शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

मऊसर

आपल्या भारतीय आणि महाराष्ट्रातल्या संस्कृतीत उपवासाला अत्यंत महत्व आहे, अगदी माझ्या लहानपणीपासून मी उपवास आणि त्याच्या संपूर्ण प्रक्रियेला जवळून निरखून पहिले आहे, आत्मसात केले आहे आणि बरेच काही बोधपर त्यातून शिकले देखील आहे. तसे तर भरमसाठ पदार्थ करतात उपवासाच्या दिवशी पण साबुदाणा खिचडी हि त्यातल्या त्यात सगळ्यात नेहेमीची. माझी आई असंख्य पद्धतीने खिचडी करत असे, एक म्हणजे नुसती फोडणी देऊन, त्यात कुठलीही भर घातली जायची नाही, मीठ-साखर-तिखट बास. दुसरी पद्धत म्हणजे हिरवी मिरची भरपूर प्रमाणात घालून पांढरी खिचडी, त्यात बटाटा आणि मस्त कोथिंबीर सुद्धा. तिसरी पद्धत म्हणजे कच्चा बटाटा घालायच्या ऐवजी उकडलेला बटाटा घालायचा. अजून एक प्रकार म्हणजे कच्चा अथवा उकडलेला, हिरवी मिरची अथवा लाल तिखट, पण भरपूर ओलं नारळ घातलेली अशी. मग आईसमान सासूबाईंनी अजून एक प्रकार करून दाखवला ज्यात काकडी घालतात बटाट्या ऐवजी. मला तर काय कुठल्याही पद्धतीची खिचडी द्या, मी थेट स्वर्गसुखच अनुभवते. प्रचंड प्रिय आहे मला, आता समजतंय का ते, इतक्या वैविध्यतेने केल्यावर / करून खाऊ घातल्यावर आवडणारंच ना.

आज माझ्या स्वयंपाकाच्या मावशींना मी समजावून सांगत होते कि उकडून बटाटा घाला खिचडीत म्हणजे ती / खिचडी हो अजून प्रचंड मऊ होते, खायला उत्कृष्टच लागते जशी कि मायेने आजींनी केली आहे जशी. तोच साबुदाणा, तेच सगळे जिन्नस फक्त बटाट्याची स्थिती बदलेली अशी, पण त्यामुळे गरम, थंड, खूप वेळाने जरी ती खिचडी चाखली तरी तितकीच मऊसर लागते हो. थोडीशी पुरते, पट्टकिनी तय्यार होते आणि मऊपणा टिकवते कुठल्याही वयाच्या व्यक्तीला साजेशी अशी बनते.

ह्या छोटेखानी प्रसंगातून, खिचडी + उकडलेला बटाटा ह्या बद्दल समजावून सांगतांना प्रकर्षाने जाणवलं, आपण सर्वांनी असं मऊसर का होऊ नये? आणि वागू नये? जमल्यास प्रत्येक वेळी प्रत्येकासोबत? सहज शक्य आहे असं माझं मत आहे. बघा जमेल तेव्हा, जमेल तेवढा प्रयोग करून, आवडलं ह्या मऊसर खिचडी सारखं स्वादिष्ट तर टिकवा तो मऊपणा प्रत्येक नात्यात देखील. बहुतांशी प्रत्येकचजण त्या मायेच्या मऊ ओलाव्याचा भुकेला असतोच, म्हणून प्रयन्तपूर्वक केलेला हा प्रयोग अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. 

इतकी वर्ष, असंख्य वेळा ती खिचडी क्षणात फस्त केली आहे मी पण असा अनोखा दृष्टिकोन कधीच नाही समजला / उमगला मला.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...