शनिवार, ५ नोव्हेंबर, २०२२

रुसलेला लाडू

माझ्या आईच्या हाताला एक जगावेगळी चव होती, उत्कृष्ट स्वयंपाक, पक्वान्न आणि इतर सगळे म्हणजे सगळे पदार्थ सहजी करण्याची हातोटी होती तिची. खास असायचं सगळंच आणि ते देखील एकुलती एक मुलगी, प्रचंड लाडात आणि श्रीमंतीत वाढलेली, गुगल वगैरेची साथ नसतांना, माहेरी स्वयंपाकघर कुठल्या दिशेला आहे हे माहित नसलेली अशी. त्यामुळे माझ्या साठी आणि बाकी ज्यांनी ज्यांनी तिच्या हातचं चाखलंय त्यांना ते फार मोठ्या दर्जाचं होतं. बेसनाचे लाडू करावे तर फक्त तिनेच. कधीही मी कुठलेही दुसरे लाडू खाऊच शकत नाहीच, अजून देखील. सर्वप्रथम म्हणजे माझ्या आईला गॅस शेगडी मधे मोठा गॅस पण होतो हे माहितच नव्हतं कारण प्रत्येक पदार्थ हा शांततेत, शिस्तीत कमी आचेवरच केला जायचा. तोंडी सतत एकतर स्तोत्र किंवा भजन आणि परमानंदाची स्थिती, मग चव येणारच ना. सर्वदूर डाळीचं पीठ भरपूर साजूक घरी कढवलेल्या तुपावर भाजलेलं समजायचं, सुगंध पसरायचा, मग त्यात ना मोजता ना मापता एक कोमट दुधाचा हपका द्यायचा, तय्यार ठेवलेली पिठीसाखर मिसळली कि वळायला तय्यार. तळहात लाल व्हायचे पण दृष्ट लागतील असे प्रचंड स्वादिष्ट लाडू उभे राहायचे. मंडळी अगदी बरोरबर वाचलंत उभे राहायचे, कधीही बसले नाहीतच. तो आकार, त्या रंगछटा, माउसरपणा, शिस्तीत पहुडलेला किसमिस अहाहा च. तोंडात टाकला कि विरघळलाच पाहिजे. एक लाडू खाणं माहितच नव्हतं मला कधीच. एका पाठोपाठ एक सुरु. माझे बाबा नेहेमी म्हणायचे, "आईची माया नावाचा मसाला / तडका  / जिन्नस त्यात आहे बेटा", त्यामुळे वर्षानुवर्षे ती चव, तो देखावा कधीही बदलला नाहीच. बसलेले, अर्थवट भाजलेले, अतरंगी, वाकडे-तिकडे, अनाकर्षक असे लाडू बघितले कि एक तर तोंडात टाकायचीच इच्छा होत नाही पण त्यामुळे प्रत्येक क्षण आई सोबत घालवलेला आठवतो, तिच्या स्वयंपाक घरात फेरफटका मारायला मिळतो बसल्याजागी. 

बसका लाडू असतो हे माझ्या खिजगणतीतचं नव्हतं मुळी. ताठ मानेने, अभिमानाने उभे राहिलेले च लाडू बघून लहानाची मोठी झाले त्यामुळे पण असेल कदाचित मान उंच करून जगण्याचीच सवय जडली आहे. ती अशीच शेवटपर्यंत टिकावी हि ईशचरणी प्रार्थना. ध्यानी-माई-स्वप्नी नसतांना लाडू देखील काय भन्नाट शिकवून गेला नाही.

तर अशी हि बसलेल्या / फसलेल्या = रुसलेल्या लाडवांची साठा उत्तराची कहाणी सफल संपूर्ण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...