किंचीत वरीष्ठ झालं कि अनेक कारणांमुळे लिहून ठेवावं लागतं, लिहून दाखवावं लागतं, लिहून कुठे ठेवलंय हे देखील लिहून ठेवावं लागतं. आणि तसे देखील मी ज्या पिढीतील आहे तिथे सुबक सुंदर हस्ताक्षरांना प्रचंड महत्व होतं आणि आहे. सगळ्या गोष्टी कश्या टिपून ठेवलेल्या असायच्या. माझे एक अत्यंत प्रिय असे नातेवाईक आहेत ज्यांच्या लग्नाला अनेक वर्ष झालित, नातवंड पण मोठ्या वर्गात आहेत आता. अजून देखील ते दररोजचा जमा-खर्च लिहुन ठेवतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अगदी पहिल्या दिवसापासून त्या दोघांनी केलेला संपूर्ण खर्च, त्याच्या वह्या अजूनही शाबूत आहेत जपून ठेवल्या आहे, अगदी प्रत्येक आण्याचा हिशोब देखील. अहाहा च. त्याकाळी महत्व होत लिहून ठेवण्याला आणि दुसरा पर्यायच नव्हता लिहिल्याशिवाय. आता तसं अजिबात नाही. डोळे दाखवले, अंगठा दिला म्हणजे तुमची कामं होतात, दारं पण उघडतात, तुमची उपस्थिती रुजू होते ई.
गेल्या सप्टेंबरला मी जे नागपुरला बदलीवर गेले तेव्हापासून माझा एक दररोजचा सखा मला ओळखेनास झाला हो. डोळे लहान मोठे केले, काही फरक नाही, स्मित हास्य आणलं चेहेऱ्यावर तरी देखील नाही हो, अंगठा राहिला दूर, दाही बोटं ठेवून बघितली तरी नाहीच हो. म्हटलं काय गोम आहे?. अथक प्रयन्त केले, मीच नाही तर माझ्या अख्ख्या तांत्रिक चमूने, पण छे हो, काही म्हटल्या पठ्या हलायला तय्यार नाहीच / दाद देत नव्हताच. मग काय सरतेशेवटी माझं नाव-गाव-पत्ता लिहायला सुरवात केली तेव्हा स्वारी खुश. म्हणजे बघा ना तो कसा मला नकळत सांगतो आहे की तू ते दिवस आता पार केलेस, आता डोळे दाखवण्याची किंवा अंगठा वापरायची गरज नाहीच, तू फक्त लिहीत जा आणि त्याची सवय सदोदीत राहावी, जगी-स्थली-पाषाणी सर्वत्र राहावी म्हणून हे लिखाणाचं जास्तीचं काम दिलयं तुला.
एक तर मुलं मोठी झालीत, त्यांना डोळे दाखवण्याची शक्यता नाही म्हणजे डोळे दाखवण्याची सवय मोडली असणार, आणि हि आजकालची पिढी आई-वडिल डोळे एक वेळ दाखवतील तरी, हे तुमचे वटारलेले डोळे बघणार कधी, फुरसत आहे कुठे त्यांना?. डोळे मोठे म्हणजे काय? हे विचारून सगळी हवा काढून टाकतील कदाचित, जर चुकून लक्ष गेलं तर. असो. आता हा माझा अजुन एक (तसा जुना) टप्पा मी मनापासून उपभोगतो आहे. कारण माझ्यासारखी मीच. माझ्या अख्या कचेरीत क्वचित असतील असे माझ्या सारखे लिहिणारे, नाहीतर अजूनही सगळे तीच जुनी पद्धत उपयोगी आणतात कचेरीतुन येता जाता, उपस्थिती लावण्यासाठी वापरतात अंगठा / डोळे दाखवणं बायोमेट्रिक मशिन वर हो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा