बुधवार, ६ जुलै, २०२२

उन्हाळ्याची सुट्टी

माझ्या लहानपणी प्रत्येक गोष्टींची नेहेमीच वाट पाहावी लागायची. जसे कि चकली करता दिवाळीची वाट, नारळाच्या त्या खास वड्यांकरता दसऱ्याची वाट, तिळाच्या वड्या / लाडू करता संक्रांतीची वाट, ते खास चिरोटे फक्त माझ्या वाढदिवसाला व्हायचेच ई. अगदी तशीच मस्ती करण्याकरता, त्या कुल्फ्या खाण्याकरता, हात दुखेपर्यंत घरी आईस्क्रीम करण्याकरता, आंब्यांवर आडवा हात मारण्याकरता आणि अश्या बऱ्याच गोष्टी मंत्रमुग्ध होऊन आनंदाने उपभोगण्याकरता उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट. तेव्हा खूप गावाला जाणं, देशाबाहेर जाणं ई. खिजगणतीतच नव्हतं. लग्न, मुंज, कार्य ई. करताच काय ते बाहेर गावी जाणं, उठसुठ नाहीच. गेलोच तर आजूबाजूला सकाळी जाऊन संध्याकाळी परत असं.

उन्हाळ्याची सुट्टी संपली कि नवीन कोऱ्या गणवेशाच्या आणि करकरीत वह्या पुस्तकांच्या सुगंधात शाळेत नववर्ष सुरु होत असे. तेव्हा शिक्षक पहिला प्रश्न विचारतं असतं आणि त्यावर हमखास छोटेखानी निबंध लिहावा लागे, कि उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवली. आता पुढील आठवड्यात माझे विद्यार्थी नवीन सेमिस्टर करता सुट्टी संपवून परत येणार आहेत. तेव्हा माझा हक्क आहे कि पहिला प्रश्न मी तोच विचारणार शिक्षिका म्हणून कि सुट्टी कशी एन्जॉय केलीत. नाही का? पण त्या आधी मला आज मनापासून असं जाणवलं कि त्यांना हा प्रश्न विचारण्याआधी किंवा विद्यार्थ्यांनी मला हा प्रश्न विचारण्याआधी मी आधी यादी तय्यार ठेवते कि मी विद्यार्थी संस्थेत नसतांना काय काय केलं? कदाचित काहींना ते प्रेरणादायी ठरेलही, सांगता येत नाही. तर मी हे सगळं केलं:

  • विद्यार्थी परीक्षा देऊन घरी सुट्टी साठी गेले होते त्यामुळे खूप कमी दिवसात त्यांचे पेपर्स तपासले
  • त्यांचे गुण बरेचदा तपासून मग संगणकाच्या आधारे भरले, (खूप वेळखाऊ आणि जिकरीचं कामं आहे)
  • खूप कमी दिवस राहिले होते त्यामुळे पुढील सेमिस्टर मधे जे शिकवायचं त्याची दररोज थोडी थोडी तय्यारी केली
  • कसं शिकवायचं, कश्या परीक्षा घ्यायच्या ह्यावर सलग ३ दिवस चर्चा आणि कामं झाली
  • ३ दिवसांचे हे वोर्कशॉप उभे केले
  • त्या आधी खूप वाचन, मनन, चिंतन आणि चर्चा केली
  • दुसऱ्या विभागात जाऊन पण चर्चा केली
  • विद्यापीठाची पुनः मान्यता साठी भरपूर कामं केली
  • संपूर्ण विभागाची भातुकली ३ दिवस सलग एन्जॉय केली
  • दुसऱ्या वरून चौथ्यावर स्थलांतरित केलं
  • संशोधनावर चर्चा केली
  • एका पुस्तकावर काम केलं
  • वैयक्तिक पातळीवर खूप साऱ्या गोष्टी लिहिल्या


व्यस्त आणि व्यग्र राहणं अत्यावश्यकच आहे हे पुन्हा एकदा जाणवलं, कारण केलं तरच बोलता येतं, नाही का? साधारण ३-३.५ आठवड्यांची विद्यार्थ्यांची सुट्टी होती. इतक्या सगळ्या दिवसात काय काय केलं हे तर संपूर्णपणे आठवत नाही, पण ठळक मुद्दे आठवले जे इथे मांडले आणि ते प्रचंड प्रेरणादायी आहेत ह्यात शंकाच नाही. हे सगळं माझ्या हातून घडलं हेच खूप कौतुकास्पद आहे आणि आशिर्वादात्मक पण. त्या काळी लिहिलेले म्हणजे माझ्या विद्यार्थी दशेत लिहिले शब्द तर आता मला आठवत नाहीत पण आज हा लघु-निबंध लिहितांना, अगदी सहज संगणकावर उतारावतांना समाधान वाटले हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...