परिघाबाहेरचा = आऊट लायर (outlier) हि एक संगणक संशोधनातली फ्रेज / वाक्यांश आहे. ह्याचा उपयोग भल्यामोठ्या अंकांमधून गट किंवा संघ तय्यार करतांना होतो. जर एखादी संख्या किंवा डेटा क्रम जर कुठल्याच गटात बसत नसेल तर तो ह्या अश्या परिघाबाहेरचा = आऊट लायरच्या गटात जातो. बास, इतकं ते सोप्प आहे. पण मग संशोधन म्हटलं म्हणजे नाविन्यपण आलचं, ते आम्हाला काम करता करता साध्य देखील झालं आणि माझ्या विद्यार्थी चमूने एक नवीन संकल्पना शोधून काढली ज्याला आम्ही आऊट लायर असं संबोधलं, आणि ते संशोधन जगात काम करणाऱ्यांना देखील खूप आवडलं. नवीन एक अर्थ देणे किंवा अस्तित्वात असलेल्या ज्ञानात भर पाडणे म्हणजेच संशोधन. अगदी तसेच मी आज एका ठिकाणी वाचले कि एक कंपनीची अधिव्याख्याता आहे, अत्यंत तरुण वयात ती CEO / सीईओ झाली आहे आणि तिला घराची, मुलाची आणि एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी एकत्र कशी घ्यायची ह्या बद्दल किंचित मनात शंका होती. पण घरून काम करणे ह्या संकल्पनेमुळे / पर्यायामुळे तिने असं लिहिलं आहे, आणि एक फोटो पण ह्या अप्रतिम छोटेखानी लेखाचा भाग आहे, "मी सध्या माझे ट्विन्स खूप शिताफीने सांभाळते आहे". पण त्या फोटोत तर फक्त एकच अत्यंत गोंडस, उत्साही पिल्लू दिसतंय. मग मला जरा शंकाच आली, कि सीईओ हे भलं मोठ्ठ पद आणि त्यात ट्विन्स, बाप रे, साष्टांग नमस्कारचं त्या नवीन आईला. पण मग माझ्या चार डोळ्यांनी मी तो छोटीखानी लेख पुन्हा एकदा वाचला तेव्हा समजलं कारण पुढे तिने असं लिहिलं आहे कि "माझा न्याहारीच्या, जेवणाचा खूप प्रिय पार्टनर आहे हा, दररोजचा, त्यामुळे आणि घरून काम करणं सहज शक्य आल्यामुळे मला हे ट्विन्स सांभाळता येत आहेत, ट्विन्स म्हणजे काम आणि पिल्लू". वा. कारण मी स्वतः ट्विन्सची आई असल्यामुळे मला कल्पना आहे आणि जाणीव पण. त्यामुळे जास्त काळजी वाटली.
मी देखील बऱ्याच किंबहुना प्रत्येकवेळी कोणीही आमंत्रण दिलं कि अजूनही म्हणते कि मी माझ्या टोळीसोबतच येणार, ज्यात माझे तीन मुलं आहेत. सर्वांना खूप आश्चर्य वाटायचं, ह्या जमान्यात तीन मुलं? पण मग खरं समजल्यावर मोठा हशा पिकायचा. तीन मुलं म्हणजे माझे ट्विन्स आणि एक सासूबाईंचा, असे तीन हो.
बघा म्हणजे मीच नाही तर सीईओ मॅडम ज्यांनी तो लेख लिहिला त्या, आणि बाकी सर्वजणच संशोधक आहेतच, नवनवीन अर्थाने शब्द पेरण्याची कला साधली जातेच. मज्जाच आली, खूप खूप ऊर्जा मिळाली तो छोटेखानी लेख वाचून ज्यात मस्त पद्धतीने ट्विन्स हि टर्म वापरली आहे. भन्नाटच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा