गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०२२

शुन्य

माझ्या दररोजच्या रोजनिशीत काही ठराविक वेळा आहेत, निश्चित अश्या. कधीतरीच त्यात किंचित बदल घडतो. कचेरीतुन घरी येण्याची वेळ निश्चित आहे. अख्खा दिवस काम करून घरी परतल्यावर उद्वाहक अक्का लिफ्ट समोर पोचलं रे पोचलं कि असं वाटतं कि ती शुन्यावरच उभी हवी, म्हणजे ताबडतोब घरी पोचता येईल. आणि अर्थात माझी राणी उद्वाहक फारच समजुतदार आहे आणि शब्दांविना कळले सारे शब्दांच्या पलिकडले असे काहीसे, अगदी ९९ टक्के वेळा ती दत्त म्हणून शुन्यावर उभीच असते, मी कधी येते ह्याची वाट बघत, काळजी पोटी, माझे बाबाच जणू. पण माणूस कसा असतो बघा, जेव्हा जेव्हा मी घरातून सकाळी धडपडत बाहेर पडते ऑफीस करता तेव्हा त्याच उद्वाहक कडे बघून मनापासून वाटतं कि शून्यावर नाही तर माझ्या मजल्यावरच ती असो. पण नेमकी बहुतांशी ती शून्यावरच असते कारण ती तिचं काम चोख पार पाडत असते, लोकांना सकाळच्या घाईच्या वेळी पट्टाकिनी खाली / खालच्या मजल्यावर पोचवायचं (ग्राउंड फ्लोअर वर). त्यामुळे दोन्ही वेळी येता - जाता मला ती शुन्यावर आढळते दररोज. मला ती एकदाच शून्यावर हवी असते हो, पण असो, शुन्याचं महत्त्व पुन्हा एकदा नव्याने उमगलं मला. ह्या तिच्या कृतीमुळे किंवा नकळत मला कित्ती मोठी खास शिकवण मिळाली बघा. एक: नेहेमी शुन्यावर असावं म्हणजे हवं तिथे जाता येतं, दोन: आपल्या कोणाची तरी वेळेवर, नेहेमीच आणि दृश्य स्वरूपात वाट बघावी.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...