मी विविध प्रसंगी जमेल त्यांना भेटते, त्यांचं ऐकते, जमेल तेवढं ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करते आणि हे सर्व करण्यासाठी मला खूप संधी उपलब्ध असतात, मिळतात आणि मी जाते. अशीच एक संधी मिळाली आणि ठरवलं कि जायचं कारण ते सहज शक्य होतं, म्हणून गेले. एक सादरीकरण होतं जे कि अनेक वर्षांच्या संशोधनावर आधारीत होतं. मी वेळेआधी पोचले, माझ्या आधी बरीच मंडळी आली होती. सादर करणारे देखील स्थानापन्न झाले होते आधीच आणि संगणकावर सगळं व्यवथित सुस्पष्ट दिसतंय कि नाही, आवाज नीट ऐकू येतोय कि नाही ई. ची चाचणी घेत होते. मी पण शांतपणे बसले आणि जवळपास एक तास लागला त्यांचं सगळं कार्य समजावून सांगायला, प्रश्नांची उत्तरे द्यायला आणि बाकी इतर संबंधित गोष्टींकरता. त्या संपूर्ण एक तासात मला अक्षरशः अमेरिकेत बसून हे सगळं अनुभवते आहे असा भास झाला, कारण संपूर्ण वेळ पाळलेली शिस्त, शांतता आणि सादरीकरण करणाऱ्याची सखोलता. त्यांना इतकं चपराख माहित होतं सगळं, मुद्देसूद, कुठेही घाई नाही, गडबड नाही, अती नाही कि कमी नाही. स्फटिकासम सगळं माहिती होतं आणि स्थिरपणे ते सगळं समजावून सांगत होते मुद्देसुर. मला एक तासानंतर निघावं लागलं काही कामं असल्यामुळे पण कदाचित तीच व्यक्ती पुन्हा पाहण्यात आली काही वेळात पण मला माझ्या चार डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्यांच्या हातात एक पेटी होती, छोटीशी आणि त्या पेटीला आणि ह्यांच्या शरीराला बऱ्याचश्या नळ्या जोडल्या होत्या, ते एक एक पाऊल टाकत चालत होते, इतक्या लहान वयात, असतील ३०-३१ चे, जास्तीतजास्त. मला काही समजण्याआधी, मी त्यांच्याशी संवाद साधण्याआधी हे सगळं दिसलं आणि माझी बोलती बंद झाली. इतक्या व्याधी, कदाचित वेदना देखील असतांना त्यांनी अस्खलित एक तास जी युद्धभूमी तडफदारपणे सांभाळी त्याला सलाम. कुठेही यत्किंचित समजलं देखील नाही कि ह्यांना काही होतंय जेव्हा ते बोलत होते तेव्हा. कुठून मिळाली असेल अशी दिव्य शक्ती. अगदी नतमस्तक झाले मी. नाही तर आपण सगळेच, नवीन पिढीचा संपूर्ण तरुण वर्ग बहुतांशी फक्त नाराजी व्यक्त करतांना आढळतो, अगदी क्षुल्लक लागलं तरी त्याचा बाऊ करतांना दिसतो, नेहेमी आपल्याकडे "काय नाही" हे दर्शविण्याचा प्रयन्त करतांना आढळतो ई. आणि त्या उपर हि व्यक्ती बघा?. कित्ती शिकण्यासारखं आहे.
मनापासून सगळ्या देवांना, त्या सर्वोच्च शक्तीला कळकळीची विनंती आणि प्रार्थना कि त्यांना ठणठणीत बरं करा लवकर.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा