मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०२२

चुंबकत्व

मला समजायला लागल्यापासून अनेक गोष्टींप्रमाणे एक गोष्ट मात्र फार प्रकर्षाने जाणवली / समजली होती कि मनगटी घड्याळ हे कमवावं लागतं. ते सहजी मिळत नाही. त्यावेळी माझ्या घरी फक्त माझ्या वडिलांकडेच फक्त मनगटी घड्याळ होतं. त्यांनी ते कचेरीतुन आल्यावर काढून ठेवलं कि मग मी त्याला स्पर्श करायची, घालून बघायची आणि नकळत संवाद साधला जायचा. अनेक वर्षांनी मग आईला, भावाला अशी घड्याळं मिळाली. तेव्हा एकतर स्टील चा किंवा चामड्याचा पट्टा असायचा. नंतर सोनेरी पट्टा अधेमधे नजरेस पडायचा. व्यक्तिमत्वाला "चार चांद" लागायचे घड्याळामुळे, फक्त माझ्या दृष्टिकोनातून. हळूहळू मग पाण्यात घालता येतील असे मजबूत प्लास्टिक-वजा, बांगडी सारखे दिसणारे, खडेजडित, स्टील धातूंचेच पण वैविध्य रंग चढवलेले असे, इलॅस्टिक स्वभावाचे, कड्या सारखे आणि आताशा पट्टा एका बाजूने वेगळे होणारे (स्मार्ट घड्याळ, ज्यांना चार्ज करावं लागतं असे) अनेकाविध प्रकारचे निघालेत, काही त्याला धरबंध नाहीच. एवढ्यातच माझ्या पाहण्यात आणि वापरण्यात एक अनोखा पट्टा आला आहे जो चुंबक तत्वावर घडवला आहे. त्याला कुठलेही धरबंद नाहीत, म्हणजे हुक नाही, कुलूप नाही, छिद्र / खाच नाही ई. फक्त पट्टा आहे, त्याच्या टोकाला आणि संपूर्ण पट्ट्याला चुंबकीय क्षमता आहे त्यामुळे मनगटाच्या आकारानुसार फक्त ओढून सोडून द्यायचं.   बास. काय काय नवीन निघेल काही सांगता येत नाही. स्वस्त आणि मस्त, कुठलीही डागडुजी बराच काळ लागणार नाही असा तो पट्टा, प्रचंड हलका, पण दिसायला अगदी नेहेमीच्या पट्ट्यासारखाच. वापरल्यावर / हात लावल्यावरच समजणार कि नक्की काय दडलंय ते. प्रचंड लवचिक देखील.

माझ्या दृष्टीने असे नवनवीन शोध लागतात, माणसं नव्याची (नवीन वस्तू विकत घ्यायची / वापरायची / मिरवायची) भुकेली असतातच. त्या व्यतिरिक्त अश्या वस्तूंकडून भरपूर शिकण्यासारखं असतं. आत्ता ह्या क्षणापासून मला वाटतंय कि सर्वांनी कुठल्याही खाच + हुक = लॉक / कुलूप / घट्टपकड अश्या बाह्य आणि जास्तीच्या वस्तूंची गरज पडू देऊ नयेच. हा चुंबकीय शक्ती असलेला पट्टा / घड्याळ कसं प्रत्येकाच्या मनगटाप्रमाणे सहज बदल करतं तस्संच आपणही घरी / दारी करावं ना? काय हरकत आहे, म्हणजे कुठलीही देखभाल / डागडुजी ई. खर्च पडणार नाही, वाढणार नाही आणि त्यामुळे काही अडणार नाही मग कुठलाही माणूस, परिस्थिती, आव्हान का असेना. हलकं फुलकं राहून, आकार बदलून शिवाय चुंबकत्वाच्या शक्तीने भरपूर असे प्रत्येक क्षण आनंदाने पार पडण्याचा प्रयत्न करावाच. चला तर मग, लागा कामाला ताबडतोब.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...