आज मी माझं एक पिटुकलं गुपीत तुमच्याशी शेअर करणार आहे, उघड करणार आहे. माझ्या लहानपणी का कुणास ठाऊक पण शाळेत, गल्लीत, घरी, दारी, नातेवाइकांमधें काळं परिधान करायचं नाही हा अलिखित नियम होता आणि त्यातल्यात्यात मुलींनी काळं काहीही गळ्यात घालायचं नाहीच. ह्या कडक नियमांमुळे म्हणावं का त्या दागिन्यांचं आकर्षण म्हणून पण खूप घाई झाली होती लग्न करायची, फक्त मलाच नाही हो मंडळी पण आमच्या सगळ्याच टोळीला. काय भन्नाट कारण आहे नाही, काळं गळ्यात घालायचं म्हणून लग्न करायचं, वा म्हणजे वाच. असो. त्यावेळी त्या काळ्या रंगाने एक प्रकारची भुरळचं घातली होती म्हणावं, त्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती. काळं नाही सांगितलं आहे ना घालायला मग नाही घालायचं एवढंच काय ती ठाऊक होतं. लपून-छपून घालून बघू आणि समाधान मानू हे माहितंच नव्हतं. अनेक वर्ष, अनेक पिढ्या सरल्या आणि आता जेथे नजर पडते, जेथे लक्ष जातं तेथे तेथे प्रत्येक जण मुलगा, मुलगी, लहान थोर, शिक्षित, अशिक्षित अगदी सगळे म्हणजे सगळे कुठल्याही व्यवसायातले बघितले ते गळ्यात काळं घालून अभिमानाने फिरतांना दिसतात. एखाद वेळा ते स्वतःला किंवा घरच्या स्वच्छ, शुद्ध डब्याला घरी विसरतील पण हा नाविन्यपूर्ण अत्याधुनिक काळा दागिना मात्र हवाच गळ्याभोवती. ऊन, वारा, पाऊस, परीक्षा, काहीही असलं तरी अगदी भक्तिभावाने, तन्मयतेने परिधान केलेला असतोच तो. आजकाल एक कणभर बदल झाला आहे तो म्हणजे विविध रंगात उपलब्ध आहे पण तरी देखील काळं ते काळचं, नाही का?
ह्या अश्या ओतप्रोत भरलेल्या भक्तिमागचं कारण मला ठाऊक नाही पण सर्वत्र दृष्टीस पडतो हे मात्र नक्की, अगदी ठसक्यात मिरवलेलं मंगळसूत्रंच जणू. सगळ्या कपड्यांच्या बाहेर, ठळक दिसणारं, प्रत्येकाच्या चालीसोबत ठेका धरणारं असं. खोट्या मंगळसूत्रापासून ते हिरेजडीत विविधता असते अगदी तस्से ह्यात पण आहे माझ्या मते अगदी शुल्लक किंमत ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे अतिमहागडे आणि उच्च दर्जाचे असे. जसे एकदा चढवले कि पुन्हा कारण असल्याशिवाय उतरवायचं नाही हा अजून एक अलिखित नियम मंगळसूत्राचा अगदी तस्सेच ह्या अत्याधुनिक दागिन्यांचे देखील आहे, माझ्या मते फक्त आंघोळ करते वेळी ना ईलाज म्हणून काढून ठेवत असतील, किंवा वॉटर प्रूफ प्रकार उपलब्ध असेल तर ते देखील करायची गरज नाहीच. काय हे?, अशक्य आणि अवघड आहे सगळं. मुलं देखील आवडीने हा दागिना परिधान करतात हे बघून कडा ओल्या झाल्याच माझ्या, कित्ती म्हणजे कित्ती प्रेम ते, अगदी उफाळून आलंय. असो, सध्या त्याचेच दिवस आहेत असं म्हणायचं, डोळे उघडे ठेऊन बघायचं आणि आनंद मानायचा. वायरलेस मॅग्नेटिक ब्लूटूथ हेडफोन्स चा विजय असो. अशीच मंगळसूत्र परिधान करण्याची सुबुद्धी द्या म्हणजे मिळवलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा