शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२

उंदिर मामा

 उंदिर मामा हा मला खूपच प्रिय, आपल्याला सर्वश्रुत आहेच कि ते बाप्पांचे वाहन, त्यावर स्वारी सवार होऊन येते. त्यामुळे तेच फार महत्वाचे बावा. आमच्या घरी पाच दिवस मुक्काम असायचा बाप्पांचा आणि उंदीर मामांचा, गौरींसोबत मग ते जायचे त्यांच्या गावाला. आमच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी हो. अगदी नकळत्या वयापासून ते संपूर्ण अभियांत्रिकी शिक्षण संपेपर्यंत माझ्या हातून बाप्पांची मनापासून सेवा घडली. प्रत्येक वर्षी हमखास मीच जायचे बाबांसोबत बाप्पांना आणायला आणि अर्थात विसर्जनाला देखील.  प्रचंड उत्साह होता त्यावेळी. पिटुकली बोटं माझी आणि हात देखील त्यामुळे माझ्यावर उंदीरमामा सांभाळायची संपूर्ण जबाबदारी असायची, भली मोठी अशी आणि ती मी बखुबी निभवायचे. इतके वैविध्य उंदीरमामा उपलब्ध असायचे तेव्हा कि ज्याचं नाव ते, वेगवेगळ्या रंगात, ढंगात, बहुतांशी बसलेले असायचे. बाबांची जबाबदारी बाप्पांची मूर्ती घ्यायची आणि माझी ते मामा. अहाहा च. काय होते ते दिवस. आणि हो मला जे पुसटसं आठवतं त्या प्रमाणे आधी पूजेचा मान मामांचा असायचा, त्यांची पूजा वेगळी होत असे, त्यांना माझी आई छोटासा पण वेगळा खाऊ / नैवेद्य दाखवत असे आणि त्यांचे विसर्जन देखील प्रथम, वाहन आधी अशी प्रथा असावी. 

ह्या वर्षी माझ्या चार डोळ्यांनी एक काहीतरी नवीनच हेरलं हो, बाप्पांच्या दर्शनाला गेले तेव्हा वेगळे उंदीरमामा नजरेस पडलेच नाहीत. हे वर्ष काहीसं खास असल्यामुळे मी बऱ्याच जणांकडे गेले दर्शनाला आणि न राहवून हा एक प्रश्न देखील उपस्थित केला पण एक उत्तर मिळालं नाहीच किंवा ढकलाढकलीची उत्तरं मिळाली, आणि ती म्हणजे "उंदिर मामा?, कोण? त्यांची वेगळी मूर्ती? का आणायची? मग माझ्या चार डोळ्यांना पण दिसणार नाही अश्या कोपऱ्यात खूण केली कि आहे ना तेथे त्या मुर्तीच्या कोपऱ्यात एक ठिपका जसा, तो म्हणजे मामा म्हणे.  बाप रे मी पारच हादरून गेले, फार वेगळं वाटलं अगदी वैताग आल्यासारखं.  काय हे? बाप्पांचं वाहन, इतकी महत्वाची व्यक्ती, अत्यावश्यक अशी. एक तर लोक विसरलेत किंवा पुण्यात हि प्रथाच नाही मामा वेगळे आणायची जशी नागपूरात आहे, असं असेल कदाचित.  कुणास ठाऊक हि काय गोम आहे ती? पण असो. मला ते माझे सगळे लहानपणीचे दरवर्षी मनोभावे बाप्पाभोवती रुंजी घातलेले दिवस आठवले. ह्या मामांची आठवण येण्यामागे काही तरी दडलंय हे मात्र नक्की. ह्या निमित्याने हे लक्षात आलं कि सध्या गरज नसलेले, आवश्यकता नसलेले असे सर्वजण कदाचित क्षुल्लक मानले गेलेत. मग ते मित्र असोत, आप्तेष्ट, किवा शेजारी-पाजारी, जुने स्नेही ई. थोडक्यात काय त्यांना थोडसं बाजूला सारलं आहे किंवा संपूर्णपणे बेदखल केलं आहे जाणीवपूर्वक. कारणं अनेक आहेत सध्या वेळ नाही, गरज नाही, सोशल मीडिया वर पडीक राहायला मात्र नक्की वेळ आहे,जे समोर नाहीत, दिसत नाहीत, ज्यांची जाणीव होत नाही त्यांना किंमत आणि समोर असणाऱ्यांची शुन्य पण नाही हो. अगदी थोडसं विषयांतर करते आहे पण माझी आई नेहेमी म्हणायची बाप्पांचे २१ मोदक तय्यार झाले कि एक तरी करंजी करावीच, भाऊ बहिण असतात ते, तसेच मेदू वडे साठी डाळ भिजवतांना अगदी थोडेसे तांदूळ घालायचीच, हळद-हिंगाचं पण तेच म्हणायची, तसेच हे दोघे बाप्पा-मामा हि तर पक्की जोडगोळी, मग कसं काय विसरू शकतात? आणि ते देखील जेव्हा अगदी दररोज न चुकता संगणकासोबत देखील मामानाचं वापरतात अजूनही. हि पण प्रख्यात जोडीचं नाही का? हे असे विचार मांडण्यासाठी कदाचित मला हे लिहावसं वाटलं असेल. तर कृपा करून जमेल तेव्हा आपल्या आप्तस्वकियांना, मित्र-मैत्रिणींना, मितवा, स्नेही सर्वांना आठवा, कनेक्ट व्हा, एखादा फोन करा, भेटा, वेळ काढा आणि त्यांना त्यांची जागा द्या तरच तुम्हाला देखील मिळेल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...