गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

नाटकं

हा शब्द किंवा वाक्यांश ऐकला कि आपल्या डोळ्यासमोर उभा ठाकतो तो एक भव्यदिव्य स्टेज, रंगभूमी, भारदस्त अभिनय, कलेवर प्रेम करणारी माणसं, लाईट, शब्दांची फेक, संवाद आणि बरेच काही. कुठल्याही बोली भाषेची गम्मत हि आहे कि जो शब्द ज्या पद्धतीने वाक्यात वापरला जातो त्याचा तसा अर्थ निघतो. ह्या शब्दाचे देखील अनेक अर्थ काढता येतील. त्यातील एक अर्थ असा आहे जो मी सध्या जगते आहे अगदी फुल्टू. मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे हि डॉक्टर मंडळी माझ्या सारख्या रुग्णाला अनेक औषधें का देतात? तर माझ्यासारखी व्यक्ती किंवा अश्या अनेक व्यक्ती पाणी फार कमी पितात दिवसभरात म्हणून, अर्थात तो रोग बरा व्हावा म्हणून देखील. सध्या माझे डॉक्टर म्हणतात कसे "ह्या दिलेल्या गोळ्या तर घ्याच, पण त्याशिवाय गरम पाण्याने शेकत जा, मलम लावत जा, हवं तेव्हा तेलाने चोळा, कधी अधेमधे दुखणं कमी होण्याकरता उपयोगी येणारे पॅच लावा ई. माझ्या कडे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या मावशींनी घरगुती उपाय सुचवले आहेत ते. त्यात अन्नाच्या  मार्गाने पण पोटात पौष्टिक घटक जावेत त्यामुळे यादी आहे वेगवेळेला फस्त करण्याची ई. जेवायच्या आधी काही मिनिटे हे प्यायचं, हे औषध घ्यायचं, जेवणांनंतर ह्या गोळ्या, जेवणानंतर एक खास पेय आणि मग त्यानंतर सरते शेवटी गोळी ज्याने डोळ्यांवर झापड येऊ शकते म्हणून. अधे मधे लागेल तसं घरगुती उपाय, मलम, शेक, तेल, व्यायाम, फळं आणि बरेच काही. त्या वेळा पाळता पाळता नाकात दम येतो, नाटकं नुसती. ह्या नाटकाची पात्र म्हणजे वैविध्य आकाराच्या, प्रकारच्या, चवीच्या गोळ्या, विविध उष्णतेचं पाणी (पिण्यासाठी, शेकण्यासाठी), वेगवेगळी तेलं, मलमं. कधी पाहिलं आहेत का असं नाटक? शक्यच नाही. आणि ह्याचे प्रयोग दररोज न चुकता होतात / घडतात हो. पण हसत - खेळत सगळे नाटकाचे भाग करण्याशिवाय काहीही पर्याय नाहीच माझ्यासमोर. आज पर्यंत स्वतःकडे लक्ष न देण्याचे परिणाम किंवा अजून काही, पण इतक्या कौतुकाची, इतकं सगळं स्वतःसाठी करण्याची अजिबातच सवय नाहीच मला, त्यामुळे ज्यांना माझ्या ह्या सगळ्या नाटकांची पार्श्वभूमी माहित नाही त्यांना तर हि नाटकंच वाटणार. पण हरकत नाही. हे हि सही. वेळापत्रक हे फक्त शाळा आणि महाविद्यालयातच असतं हे मला माहिती होतं कधी माझं असं एक खास वेळापत्रक असेल असं स्वप्नात देखील कधी वाटलं नव्हतं. त्यामुळे आता "त्याच्या" कृपेने हे सगळं सांभाळतांना अगदी खास एखाद्या राज्याची राणी / राजकन्या असल्याचा भास होतो मला, नसतांना. हे कित्ती खास आहे बघा. असं राणी होणं कित्ती जणांच्या नशिबी असतं? खूप कमी आणि त्यात मी एक अग्रगणी स्थानावर आहे, आहे कि नाही मज्जा?. एका मागोमाग सरबत्ती असते सगळ्या पौष्टिक घटकांची. ह्या सरबत्तीत माझ्या मावशी, लेक, डॉक्टर ई. सगळे सामील आहेत. सरतेशेवटी ह्या लढाईची जीत होवो हि सदिच्छा, म्हणजे नाटकं एकदाची थांबतील.

प्रत्येक घटनेकडे जर एक नाटक म्हणून बघितलं तर कित्ती सगळं सोप्पं होईल नाही? म्हणजे त्याची पात्र तोंडपाठ होतील आणि त्याची लांबी फक्त आणि जास्तीत जास्त ३ तासांची आहे हे माहिती असल्यामुळे ते संपणार आहे हे निश्चित समजेल. त्यामुळे हे आणि येणारी प्रत्येक नाटके खोटा चढवलेला मुखवटा आहे हे लक्षात येईल, दुर्लक्ष करता येईल आणि हसत-खेळत प्रेक्षक म्हणून आनंद उपभोगत येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...