर्चा नाही तर ऑफिस च्या कामांबद्दल. त्याच्याशिवाय सध्या जग नाही ना?
Read more about thoughts on following URL:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा