मी फेब्रुवारी महिन्यात "पंगतीच महत्व" ह्या सदराखाली असं नमूद केलं होतं कि पंगत हि एक खास जागा आहे जेथे माणसाची खरी पारख होतेच. मुख्य म्हणजे लग्नायोग्य वधूवरच नाही तरी दोघांचा अख्खा परिवार कसा आहे, चालीरीती कश्या आहेत, एकंदरीत स्वभाव कसा आहे हे सगळं पत्रिका दर्शवत नाहीत अजिबात. संगणक मशीन लर्निंग द्वारे थोडी जास्त माहिती कळते पण संपूर्ण नाहीच. त्यामुळे ज्या परिवारात आयुष्य काढायचं आहे त्यांच्यासोबत पंगतीचा लाभ घ्यावा, एकदा नाही, दोनदा नाही तर शक्य असेल तर थोडे अधिक वेळा, नकळत पारख होईलच.
एवढ्यातचं मला दुसऱ्या कोणाच्या गाडीत बसण्याचा लाभ आला, एकदा नाही, दोनदा नाही तर थोडे अधिक वेळा. चारचाकीने गिअर बदलणे, क्लच चे होत असलेले भयानक हाल आणि बाकी यंत्रेणे बद्दल बोलायला नकोच. असो, त्यांची गाडी, मला काय करायचं आहे. मला गाडी चालवता येते त्यामुळे ह्या सगळ्यांकडे नकळत लक्ष जातंच, दोश त्यांचा नाहीच. पण ह्या मुळे एक गम्मत लक्षात आली कि अगदी पंगती प्रमाणे भावी नवरा - बायको / साथीदार निवडायचा असेल तर त्याच्या सोबत गाडीत फेरफटका माराच. काही मिनिटात खरं रूप समजेल.
मी एक नवीन प्रयोग केला, एकदा नाही तर दोनदा आणि त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना, विद्यार्थ्यांना शाळेची सफर घडवून आणली पुन्हा एकदा. सर्वांच्या हाती रंगरंगोटीचं सामान दिलं, भला मोठा कागद दिला आणि विषय सांगितलं. प्रत्येकाने इतकं अप्रतिम चित्र रेखाटलं म्हणून सांगते. अहाहा च. प्रत्येकाला एकट्याला ते साकारायचे होते, नियम आणि गुण ह्या बद्दल कल्पना दिली होती आणि ठराविक वेळ दिला गेला होता. मग काय. विचारूनच नका. इतके अप्रतिम अविष्कार साकारले गेले, कागदावर अवतरले कि ज्याचं नाव ते. जगा पल्याड च. काही इतके सुबक आणि माहितीपूर्ण होते कि शब्दात मांडण्या पलिकडले, ज्यांचे विचार, कल्पना आणि बाकी इतर बाबी इतक्या स्पष्ट होत्या कि त्यावरून त्या व्यक्तीची देखील, त्याच्या गुणधर्मांची आणि त्याच्या जडणघडणाची पारख आपोआप झालीच, अगदी नकळत. पंगत आणि गाडी चालवण्याची खुबी ह्या सोबतच ह्याच्या धाटणीतलं अजून एक उदाहरण माझ्या समोर उभं ठाकलं. बऱ्याच चित्रकला स्पर्धा भरपूर ठिकाणी सातत्याने होतं असतातच. भावी जोडीदारासोबत त्यात भाग घ्यायचा आणि निरीक्षण करायचं. साफ, सरळ, खोडा तोड न करता, अगदी चपराख रंगसंगती, स्पष्ट, दृश्य, तोलामोलाचे, हवी तेवढी माहिती देणारे चित्र रेखाटले म्हणजे एकंदरीत गोळाबेरीज झक्कास आहे ह्यात दुमत नाही. पण दुसऱ्या टोकाचं काढलं म्हणजे, न बोललेलं बरं. असो.
तर मित्र मैत्रिणींनो जागे व्हा. असे आधुनिक आणि अत्यावश्यक सल्ले आमच्या काळी नव्हते उपलब्ध. आता आहेत आणि सगळे सहज जमण्यासारखे आहेत, त्यामुळे वैविध्य रितीने पारख कराच. तत्पश्चात "त्याची" मर्जी. किंबहुना हे सगळं माझ्या हातून "त्याने" मांडून घेणं हे देखील सांकेतिक आहे हो. उपयोग करा आणि अत्यानंदाने जगा.
पंगतीच महत्व
https://drpreetimulay.blogspot.com/2022/02/blog-post_6.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा